
माझ्या मनातील नेताजी
वाचत गेलो इतिहास,
आणि हरवत गेलो तुमच्या विचारांत.
माहित नाही का,
पण सुभाषबाबू, तुम्ही मला खूप जवळचे वाटता.
तुमचं जीवन म्हणजे जणू पेटलेला यज्ञकुंड—
ज्यात तुम्ही स्वतःला अर्पण केलंत,
पण भारताला स्वाभिमान देऊन गेलात.
गुलाम भारतात जन्म घेऊनही,
स्वतंत्र भारताचं स्वप्न पाहण्याचं
धाडस तुम्ही केलंत.
जग जिंकण्याची संधी होती,
पण तुम्ही निवडलंत मातृभूमीच्या
चरणातील काटेरी वाट.
तुम्ही म्हणालात, “रक्त द्या, मी स्वातंत्र्य देईन,”
आणि हजारो तरुणांनी मृत्यूशी मैत्री केली.
आजही वाटतं,
देशभक्ती शिकायची असेल तर पुस्तकं नकोत,
एकदा फक्त सुभाषचंद्र बोस यांचं आयुष्य वाचा!
काही माणसं इतिहास घडवतात,
काही इतिहासात लिहिली जातात,
पण तुम्ही असा इतिहास आहात,
जो प्रत्येक भारतीयाच्या रक्तात वाहत राहील.
गणेश ज्ञानेश्वर माशाळकर
जिल्हा कोल्हापूर
==========



