‘मनातील भावनांशी नातं जोडणाऱ्या श्रावणसरी’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

‘मनातील भावनांशी नातं जोडणाऱ्या श्रावणसरी’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
‘श्रावण’ हा सर्वांना हवाहवासा वाटणारा महिना. फुलांची दरवळ, पानांची, फुलांच्या पाकळ्यांची महिरप बकुळी, प्राजक्ताची पखरण. ओलसर हवेची झुळूक असं निसर्गाचा सौंदर्य ओसंडून वाहत असतं. रंग आणि गंधानं सारी सृष्टी दरवळलेली असते, बहरलेली असते.
“श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे”
या बालकवींच्या गीतापासून ते ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेपर्यंत सर्व कविता स्मरतात. केवळ श्रावण हा तसा व्रत्तस्थ, कलासक्त, रसिक, रंगेल, कुटुंब वत्सल असा महिना आहे. या महिन्यात सणांची अगदी रेलचेल असते. त्यात चातुर्मासामुळे नेम नियम यात स्त्रिया मग्न असतात दिव्याची अमावस्या, श्रावणी सोमवार, संपत शनिवार, मंगळागौरी पूजन, नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा असे अनेक सण या महिन्यात साजरे होतात. पर्ण पाचूचा साज ल्यायलेली धरणी तृप्त, कृतार्थ,लेकुरवाळी असते. तिच्या अंगप्रत्यंगातून सौंदर्य उधळत असते. ऊन कोवळे, सोनेरी, फुलांचा दरवळ, पक्षांचा मधुरव, मयुराचा मुक्त पिसारा, सगळीकडं एकच सूर, एकच नाद.
श्रावणाचे मन भावन रूप साक्षात मोहिनी घालते. श्रावणात ऊन पावसाचा खेळ अगदी रंगात येतो. आकाशात इंद्रधनुच्या सात रंगांची कमान मन मोहून घेते. खरंच श्रावणात सृष्टीचं लावण्य अगदी अवर्णनीय असतं. अशा सुंदर, धुंद वातावरणात प्रियकराची , प्रेयसीची, त्या चिंब क्षणांची, हुकलेल्या संधीची आठवण आली नाही तरच नवल.
श्रावण सरी बरसताना
भिजत होतीस तू किती
माझी छत्री फाटकी होती
एकंदरीत पावसाचं नातं मनाशी जुळलेलं असतं. पावसाशी निगडित खूप साऱ्या आठवणी असतात. बालपणीचा पाऊस, तारुण्यातील पाऊस ,दोघांच्या सहवासात भिजलेला पाऊस. असा पाऊस मनात दाटतो. अशा या श्रावणसरी मनातील भावनांशी जुळलेल्या, अगदी आपलेपणाचं नातं जोडणाऱ्या, हसवणाऱ्या, कधी उदास करणाऱ्या, कधी मनीचा आठवतळ ढवळून काढणाऱ्या, अगदी हव्याहव्याशा कल्पनाविलासात रंगून जाणाऱ्या, माहेरी जाण्याची ओढ लावणाऱ्या, तरुणाईला नभात उंच झोके घ्यायला लावणाऱ्या.
आज काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘श्रावण सरी’ विषय असाच भावनांशी निगडित आहे. लिहायला प्रोत्साहन देणारा आहे. सर्व शिलेदारांनी सहभाग उस्फूर्तपणे घेतला आहे. पण जरा अजून तिसऱ्या ओळीकडे, कलाटणीकडे गांभीर्याने पहावं असं वाटतं बाकी सर्वांचे आभार आणि शुभेच्छा.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह





