‘तुकाराम’ एक धगधगता अग्निकुंड
गजवंती सुभाष विघ्ने ता. बडनेरा, जि.अमरावती

‘तुकाराम’ एक धगधगता अग्निकुंड
दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी अमरावतीच्या पोटे इन्स्टिट्यूट मध्ये सनदी अधिकारी ‘तुकाराम मुंढे’ येणार म्हटल्यांवर मीही जाऊन त्यांना ऐकावं, असं माझ्या मनानं मनोमन ठरवलं. त्या दिवसाची वाट पाहत होते, अखेर तो दिवस आला. वेळेच्या आधीच म्हणजे दुपारी तीन वाजल्यापासूनच तो हाल तुडुंब भरला होता. दहा हजार आसन क्षमतेचा तो हॉल माणसांच्या चिक्कार गर्दीने फुलून दिसत होता. आणखी काही वेळाने बाहेरही लोकांची व्यवस्था करण्यात आली ही इतकी गर्दी कशासाठी? कोणासाठी? तर एका लोकहितवादी कार्यशैलीने मराठी मुलुख गाजवणारा कर्तुत्ववान अधिकारी तुकाराम मुंढें यांच्यासाठी.
तुकारामांबद्दल वर्तमानपत्रातून बरेच काही वाचत असते, अशा माणसाबद्दल मनात निश्चितच आदर होता आणि मला ही संधी चुकवायची नव्हती; म्हणून त्यांना ऐकण्यासाठी मी गेलेच. एखाद्या हिरोप्रमाणे त्यांची प्रचंड टाळ्यांच्या गजरात ‘एन्ट्री’ झाली. प्रत्येकाच्या स्क्रीन सरसावल्या पण ते कुणालाच दिसत नव्हते. कारण स्वयंसेवकांनी साखळी तयार करून त्यांना आणले, एखाद्या राजाने एन्ट्री करावी अशीच त्यांची दमदार एन्ट्री झाली होती. नमस्कार! हा पहिला शब्द उच्चारताच प्रचंड टाळ्यांचा गजर पुन्हा झाला ते ‘संवाद तरुणाईचा’ या कार्यक्रमांतर्गत तरुणांशी संवाद साधत होते आणि कार्यक्रमाला फक्त तरुणाईच नव्हती, तर सर्व वयोगटातील स्त्री पुरुष आणि मुख्यत्वे विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
तुकाराम म्हणाले, ” स्पर्धा परीक्षांची तयारी करायची तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी काय करतोय? कशासाठी करतोय? मी त्या पदाला लायक आहे का ? न्याय देऊ शकेल का? याचा पहिल्यांदा विचार करावा”. प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा हे ऐकून जरा तुम्हाला विचित्रच वाटेल. परंतु सत्य हेच आहे की, परीक्षा कशा पद्धतीची असते प्रश्न कशा प्रकारचे असतात त्याचा क्रम समजून घेणे आवश्यक असते आणि मगच त्या दिशेने नियोजन करून अभ्यास करावयाचा असतो, तो किती हे ज्याचा त्याने ठरवायचे. अपयश आले तरी जिद्दीने, जोमाने अभ्यास करून पुन्हा पुढच्या वेळेस तेवढ्याच उमेदीने पुन्हा तयारी करावी. यश अपयश मिळेल याची चिंता सोडून फक्त मी माझं सर्वस्व पणाला लावून जे काय केलं ते प्रामाणिकपणे केलं ही भावना आपल्याला ठामपणे माहीत असली पाहिजे.
एकदा का अधिकार मिळाला, तर तो मी या ठिकाणी कशासाठी आलोय? याचा विचार करून सारासार विवेक बुद्धीने आपल्या पदाला न्याय दिला पाहिजे. प्रशासनात जनतेसाठी लोकांनी जर काम केलं, तर खरंच या देशाचे भविष्य उज्वल आहे. तुकाराम बोलत होते, ‘संपूर्ण सभागृह कानात प्राण आणून ऐकत होता’. जवळजवळ एक सव्वा तास ते बोलत होते नंतर पालक आणि तरुणांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्याचीही उत्तरे त्यांनी दिली. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन लोक बाहेर पडले. हातात तुकारामचं पुस्तक होतं. स्टॉलवर स्वयंप्रेरणेने लोक पुस्तक घेत होते. प्रकाशकांनी सांगितलं, की पहिल्या आवृत्तीच्या चार-पाच लाख प्रती गेल्यात दुसऱ्याही प्रती जात आहेत. लेखक शफी पठाणलिखित हे पुस्तक मी वाचून काढलं.
जन्मापासूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत मिळविलेल्या संघर्षमय, यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवास या माणसाचा आपल्याला भारावून टाकतो. मुख्य म्हणजे आधी गरिबीची आणि नंतर व्यवस्थेशी दोन हात करताना तुकाराम ने कधीही शॉर्टकट निवडला नाही. त्याला जसा भाकरीसाठी संघर्ष करावा लागला, तसाच शिक्षणासाठी ही संघर्ष त्यांच्या वाटेला आला. ज्या घरात पिढ्यां- पिढ्यांअक्षरांचा गंध नव्हता, दोन वेळच्या अन्नाची सोय करणे हेच मुळात आव्हान होते, शेती असूनही बेभरोशाची, गरिबीच्या या दृष्ट चक्रातून बाहेर पडणे शक्य नाही याची जाणीव तुकाराम यांचे वडील बंधू अशोक मुंढेंना झाली, त्यांनी त्या दिशेने प्रथम प्रयत्न केले व तुकाराम मुंढे यांनीही तोच मार्ग अवलंबावा यासाठी त्याला प्रोत्साहन दिले.
‘शिक्षण हे माणसाला परिपूर्ण करणारे साधन आहे’, हे तत्त्वज्ञान कितीही कळत असले तरी कुठल्याही गरीब कुटुंबासाठी ते अग्निपरीक्षा इतकेच कठीण असते आणि ती अग्निपरीक्षा देण्याचे धाडस तुकाराम यांनी केले . फाटकी पुस्तके, तुटलेली चप्पल, रात्रीच्या वेळी पण कंदीलाच्या प्रकाशात अभ्यास हे सारे संघर्षाचे क्षण त्याच्या वाटेला आले तरी तो अविचल चालत राहिला. कारण पोटातील भुकेपेक्षा डोळ्यातील स्वप्नांची भूक मोठी होती. मनोगतात शफी पठाण सुरुवातीलाच म्हणतात,’कुछ जिंदगीया चाहती हैं मुकम्मल इंकलाब, चंद छोटी लढाईयों से जंग पुरी नही होती….!”
‘तुकाराम’ हे पुस्तक केवळ एका व्यक्तीच्या जीवन प्रवासाचे दस्तऐवजीकरण नव्हे; तर भ्रष्टतेच्या वादळी वाऱ्यात प्रामाणिकतेची ज्योत प्रज्वलित करण्याचा हट्ट धरणाऱ्या दुर्दम्य महत्त्वकांक्षी माणसाचे ‘महाकाव्य’आहे. तुकाराम मुंढे नावाचे वादळ अनेक भ्याड हल्ल्यांना सामोरे गेलेत, भ्रष्ट चेहऱ्यांना सातत्याने उघडे पाडत आले व पुढेही पाडतील. कारण संत तुकाराम महाराजांचा वसा घेऊन ते सत्यनिष्ठ मार्गाने पुढे जात असून जणू असा स्पष्ट संदेश देत आहेत की “भले तरी देऊ कासेची लंगोटी | नाठाळाचे माथी हाणू काठी….”
प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी हे पुस्तक वाचून प्रेरणा घ्यावी असंच आहे. तुकारामांचा रोखठोकपणा, काम करण्याची पद्धती, अनेक अडथळ्यांचा सामना कसा करावा? आणि आपल्या मताशी कसे प्रमाणिक राहावे हे ह्या पुस्तकातून प्रत्येक विद्यार्थ्याला कळते. तुकारामांना अडचणीच्या वेळेस किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या वेळेस अनेक थोर विचारवंत आठवतात त्यामध्ये अब्राहम लिंकन, नेल्सन मंडेला, म. ज्योतिराव फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आठवतात आणि मग ते पुन्हा आपल्याच मार्गावर मार्गस्थ होतात.
हे पुस्तक वाचताना कित्येकदा डोळ्यात अश्रू उभे राहत होती, मन भारावत होते. कारण, प्रशिक्षण काळात केलेल्या कार्यवाहींमुळे त्यांना सुरुवातीलाच नोकरीच्या ठिकाणी रुजू व्हायला किती त्रास झाला. एखाद्याला ही भ्रष्ट व्यवस्था कशी मारून टाकते त्याचे बळ हिसकाऊ पाहते, पण तरीही तुकाराम शांत मनाने घडामोडींची वाट पाहत उभे असतात. आतापर्यंत त्यांच्या नोकरीचा प्रवास 21 वर्ष झाला. आणखी पुढे काही वर्ष होईल ते असेच निडरपणे कार्य करत राहतील, असेच सर्वांना वाटते. सध्या अन्न व औषधी प्रशासन विभागाचे ते आयुक्त आहेत आणि त्यांचा धडाका अजूनही सुरूच आहे. अशा माणसांमुळे का होईना काही काळ माणसाची सुरक्षितता वाढते लोकहित वाढते आणि हे लोकहिताचे काम ते करतच राहतील. या कार्यासाठी अनंत मनाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम आहेत.
गजवंती सुभाष विघ्ने
ता. बडनेरा, जि.अमरावती
=============



