Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनखानदेशनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्र

“नवरंग : स्त्री मनातले”; भाग 5

लेखिका: अनिता व्यवहारे, अहिल्यानगर

0 4 0 8 9 0

“नवरंग : स्त्री मनातले”; भाग 5

लेखिका: अनिता व्यवहारे, अहिल्यानगर

नवरंगातल्या पाचव्या माळेचा रंग बाई पांढरा
स्कंदमातेच्या करुनी पूजा मिळवू या ऊर्जा
तिचा आशीर्वादाने मिटतील साऱ्या चिंता

जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा,
एक आईचा आईचा एक ताईचा..’

आज सकाळपासून याच ओळी आठवत होत्या आज पाचवी माळ. नवदुर्गेचा, स्त्रीशक्तीचा उत्सव मागच्या वर्षीचा घडलेला तो प्रसंग आठवला. आम्ही दहा-बारा मैत्रिणी मिळून वैष्णव देवीला निघालेलो. रेल्वेचा प्रवास होता. सगळ्याजणी खूप आनंदात होतो. दोन दिवसाचा तो रेल्वेचा प्रवास नेहमीप्रमाणे आमच्यासाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणारा असाच होता. योगायोगाने आमच्या डब्यात एक अनोळखी बाई, तिच्या दोन मुली आणि एक मुलगाही होता.

सकाळपासून आमच्याबरोबर एकाच डब्यात असूनही ती बाई आमच्याशी आम्ही बोलू तेवढेच सहभागी होत होती. तिची मुलं ही फारसी आनंदी वाटत नव्हते. माझी एक मैत्रीण माधुरी अतिशय अवखळ, विनोदी, निखालस व्यक्तिमत्व असलेली स्वतःच्या भाविश्वात डोकावण्या ऐवजी दुसऱ्यांच्या भाव विश्वात डोकावणारी. आम्ही तिला याबाबत नेहमी छेडायचो. पण तिचा स्वभाव काही बदलत नव्हता. आता ही ती तेच करत होती. पण, तरीही समोरची बाई मात्र आमच्याशी तथास्तुच होती. आम्ही त्या चौघांचे दिवसभराचे वागणे पाहत होतो. मला दोन मुली आणि हा एकुलता एकच मुलगा, हे तिने आम्हाला दोन चार वेळा ऐकवले होते. हे सांगताना मात्र ती त्या मुलाला प्रेमाने कुरवाळायची जणू त्याच्याबद्दल तिच्या मनात खूप अभिमान होता.

रेल्वेत भेळवाला आला, मग कुल्फीवाला आला. तेव्हा त्या मुलींनी दोनदा आईला भेळीसाठी आग्रह केला. पण आईने प्रत्येक वेळी भूक लागली तर डबा काढून देते, तो खा असेच सांगितले. पण तिसऱ्या वेळी जेव्हा पुन्हा कुल्फीवाला आला तेव्हा मात्र तिने मुलाला विचारले, दादा, तुला घ्यायची का कुल्फी? तो हो म्हणताच तिने त्याला दोन कुल्फ्या आणि मुलींसाठी मात्र एकच कुल्फी घेऊन दिली. त्यानंतर ही पुन्हा असा एकदा असाच प्रसंग. छोट्या मुलीने जेवायला मागितले, तर थांब थोडं…! थांब थोडं… !करीत वेळ मारून नेली. पण मुलाला मात्र ती तीन तीनदा विचारत राहिली.आम्ही दिवसभर हे सर्व पाहत होतो. बाकीच्यांनी फारसं मनावर घेतलं नव्हतं. पण माधुरीचं मात्र पूर्ण लक्ष होतं.

तिचे विचार चक्र चालूच होते. जेव्हा सर्व झोपेच्या आधीन झाले तेव्हा तिच्या दोन्ही मुली डोक्याखाली आधाराला हाताची उशी करून झोपी गेल्या होत्या. मुलाला मात्र तिने बॅग मधल्या कपड्याच्या घड्या देऊन अंगावर शाल ही दिली होती. तरी त्याला मात्र झोप येत नव्हती. त्या निरागस चेहऱ्याच्या कोमेजलेल्या कळ्या मात्र निद्रादेवीच्या आधीन झाल्या होत्या. तेव्हा माधुरीने त्या बाईशी बोलायचं ठरवलं. माधुरीने तिला बोलतं केलं. इकडचं तिकडचं विचारत जेव्हा तिला बोलत केलं. तेव्हा कळलं की, हिला चार मुलांच्या पाठीवर हा मुलगा झालाय. तिला तीन नणंदा होत्या. त्यामुळे सासू पासूनच मुलगा या वर्तुळाभोवती त्यांचं कौतुक हे विशेष होतं. माधुरी तिला म्हणाली, ‘अगबाई…! आहेस कुठे तू? थोडीफार शिकली सवरलीस ना! मग मुलगा मुलगी हा भेदभाव का करतेस? जग बघ किती पुढे चाललय. अगं हल्ली मुलांपेक्षा मुलीच कर्तुत्ववान आहेत. जरी त्या लग्न करून सासरी जाणार असल्या, परक्याचं धन असल्या तरी त्या दुरून का होई ना वेळप्रसंगी त्या आई बापाची सेवा करतात. आपण मुलगा, मुलगा म्हणून यांचे लाड करतो. त्यांच्यावर गाढवी प्रेम करतो. कारण हे असतात ना वंशाचा दिवा. अग हे वंशाचा दिवा नाही. तर हे दिवटेच निपजतात (अर्थात सर्वच नाही पण ) आणि जेव्हा आपण त्यांच्यासमोर असा सर्वांना दिसणारा, जाणवणारा भेदभात करतो ना. तेव्हा त्यांच्या मनावर तेच बिंबलं जातं. आणि ती अति लाडाने बिघडत जातात. वगैरे वगैरे तिने खूप समजावून सांगितलं.

हे सर्व तो मुलगा ऐकत होता. आता डब्यात शांतता झालेली. माधुरीच्या वरच्या सीटवर मी आणि शेजारच्या शीट वर त्या बाईचा मुलगा. आम्ही दोघंही मात्र त्यांच्यातला तो संवाद ऐकत होतो. माधुरी खूप बोलत होती. अखेर शेवटी बोलून बोलून थकली. भावूक झाली असावी. बघ बाई… तुझं तू ठरव. पण तुझ्या लेकरांना आनंदी ठेवायचं असेल, त्यांचा उत्कर्ष करायचा असेल तर सोडून दे. हा मुलगा मुलगी भेदभाव मी तुझ्या पाया पडते आणि बरच काही बोलून नंतर ती झोपी गेली. निम्मी रात्र उलटून गेली होती. आता सर्वच झोपेच्या अधीन झाले. तो मुलगा मात्र अजूनही जागा होता. तो हळूच उठून आईजवळ गेला. त्यानंतर मात्र मलाही झोप लागली होती. पण पहाटे जेव्हा मला जाग आली. अचानक रात्रीचा तो प्रसंग आठवला.. म्हणून सहज तिकडे डोकावले. तर काय आश्चर्य ! ती बाई तिच्या एका मुलीच्या सीटवर तिच्या उशाशी आणि मुलगा दुसऱ्या मुलीच्या उशाशी बसलेली. आई हळुवार हाताने मुलीला थोपटत होती.

मुलगाही बहिणीच्या डोक्यावर हात ठेवून बसला होता. दोघींचेही डोक्याखालचे आधाराचे हात आता आई आणि भावाच्या हातात होते. कारण आता आधारासाठी जणू त्यांना आई आणि भावाच्या मांडीचा आधार मिळालेला होता. अजून डब्यात कोणीच जागे झाले नव्हते. मी हळूच माधुरी जवळ गेले. तिला उठवलं. ती हलकेच उठली. समोरच्या दृश्य बघून माझ्या इतकीच ती अवाक झाली! आणि त्याचवेळी मला जाणवलं. ‘अरे हाच का तो पाचव्या माळेचा स्त्री मनातला, नवरात्रीच्या नऊ रंगातला रंगं..’ माझी मैत्रिण माधुरीच्या मनातला तो भावनिकतेचा रंग…!

असेच रंग आपल्या सर्वांच्या मनात मिसळत राहो. जगदंबा, स्कंदमाता यांचे आपल्याला शुभाशीर्वाद लाभो. नवरात्रोत्स्वाच्या या पाचव्या दिवसाच्या सर्वांना खूप शुभेच्छा

सौ अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे