आडोशामागची नजर
डॉ. राजेश काळे 'राजस' जिल्हा नागपूर Rajeshkale215@gmail.com

आडोशामागची नजर
‘काल मी तिला दुरून पाहिलं, ती मला आडोशाने बघत होती’. संध्याकाळ थोडी वेगळीच होती. आकाशात गुलाबी रंग सांडले होते, आणि हवेत कुठेतरी फुलांच्या सुगंधासारखी एक हलकीशी ओढ होती. गर्दी नेहमीसारखीच होती, पण त्या गर्दीत तिची नजर वेगळी भासत होती. पहिल्यांदा वाटलं हा केवळ माझा भास असेल. आपणच कधी कधी मनाने कुणाचीतरी उपस्थिती तयार करतो. म्हणून मी दुर्लक्ष केलं. मोबाईलमध्ये पाहिलं, मित्रांशी बोललो, मुद्दाम हसलोही. पण काही क्षणांनी पुन्हा जाणवलं की, तिची नजर अजूनही माझ्यावर स्थिर होती…शांत… पण बोलकी.
मी अचानक मागे वळलो. पाहिलं तर…ती दिसली नाही. क्षणभर वाटलं, सगळं माझ्याच मनाचं खेळ आहे. पण पुढच्याच क्षणी डावीकडच्या खांबामागे तिची सावली हलली. ती पुन्हा तिथेच होती ……..एका आडोशाने. आता माझी उत्सुकता वाढली. कोण असेल ती ओळखीची? की एखादी जुनी आठवण, जी नव्या चेहऱ्याने परत आली होती? मी मुद्दाम वेगाने चालू लागलो. अचानक थांबलो. पुन्हा मागे पाहिलं…. आणि यावेळी आमची नजरानजर झाली.
त्या नजरेत ओढ होती. जणू खूप दिवसांचं न बोललेलं काहीतरी तिथे साठून राहिलं होतं. ती काहीच बोलली नाही..… फक्त हलकेच हसली. ते हसू गूढ होतं, पण उबदार. मी तिच्याकडे एक पाऊल टाकलं….. ती पुन्हा आडोशामागे सरकली. हे लपाछपीचं खेळ काही वेळ चालू राहिलं. संध्याकाळ गडद होत गेली, गर्दी विरू लागली… पण माझ्या मनातली धडधड वाढतच होती. अचानक एक झुळूक आली. तिचे केस हलकेसे उडाले. चेहरा स्पष्ट दिसला….. आणि मी थबकलो.
तो चेहरा पूर्ण अनोळखी नव्हता.
तो मी अनेकदा स्वप्नात पाहिला होता.
त्या डोळ्यांत तीच तगमग होती…
जी मी कधी व्यक्त केली नव्हती.
मी जवळ जात विचारलं, “ कोण तू …..ओळखतो का मी तुला?” ती काही बोलली नाही. फक्त माझ्याकडे पाहत राहिली.… आणि पुढच्याच क्षणी गर्दीत विरून गेली. मी बराच वेळ तिथेच उभा राहिलो. या विचारात ती खरोखर होती का? गर्दी हळूहळू विरत गेली… रस्त्यावरचे दिवे लागले… पण माझ्या मनातले प्रश्न अधिकच उजळत गेले. हात अजूनही थरथरत होता. डोळे तिला शोधत होते. पण ती कुठेच नव्हती. तू खरोखर होतीस का? की माझ्या एकटेपणाने घडवलेला एक सुंदर भास? ज्याने मला एका क्षणापुरतं तरी प्रेमाची जाणीव करून दिली? रात्रभर मी त्या प्रश्नात हरवलेलो होतो. खिडकीतून येणाऱ्या चांदण्यांनी जणू तिचीच आठवण उजळवली होती. मनात कुठेतरी एक रिकामी जागा धडधडत होती…. जिथे कदाचित तू उभी होतीस… नजरेतून काही न बोलता.
आणि मग सकाळ झाली. सकाळ पासून वेलेंटाइन डे चा जल्लोष सुरू होता. सगळीकडे लाल गुलाब, हशा, हातात हात घालून फिरणारी जोडपी… प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. मी हातात एक लाल गुलाब घेतो. क्षणभर डोळे मिटतो… आणि पुन्हा तिचीच नजर जाणवते.
यावेळी ती पळत नाही.
लपून राहत नाही.
ती समोर उभी राहते…..
शांत, स्वीकाराच्या भावनेने.
आणि अचानक मला उमगलं …. ती बाहेर कुठेच नव्हती. ती माझ्या मनात दडलेली एक अपूर्ण भावना होती.
कधी न बोललेलं प्रेम…..
कधी न दिलेला गुलाब……
कधी न व्यक्त केलेली ओढ.
जी वेळोवेळी आडोशाने मला पाहत राहिली… माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत राहिली… जणू सांगत होती…… “स्वतःपासून किती पळशील?” आज मी तो गुलाब हळूच माझ्या हृदयाजवळ धरतो. कारण आता मला कळलं आहे…. प्रेम नेहमी कोणाच्या हातात हात देण्यात नसतं… कधी कधी ते स्वतःच्या मनाला स्वीकारण्यात असतं. काही प्रेमकथा दोन व्यक्तींमध्ये लिहिल्या जातात, पण काही प्रेमकथा मन आणि आठवण यांच्यात घडतात. जिथे ती असते आडोशाने… पण आयुष्यभरासाठी माझीच.
डॉ. राजेश काळे ‘राजस’
जिल्हा नागपूर
Rajeshkale215@gmail.com



