महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र भुवनेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र भुवनेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी
आगरी समाज संस्थेचा सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: (दि १५) महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री क्षेत्र भुवनेश्वर येथे आगरी समाज संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत भाविकांसाठी प्रसाद वाटप करण्यात आले. सेवेच्या माध्यमातून समाजाशी आपले नाते अधिक दृढ करण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न भाविकांना विशेष भावला.
सकाळी ७ वाजल्यापासून प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. या दरम्यान संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भाविकांशी संवाद साधत, संस्था स्थापन झाल्यापासून अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत आगरी समाज संस्थेने राबवलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच संस्था स्थापन करण्यामागील उद्दिष्ट, समाजासाठी काम करण्याची भूमिका व भावी वाटचाल याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
नवीन संस्था असूनही आर्थिक व्यवहार व संपूर्ण कार्यपद्धतीत पारदर्शकतेवर विशेष भर देणाऱ्या आगरी समाज संस्थेचे भाविकांनी मुक्तकंठाने कौतुक केले. एक समाजसेवी संघटना म्हणून पुढे येताना पारदर्शक कारभार ठेवणे हे संस्थेचे वैशिष्ट्य असून, हीच बाब त्या दिवशी उपस्थित भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरली.
संस्थेविषयी माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाटील यांनी, “ही संस्था पदांपेक्षा कामाला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्यांची संस्था आहे,” असे ठामपणे नमूद केले. कोणतेही निर्णय घेताना सर्व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून सामूहिक निर्णय घेतले जातात, हेच संस्थेच्या यशामागील महत्त्वाचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमादरम्यान अनेक मान्यवरांनी संस्थेच्या माहिती काऊंटरला भेट देत संस्थेच्या कार्याबाबत जाणून घेतले. यावेळी आगरी समाज संस्थेच्या वतीने श्री भुवनेश्वर १८ गाव ट्रस्टचे अध्यक्ष श्री दीपक पाटील व सचिव श्री नरेंद्र पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेला वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल संपूर्ण १८ गाव ट्रस्टचे आगरी समाज संस्थेच्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले.
या यशस्वी उपक्रमासाठी आगरी समाज संस्थेचे कार्यकर्ते श्री सचिन पाटील, जयवंत पाटील, शशिकांत मिठागरी, मनोहर पाटील, अद्वैत पाटील, राजेंद्र पाटील, राजेश म्हात्रे, प्रभाकर ठाकूर, सुनील तांबडकर, मिलिंद पाटील, उदय म्हात्रे, अनंत म्हात्रे, वैभव पाटील, नंदकुमार (बाळा) पाटील, मिलिंद धोदरे, अभिजित पाटील, डॉ जगन्नाथ पाटील आणि तुषार थळे तसेच सौ. सुप्रिया ठाकूर, सौ. रेश्मा म्हात्रे, सौ. दिप्ती पाटील, सौ. तृप्ती म्हात्रे, सौ. दिपश्री पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच आगरी समाज संस्थेच्या सर्व सभासदांनी प्रसाद वाटपासाठी दिलेल्या आर्थिक सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होऊ शकला, अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी मंडळाने दिली. समाजसेवेच्या माध्यमातून विश्वास, पारदर्शकता व एकोप्याचा संदेश देणारा हा उपक्रम भाविकांच्या मनात विशेष ठसा उमटवून गेला.



