महिलांनो ‘शीतकपाट’ वापरताय..!! मग या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच..!!
गजवंती सुभाष विघ्ने बडनेरा, जि.अमरावती

महिलांनो ‘शीतकपाट’ वापरताय..!! मग या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच..!!
हल्ली सर्रास लहान मोठ्या घरात गरीब, श्रीमंत लोकांकडे गरजेनुसार ‘फ्रीज’ असतो. त्याचा वापर आपण कसा करतो हे आपण आज या लेखप्रपंचातून जाणून घेऊ या. अर्थात खूप सार्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत असतात, तरीही फ्रिजमध्ये काय ठेवू नये, कोणत्या वस्तू ठेवाव्या त्याच्या वापरासंबंधी आपण इथे माहिती घेऊ. सर्वप्रथम फ्रिजमध्ये सगळ्या नाशवंत गोष्टी आपण ठेवत असतो. उदाहरणार्थ दूध, दही, कोल्ड्रींक्स वगैरे वगैरे. पण या व्यतिरिक्त आपण भाजीपाला, फळेही त्यात ठेवतो.
आता कोणत्या भाज्या त्यामध्ये ठेवू नये हे पाहू: टमाटर, काकडी, बटाटे, कांदे, लसूण जमल्यास अद्रक. पण, अद्रक जर बाहेर राहिली तर ती सुकून जाते. म्हणून अद्रक एका छोट्या डब्यात फ्रिजमध्ये बंद करून ठेवू शकतो. आता हे जे पदार्थ आहेत हे सगळे ओले किंवा ओल असणारे पदार्थ आहेत. त्यामुळे हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यास एक तर खराब होतात, नाहीतर या पदार्थांना खूप लवकर पाणी सुटते. म्हणून हे पदार्थ बाहेरच मोकळ्या टोपलीमध्ये ठेवावे. आता फ्रीजमध्ये बाकीच्या भाज्या एकतर त्या पॉलिथीनमध्ये पॅक करून ठेवाव्या किंवा कपड्यांनी कव्हर करून ठेवावे. कारण प्रत्येक गोष्टीला डब्यात ठेवतो म्हटलं, तर फ्रीजमध्ये हे शक्य होणार नाही. पण पॉलिथीनमध्ये ठेवताना, दर दिवशी जी भाजी करायची आहे ती एकतर पॉलिथीनला काही प्रमाणात पाणी सुटले असते, तेव्हा भाज्या अलगद काढून त्या स्वच्छ धुऊन काढाव्यात.
कारण कागदात किंवा तशाच भाज्या ठेवल्या, तर त्या सुकतात किंवा खराब झाल्या सारख्या वाटतात म्हणून त्या पॉलिथीनमध्ये ठेवलेल्याच बऱ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी फ्रिजमध्ये एक किंवा दोन दिवस पुरेल इतकाच साठा ठेवावा. शक्यतो फेरीवाल्याकडून ताजाच भाजीपाला घ्यावा तो एक किंवा दोन दिवसासाठी फ्रीजमध्ये भरून ठेवला तर काही हरकत नाही. मोकळ्या जागेतही टोपलीमध्ये जेव्हा आपण बटाटे, कांदे लसूण ठेवतो, ते मात्र एकाच कप्प्यात ठेवू नये वेगवेगळे ठेवावे. कारण कांदा आणि बटाटा जवळ ठेवला तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. टमाटर, काकडी यासारख्या मोकळ्या हवेत राहणाऱ्या भाज्याही बाहेरच ठेवाव्यात.
फळे एका वेळेस आपण किती खातो किंवा ते किती दिवस चांगले राहतील, याचा अंदाज घेऊन फळं घ्यावीत. एकाच वेळी अनेक प्रकारची फळे आपण भरपूर प्रमाणात खरेदी केली तर ते व्यवस्थित खाल्ल्ये जात नाही आणि खराबही होऊन जातात. म्हणून मोजकीच फळे आणावीत आणि ती खाऊन लवकर संपवावी. काही फळं दोन-चार दिवस सहजच चांगली राहतात. उदाहरणार्थ सफरचंद, पेरू पण जर का केळी, चिकू, पपई असेल व ती जास्त प्रमाणात पिकलेली असतील, तर ती खाऊन लवकर संपविलेली बरी. फळांना शक्यतो फ्रीजमध्ये ठेवू नये. द्राक्षासारखी फळे बाहेर ठेवावीत. आंबा मात्र एक दोन दिवस फ्रीजमध्ये सहज राहतो. पण, तो बाहेर काढल्यानंतर ओलसर असतोच, तेव्हा त्याला स्वच्छ धुऊन थोडा वेळ पूर्ववत तापमानात आल्यास तो खाण्यायोग्य होतो. (विदर्भाच्या तापमानानुसार हे अंदाज बांधले आहेत) एक गोष्ट लक्षात ठेवावी, फ्रिजमधून काढताच भाजीपाला असो किंवा फळं ती काही वेळ बाहेर ठेवल्यावरच खावीत.
आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ, पॅक केलेले तेलकट, मीठ, साखरयुक्त अन्नपदार्थ शक्यतो फ्रीजमध्ये ठेवू नये. ठेवले तर ते गरम करून खाऊ नये. फ्रोजन, फ्राइड, प्रोस्टेड मीट इत्यादी वारंवार गरम करून खाऊ नये. यामुळे लठ्ठपणा आणि शरीरात हार्मोनल बदल होतात. कधी कधी लहान वयामध्ये मधुमेह आणि थायरॉईडचा धोकाही वाढू शकतो. तसंही आजकाल प्लास्टिकच्या ताट, द्रोण इत्यादींमध्ये गरम पदार्थ वाढून घेऊ नये, हे सगळ्यांनाच माहीत असते. पण काही लग्नांमध्ये नाईलाजाने गरम पदार्थ खावे लागतात. मुलांना डबा देताना कितीही आकर्षक वाटले, तरी आणि मुलांनी हट्ट केला तरी अशा भांड्यांमध्ये गरम अन्न भरून देऊ नये. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला आणि काळजी घेऊन या गोष्टी केल्या तर फ्रीजचा योग्य उपयोग होईल.
आता सर्वात महत्त्वाचे खूप दिवस पर्यंत वस्तू टिकाव्या, त्या चांगल्या राहाव्या म्हणून खूप सारे पदार्थ फ्रीजमध्ये कोंबून ठेवले जातात काही गृहिणी तर रवा, मैदा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, आणखीन खाण्याच्या बऱ्याच वस्तू फ्रीजमध्ये खचून भरत असतात. त्यामध्येच काही औषधांच्या वेगवेगळ्या बॉटल्स इत्यादी, असे बरेच पदार्थ त्यामध्ये ठेवलेली असतात. असा फ्रिज बघितला तर जीव गुदमरल्यासारखा वाटतो. खचाखच भरलेल्या वस्तू बाहेरही चांगल्या राहू शकतात. डब्यांमध्ये मजबूत झाकण लावलेल्या वस्तू बरेच दिवस चांगल्या राहतात. त्या सवड मिळेल तेव्हा वाळू पण घालता येतात. अपवाद जिथे ऊन पडत नाही किंवा गगनचुंबी इमारतीमध्ये वास्तव्य असणाऱ्यांना पर्याय नाही, पण तरीही आठ, पंधरा दिवस काही वस्तू महिनाभर तरी बंद डब्यामध्ये चांगल्याच असतात. महिनों महिने पुरतील अशा वस्तूंची साठवण करून त्या फ्रिजमध्ये कोंडून ठेवू नये. प्रत्येक वस्तू साधारणत: मोकळी राहील अशाच ठेवाव्या, तरच आपण फ्रीजचा चांगला उपयोग करतो असे वाटेल.
मागच्या वर्षी मोठ्मोठ्या महानगरांमध्ये उदा. मुंबई सारख्या शहरांमध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवलेल्या विशेषत: प्लास्टिकमध्ये असणारे अन्नपदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्यामुळे तिथे शरीरावर विपरीत परिणाम झाल्याचे आढळले. अर्थात, ‘कॅन्सरसारख्या रोगास इथल्या स्त्रिया बळी पडल्या आहेत’, असे वाचनात आले. आता हा सर्वे 100% काही खरा नाही. परंतु, आजकालची जीवनशैली कामकाजी स्त्रियांना वेळ मिळत नसल्यामुळे बाहेरच्या तयार वस्तू वापरल्या जातात. कालांतराने याचे भयानक परिणाम शरीरावर उमटतात हे मात्र तितकेच खरे. मुंबईच्या दमट वातावरणात तिथे कोणतेही पदार्थ लवकर खराब होतात असा अनुभव आहे.
आजकालच्या स्त्रियांना हे सर्वच अर्थाने माहिती असते, परंतु उगीच दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याकडून या चुका वारंवार होतात म्हणून या गोष्टी कुटुंबासाठी तरी म्हणून काळजीपूर्वक केल्या पाहिजे. भाजीपाला, फळे (कांदा, लसूण, बटाटे सोडून) ह्या वस्तू आठ-दहा दिवस पुरतील व फ्रीजमध्ये चांगल्याच राहतील, म्हणून आणू नये. कारण ताज्या वस्तू आणि फ्रिजमधल्या वस्तू या मधला फरक आपल्याला कळतोच. महानगरांमध्ये आज खरेदी केले आज किंवा उद्या संपविले ही निती अवलंबविली तर बऱ्याच गोष्टी आपण टाळू शकतो.
जाता जाता सहजच एक गोष्ट मनात आली. किरकोळ भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांच्याशी वस्तूच्या किंमती विषयी जास्त घासाघीस करू नये, कारण त्यांचे उत्पन्न काही फार मोठे नसते, ही माणसं उन्हातान्हात फिरत असतात. एक दया भाव म्हणून घासाघीस न करता आनंदाने वस्तू खरेदी कराव्यात. कारण मॉलमध्ये मात्र आपण किंमत न पाहता वस्तू खरेदी करतच असतो. मोठा माणूस मोठा होत राहतो, पण छोट्या माणसाला समाधान लाभावे हाच उद्देश या मागे आहे. चला तर मग ही पण गोष्ट लक्षात ठेवू या..!! तूर्तास थांबते. भेटू या पुढील अशाच गमतीदार लेखात…!!
गजवंती सुभाष विघ्ने
बडनेरा, जि.अमरावती
(लेखिका या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत)
============



