मराठी भाषा: भविष्याचे आव्हान व संधी
सविता सचिन क्षीरसागर पीएमश्री जि. प. प्राथ. शाळा ओझर्डे तालुका वाई, जिल्हा सातारा

मराठी भाषा: भविष्याचे आव्हान व संधी
“माझ्या मराठीचा साज
नाही कोणत्या भाषेला
काना, मात्रा, वेलांटी उकार
यांनी शृंगारिले मराठी भाषेला “
वरील काव्यपंक्तीतून मराठी भाषेचे सौंदर्य-वर्णन व तिचा साज श्रृंगार रेखाटला आहे. माझ्या मराठीचा साज शृंगार जगातील कोणत्याही भाषेला नाही. काना, मात्रा यांची सुयोग्य गुंफण, वेलांटीरूपी रूपेरी पदर, उकारांनी सजलेली पैंजणे, भाळी शोभणारा कुंकवासवे अनुस्वार परिधान करीत माझी ‘माय मराठी’ डौलाने मिरवत आहे. एखादी अप्सराही तिच्या सौंदयापुढे फिकी पडावी, अशी माझी मराठी भाषा समृद्ध, संपन्न आहे.
संतश्रेष्ठ, भक्तशिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी ‘भावार्थदीपिका’ साकारली, मराठीचा गौरव करताना म्हणतात…
“मराठी माझी माय
गोड तिचा शब्दसुगंध
तिच्या ओव्या गाती वेद
तिच्याचि ज्ञानाचा सुगंध “
मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा इतिहास व परंपरेचा आत्मा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, शिवाजी महाराज, म.फुले, आगरकर, लोकमान्य टिळक अशा असंख्य विभूतींनी मराठी भाषेतून आपले विचार मांडले, समाजात परिवर्तन घडवून आणले. या भाषेने केवळ साहित्याचीच नव्हे; तर संस्कारांची परंपरा जपली आहे. मराठी भाषेच्या सौंदर्याचा गोडवा गाताना कवयित्री संजीवनी मराठे म्हणतात,
“माय मराठी ! तुझिया पायी
तनमनधन मी वाहियले,
तुझिया नामी, तुझिया धामी
अखंड रंगुनि राहियले”
मराठी ही केवळ महाराष्ट्रातील लोकांची भाषा नसून ती एक समृद्ध, सजीव आणि जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणारी भाषा आहे. सुमारे ८० लाखाहून अधिक लोक मराठीला आपली मातृभाषा मानतात, तर १० कोटींपेक्षा जास्त लोक ती समजतात. संतांच्या ओव्या, कवींच्या कविता, लोककला आणि आधुनिक तंत्रज्ञान या सर्व माध्यमातून काळानुरूप मराठी भाषेने स्वतःला विकसित केले आहे. मराठी भाषेची गोडी चाखताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात…
“माझ्या मराठीचा बोलू कौतुके,
परि अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळविन “
अमृतापेक्षाही गोड असणारी, नव्हे अमृताशीही पैज जिंकणारी माझी मराठी म्हणजे ज्ञानाचा झरा आहे, अखंड जळणारा नंदादीप आहे. या मराठीचे मोती वेचण्याचे काम कवी कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, केशवसुत, केशवकुमार अशा थोर साहित्यिकांनी केले.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात मात्र मराठी भाषेवर अनेक आव्हाने येऊन ठेपली आहेत. त्याचबरोबर नव्या संधींचेही दार उघडले आहे. आधुनिक काळात मराठी भाषेवर आलेले मोठे आव्हान म्हणजे इंग्रजी भाषेचे वर्चस्वः शिक्षण, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इंग्रजीचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणात होत आहे. पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढणारा कल यामुळे मराठी शाळांची संख्या कमी होत आहे. परिणामी मराठी वाचन, लेखन, बोलणे व मराठी अभिव्यक्ती यांचा सराव घटत आहे.
दुसरे मोठे आव्हान म्हणजे तरुण पिढीचा भाषेविषयी उदासीनपणा.आजची तरुण पिढी सोशल मीडियावर मराठीऐवजी ‘इंग्रजी- मराठी, मिश्रभाषा वापरते. इंग्रजी शब्दांची सर्रास घुसखोरी मराठी संभाषणात दिसून येत असल्यामुळे भाषेची शुद्धता व सौंदर्य कमी होत आहे. उच्च शिक्षण व संशोधन करण्यासाठी विद्यार्थी इंग्रजीचा आधार घेतात. या पार्श्वभूमीवर मराठीतील ग्रंथ, लेखनसाहित्य व शब्दसंग्रह विकसित करणे गरजेचे आहे.
मराठी माध्यमांची लोकप्रियता घटत चालली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर इंग्रजी व हिंदी भाषेतील सामग्री विपुल प्रमाणात आहे, तर मराठीतील गुणवत्तापूर्ण व आकर्षक डिजिटल साहित्य अजूनही मर्यादित आहे. यामुळे मराठी भाषेचा प्रचार व प्रसार कमी प्रमाणात होताना दिसतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते…
“डिजिटलच्या दुनियेत
मराठी थोडी विसरली,
इंग्रजी हिंदीच्या लाटेत
गोडी तिची कमी झाली.
तरुण पिढी ओढते
फक्त परदेशी शब्दांना,
मातृभाषा विसरली,
संस्कृतीही हरवली….”
आपण आपले सण, समारंभ, संस्कृती जपायला हवी. आज ‘व्हॅलेंटाईन डे’ तरूण पिढीला माहीत आहे; पण साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ‘कुसुमाग्रज’ म्हणजे अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, कविता यांचे उत्कृष्ट लेखन करणारे, मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्न करणारे, असामान्य व्यक्तिमत्व. ज्यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून ओळखला जातो, हे आजच्या तरूण पिढीला माहीत नाही, ही सर्वात मोठी खंत आहे.
या सर्व आव्हानांमध्येही मराठी भाषेच्या समृद्ध भविष्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. सर्वप्रथम ‘डिजिटल क्रांती’ ही मराठीसाठी मोठी संधी आहे. मोबाईल ॲप्स, डिजिटल ब्लॉग, ई-पुस्तके, युट्युब चॅनेल्स आणि पॉडकास्टद्वारे मराठी साहित्य, कविता, गाणी आणि बातम्या लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहेत. ‘मराठी विकिपीडिया’ सारख्या प्रकल्पांनी ज्ञानाचा मोठा खजिना मराठी भाषेत उपलब्ध करून दिला आहे.
शासनाचे प्रयत्नदेखील उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्र शासनाने ‘मराठी भाषा दिवस’ अधिक जोमाने साजरा करण्यास प्रारंभ केला आहे. अनेक शासकीय कामकाजात मराठीचा वापर सक्तीने लागू केला आहे. ‘मराठी भाषा संवर्धन समिती’, ‘मराठी भाषा गौरव दिन’ यांसारख्या उपक्रमांनी भाषेबद्दल जनजागृती वाढवली आहे. आज “जकातवाडी- कवितांचे गाव”, “पुस्तकांचं गाव-भिलार” यासारख्या सामाजिक प्रकल्पांमुळे मराठी भाषेचे संवर्धन केले जात आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही मातृभाषेतील शिक्षणाला नव्याने प्राधान्य दिले जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिले जाणे आवश्यक आहे. यामुळे मराठी भाषेला नवजीवन मिळू शकते आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढू शकतो. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातही मराठी भाषेची उपस्थिती झपाट्याने वाढत आहे. Google Translate, Chat GPT, AI (Artificial intelligence) यांसारख्या ॲप्समुळे मराठी भाषा आता जागतिक पातळीवरही सहज वापरली जात आहे. मराठी साहित्य, चित्रपट, नाटक, गाणी, वेबसीरीजही नव्या पिढीपर्यंत आधुनिक माध्यमांद्वारे पोहोचत आहेत. या सर्व क्षेत्रांमध्ये गुणवत्तापूर्ण मराठी निर्मिती वाढली तर भाषेचा प्रभाव व वापर आणखी बळकट होण्यास मदत होईल.
कवी ‘सुरेश भट’ मराठीचा महिमा वर्णन करताना म्हणतात…
आमुच्या घराघरांत वाढते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी.”
मराठी भाषेचे भविष्य केवळ सरकारच्या धोरणांवर नव्हे; तर आपल्या वैयक्तिक वर्तनावर अवलंबून आहे. आपण घरात, शाळेत, कार्यालयाल, मोबाईलवर व समाजमाध्यमांवर मराठीचा सन्मानाने वापर केला तर, ही भाषा अधिक तेजस्वी होईल. कोणत्याही भाषेचे सौंदर्य हे शब्दांतून झळकतेच, पण तिचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांमध्ये ते प्रभावीपणे दिसून येते. आपण जर मराठी भाषेत अभिमानाने बोललो, लिहित गेलो आणि वाचत गेलो; तर मराठी भाषा भविष्यात केवळ जिवंतच नाही, तर जगभरातील समृद्ध, संपन्न, तेजस्वी भाषेमध्ये गणली जाईल, शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते….
” जपूया आपली मराठी,
वाढवूया तिचा गौरव
नवे तंत्र, नवे ज्ञान वापरु
पसरवू तिला जगभर
पसरवू तिला जगभर….”
सविता सचिन क्षीरसागर
पीएमश्री जि. प. प्राथ. शाळा ओझर्डे
तालुका वाई, जिल्हा सातारा
==



