ॲड. गौतमभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जे. एस. एम. महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
ॲड. गौतमभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जे. एस. एम. महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग, दि. ६ डिसेंबर २०२५
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतमभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जे.एस.एम. महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम सकाळी १०:३० वा. रामशेठ ठाकूर ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले. या कृतीतून कार्यक्रमाला सामाजिक जागरूकतेची अर्थपूर्ण सुरुवात लाभली.
त्यानंतर सकाळी १०:४५ वा. मुख्य रंगमंचावर रक्तदान शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तरुण पिढीमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), एच. डी. एफ. सी बँक, अलिबाग आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
सकाळी १०.५० वाजता महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र क्रिकेट नेट्स व पॅविलियन याचे उद्घाटन मा.अध्यक्षांच्या शुभहस्ते करण्यात आले. सकाळी ११.०० वा. कै. जयवंत केळुसकर सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अध्यक्ष ॲड. गौतमभाई पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. लाॅ काॅलेज, कला, विज्ञान, वाणिज्य, संगणक शास्त्र, माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन अशा विविध ज्ञानशाखांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, रोख बक्षीस आणि पदक देऊन सत्कार करण्यात आला. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. गौतमभाई पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाची उत्तरोत्तर होत असलेली प्रगती सांगितली व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना एम. ए. मराठी विषयाची विद्यार्थिनी कुमारी संयोगी नाईक हिने आपल्या व्यक्तिमत्व जडणघडणीत महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन केले आणि बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेतून तीन हजार रुपयाचे ग्रंथ महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट म्हणून दिले. तसेच विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ॲड. श्रध्दा वैशंपायन हिने कृतज्ञता व्यक्त करताना महाविद्यालयासबंधी उत्तरदायित्व विद्यार्थ्यांनी ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण असणारा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा कै. जयवंत केळूसकर सभागृहात पार पडला. यावेळी केक कापून मा. अध्यक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा. अध्यक्षांचे कुटुंबीय, मित्र तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, जनता शिक्षण मंडळाचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी ॲड. गौतमभाई पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शैक्षणिक कार्यातील त्यांचे योगदान अधोरेखित केले. मा. भाईंना शुभेच्छा देण्यासाठी मा. नगराध्यक्ष श्री. प्रशांत नाईक, माजी नगरसेवक अॅड. मानसी म्हात्रे, श्री. प्रदिप नाईक, श्री. अनिल चोपडा, सौ. संजना किर, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस श्री. सुरेश घरत आदि मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली. या विविध कार्यक्रमांसाठी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी गौतम पाटील सचिव श्री. गौरव प्रमोद पाटील, जनता शिक्षण मंडळाच्या संचालिका सौ. शारदा धुळप, जनता शिक्षण मंडळाचे कायदेशीर सल्लागार अॅड. सचिन जोशी, लाॅ काॅलेज च्या महाविद्यालय विकास समितिचे सदस्य अॅड. महेश पटेल, सारळ माध्यमिक शाळा समिती चे चेअरमन श्री आर्य गौतम पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या प्राचार्या डॉ. नीलम हजारे, जनता शिक्षण मंडळाच्या जनसंपर्क अधिकारी डाॅ. सिमंतिनी ठाकूर, उपप्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक श्री. अजय सावंत, सारळ माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष मढवी तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.



