“कैसा हराया”…!! डॅा अनिल पावशेकर
क्रीडा समीक्षक व ज्येष्ठ स्तंभलेखक त्रिमूर्ती नगर, नागपूर
“कैसा हराया”…!! डॅा अनिल पावशेकर
क्रीडा समीक्षक व ज्येष्ठ स्तंभलेखक
त्रिमूर्ती नगर, नागपूर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ईशान किशनने लंकेत पाकविरूद्ध फलंदाजीत तांडव न्रुत्य करत आपल्या संघाला विजयी केले आहे. साखळी सामन्यात सलग तीन लढती जिंकून टीम इंडियाने सुपर ऐट मध्ये ऐटीत प्रवेश केला आहे. तर पाक संघाला आगेकूच करण्यासाठी नामिबिया संघाविरूद्ध विजय मिळवणे गरजेचे झाले आहे. सुपर संडेला झालेल्या पाकविरूद्धच्या लढतीत भारतीय संघाची फलंदाजीतील रणनिती आणि गोलंदाजीतली अचूकता ही या विजयाची सुत्री असून पाक कर्णधाराचे काही अनाकलनीय निर्णय भारतीय संघाच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे.
झाले काय तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकविरूद्ध लढत ही या विश्वचषकाची सर्वात मोठी बातमी होती. त्यातच पाक संघाने स्पर्धेपुर्वी या सामन्यात बहिष्काराचा राग आवळला होता. मात्र जगभरात होणारी नामुष्की आणि आर्थिक रट्टा बसण्याच्या भितीने त्यांनी लाजत मुरडत का होईना खेळायला होकार दिला. ते तसाही देणारच होते कारण बेगर्स हॅव नो चॅाईस हे त्यांच्या ध्यानात आले होते. तिकडे बांगलादेशने पाकच्या नादी लागून आपले नुकसान करून घेतले होते. खरेतर १९७१ ला भारताने पाक बांगलादेशचे हेंडूक सोडवून बांगलादेशवर अनंत उपकार केले होते पण बांगलादेश उपकाराला जागला नाही. तो दगाबाज पाक च्या नादी लागून स्वतःचे नुकसान करून बसला. मात्र पाक ला वठणीवर आणण्यासाठी आयसीसीला फारसा वेळ लागला नाही.
सलमान आघा चा पहिले गोलंदाजीचा निर्णय योग्य नव्हता कारण प्रेमदासावर पहिले फलंदाजी करणाऱ्या संघाचे जिंकण्याचे प्रमाण जास्त आहे. तिथे एकतर या मैदानाच्या सीमारेषा मोठ्या, त्यात स्लो विकेटमुळे फलंदाजांचा कस लागणार हे स्पष्ट होते. सोबतच पाक कडे अर्धा डझन स्पिनर्स असल्याने ते निश्चिंत होते. प्रारंभीच अभिषेक बाद झाल्याने दडपण आले होते परंतु ईशानने शांत डोक्याने पाक गोलंदाजी फोडून काढत दबाव पाकवर परतवला. ईशान भलेही ख्रिस गेल सारखा आडदांड खेळाडू नाही तरीही त्याचे टायमिंग आणि भन्नाट बॅट स्पिडने तो सीमारेषा सहज ओलांडतो. ईशान ४० चेंडूत ७७ धावांची खेळी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
ईशान बाद होताच भारतीय फलंदाज बुलेट ट्रेन वरून झुकझुक गाडीवर आले. मग तो तिलक वर्मा असो की सूर्या. या दोघांनाही विस्तारलेले क्षेत्ररक्षण आणि पाक फिरकीने जखडून ठेवले होते. ईशान असताना दोनशेचे स्वप्न पाहणाऱ्या संघाला पावणे दोनशेत समाधान मानावे लागले. खरेतर सामन्यापुर्वी पाकच्या उस्मान तारीक या लगोरी छाप गोलंदाजा बाबत बराच धुराळा उडाला होता पण त्याला आक्रमणाला उशीरा आणण्यात आले. तसेही त्याची आणि सूर्याची जुगलबंदी पहायला मजा आली. ना उस्मान चेंडू टाकायला घाई करत होता ना सूर्या डीप क्रिझ मध्ये स्ट्रोक साठी घाई करत होता.
अखेर या द्वंदात उस्मानने बाजी मारली. त्याने १९ व्या षटकात अवघ्या ४ धावा देत सूर्याचा बळी घेतला. तोपर्यंत शिवम दुबेने आपल्या लॅांग लिवरने कमाल दाखवली होती. अखेरच्या षटकात दुबे रिंकू जोडीने शाहीन आफ्रिदीला चोपत धावसंख्या १७५ वर पोहोचवली. वास्तविकत: सामन्याच्या पहिल्या सत्रात विकेट निश्चितच स्लो असल्याने त्याचा फायदा पाक ला झाला. परंतु सॅम अयुब आणि उस्मान तारीक वगळता इतर गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली नाही. त्यांचा भरवश्याचा घुंगरू सेठ अर्थातच अब्रार अहमदला सूर न गवसल्याने त्याला त्याची आवडती मान हलवण्याची संधी या सामन्यात मिळाली नाही.
पाक ची गोलंदाजी थोडीफार दखल घेण्यालायक जरूर आहे परंतु फलंदाजी निव्वळ कचकड्याची. त्यातही पावणे दोनशेचा पाठलाग आणि भारताविरूद्ध सतत हरण्याचा इतिहास यामुळे पाकच्या तंबूत खळबळ माजली होती आणि त्याचेच रूपांतर मैदानात दिसले. आपल्या साठी जमेची बाब म्हणजे अक्षर, वरूण, कुलदीप या त्रिकुटा सोबत बुमराह पांड्याची गोलंदाजी म्हणजे सोने पे सुहागा. पांड्या आणि अक्षर म्हणजे अंडर इस्टिमेटेट गोलंदाज,,मात्र हमखास रिझल्ट देणारे आणि झालेही तसेच. पांड्याच्या हार्ड, शॅार्ट लेंथने साहीबजादा फरहानचे फिल्म बनवण्याचे स्वप्न उध्वस्त झाले तर सॅम अयुब आणि कर्णधार सलमान आघाला गुंडाळण्यात बुमराहला फारसे कष्ट पडले नाही.
पाक कडून एकमेव फलंदाज उस्मान खान ने प्रतिहल्ला करत सामन्यात धुगधुगी निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु एका पिसा ने मोर होता येत नाही. तो बाद होताच पाकच्या उरल्या सुरल्या अपेक्षा संपुष्टात आल्या. बाबर आझम हा त्यांच्यासाठी पांढरा हत्ती ठरतोय. असून अडचण नसून खोळंबा अशी त्याची स्थिती आहे. बाबर आझमचे साम्राज्य कधीचेच लयाला गेले आहे. त्याने शेवटची मॅच विनिंग खेळी केंव्हा केली हे आठवत सुद्धा नाही. थोडक्यात काय तर पाक साठी बाबर आझम म्हणजे “कारवां चला गया गुबार देखते रहे” असे आहे. पाकच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी सूर्याने चक्क पार्टटाईम गोलंदाज वापरत पाक ला शेवटपर्यंत खेळवले, आणखी काही षटकं उरली असती तर गौतम गंभीरने पण गोलंदाजी केली असती.
कैसा हराया, तर भारतीय संघाने पाक ला ऐसा हराया. भारतीय संघात धुरंधर फलंदाज असतांनाही पाक ने पहिले गोलंदाजी स्वीकारून घोडचूक केली. स्लो पीच आणि स्पिनर्स हे भारतीय फलंदाजीसाठी डेडली कॅाम्बीनेशन होते. मात्र ईशानच्या झंझावाताने पाकचा प्रारंभीच धुराळा उडाला. ईशानला मिडल, लेग ला मारा करणे म्हणजे आ बैल मुझे मार असते. बहुतेक पाक संघाने फक्त अभिषेकचा बंदोबस्त केला होता पण ईशानला ते विसरले. जेव्हा त्यांनी ईशानला सातत्याने ॲाफला खेळवले तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. सोबतच सूर्याने तिलक, दुबे सोबत केलेल्या ३८,३३ धावांच्या भागीदार्या महत्त्वाच्या ठरल्या. पाक कडून ना कोणी ईशानच्या तोडीची खेळी केली ना मजबूत भागीदारी. अखेर ईशानची खेळी ही सामन्याचा निकाल निश्चित करून गेली.
दिनांक १६ फेब्रुवारी २०२६
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com



