हिंद – दी – चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
हिंद – दी – चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
हिंद – दी – चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी हे केवळ शिख समुदायातीलच नव्हे, तर भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक इतिहासातील एक महान विभूती आहेत. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्तानं शासनाच्या निर्णयानुसार दि. १० फेब्रुवारी २०२६ ते दि. १ मार्च २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या हिंद – दी – चादर या उपाधीचा अर्थच आहे भारताचे कवच किंवा इतर धर्मांच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहूती देणारा. शहिदी समागम याचा अर्थ शीख धर्मातील गुरु किंवा हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आयोजित केलेला एक भव्य धार्मिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक मेळावा. शासनाच्या या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्यागाचे स्मरण करणे आणि त्यांच्या विचारांना तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी हे शिख धर्माचे नववे गुरू होते. त्यांचा जन्म दि. १ एप्रिल १६२१ रोजी पंजाब मधील अमृतसर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरु हरगोबिंद व आईचे नाव माता गुजरी हे होते. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे मूळ नाव त्यागमल हे होते. लहानपणी त्यांनी शस्त्र व शास्त्र या दोन्हींचे शिक्षण घेतले. बालपणी एका युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना तेग बहादूर म्हणजेच तलवारी सारखा धैर्यवान हे नाव दिले. सन १९६४ मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी हे अतिशय शांत, ध्यानशील व संयमी स्वभावाचे होते. त्यांनी मोठे भाग्य, संपत्ती व मान हे सर्व नाकारत आनंदपूर साहिब येथे ध्यान आणि सेवा यांमध्ये आयुष्य व्यतीत केलं. त्यानी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचारा विरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना हिंद – दी – चादर म्हणजे भारताचे कवच या उपाधीने गौरविले गेले.
धर्म, मानवता आदर्श आणि तत्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्यांमध्ये गुरु तेग बहादूर यांचे नाव जागतिक इतिहासात अद्वितीय आहे. ते जगभर प्रभाव टाकणारे महान गुरू मानले जातात. त्यांनी लोकांना सत्य, संयम, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांनी देशाला साधे आणि गहन तत्वज्ञान दिले. तसेच त्यांनी सुमारे ५७ शबद म्हणजे भक्ती गीते आणि ५७ सलोक म्हणजे उपदेशपर पदे रचली. या रचनांमध्ये वैराग्य, सत्य, मृत्यूचे चिंतन, आत्मज्ञान आणि परमेश्वरावर श्रद्धा या भावना प्रबळ आहेत. त्यांच्या या सर्व रचना गुरु ग्रंथ साहिबच्या शेवटच्या भागात आहेत. त्यांनी अध्यात्म, शांतता आणि शब्दांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. गुरू तेग बहादूर हे निस्वार्थ सेवा आणि बलिदानाचे प्रतिक मानले जातात.
त्यांनी अशावेळी अत्याचाराविरोधी आवाज उठवला, जेंव्हा मुघल सम्राट औरंगजेब हिंदू आणि इतर बिगर इस्लामी लोकांचे जबरदस्तीने धर्मपरीवर्तन करत होता. त्यांनी स्वधर्माचे रक्षण करताना प्राण अर्पण केले पण ते अन्याया समोर झुकले नाहीत.
औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदू धर्मावर मोठे संकट आले होते. काश्मीरमधील ब्राह्मणांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्विकारण्यास सांगितले जात होते. तेव्हा काश्मिरी पंडित मदतीसाठी गुरु तेग बहादूर यांच्याकडे आले. गुरू तेग बहादूर यांनी त्यांना धीर दिला, की तुम्ही जाऊन सांगा की जर गुरु तेग बहादूर यांनी इस्लाम धर्म स्विकारला, तरच आम्ही धर्मांतर करू. यानंतर गुरु तेग बहादूर यांना पकडून दिल्लीला आणण्यात आले आणि त्यांना इस्लाम धर्म स्विकारण्यास सांगितले. त्यांनी अत्यंत निर्भयपणे हा प्रस्ताव फेटाळला आणि म्हटले की, धर्माचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. परिणामी मुघल सम्राट औरंगजेबाच्या आदेशानुसार दि. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्लीतील चांदणी चौकात त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. गुरू तेग बहादूर यांनी स्वतःचे बलिदान दिले परंतू धर्म आणि भारतीय संस्कृतीचे संरक्षण केले. त्यांनी मानवतेसाठी आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान अभूतपूर्व आहे. ते केवळ शिख धर्माचे गुरू नव्हते तर ते संपूर्ण मानवी जातीचे रक्षक होते. त्यांच्या हिंद – दी – चादर या उपाधीचा अर्थच हा आहे इतर धर्मांच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहूती देणारा. त्यांच्या बलिदानामुळे ते धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतिक बनले. त्यांचे जीवन म्हणजे त्यागाचा, धैर्याचा, करुणेचा आणि मानवी मूल्यांचा सर्वोच्च आदर्श आहे.
हिंद – दी – चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांना ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्तानं विनम्र अभिवादन आणि त्रिवार वंदन !
शब्दांकन/ लेखन
श्री. धनंजय सुरेश भगत [ सहाय्यक शिक्षक ]
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास



