आठवणीतील पवित्र ‘ज्ञानमंदिर’
ज्योतीताई मोहनदास वाभीटकर गडचांदूर, ता. कोरपना, जि.चंद्रपूर

आठवणीतील पवित्र ‘ज्ञानमंदिर’
काही कामानिमित्त आज मी माझ्या गावी गेले होते. खूप वर्षांनंतर सहजच फिरता-फिरता माझ्या बालपणीच्या शाळेल अर्थात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिरापूर येथे भेट देण्याचा योग आला. शाळेच्या परिसरात पाऊल टाकताच मनाला एक विलक्षण शांतता लाभली. जणू काळाचे चक्र काही क्षणांसाठी थांबले आणि बालपणाच्या आठवणींनी अलगद मनाचा हात धरला. प्रशस्त प्रांगण, हिरवीगार वृक्षराजी, मंद झुळूक आणि त्या झुळुकीसोबत कानावर पडणारा पक्ष्यांचा मधुर किलबिलाट. या साऱ्या निसर्गसौंदर्याने मन अक्षरशः हरखून गेले. मनःशांती, प्रसन्नता आणि समाधान यांचा खरा अनुभव घ्यायचा असेल, तर अशा निसर्गरम्य जिल्हा परिषद शाळेसारखे दुसरे ठिकाण नाही, असे मनोमन वाटले.
शाळेतील प्रत्येक वर्गात ज्ञानदानाचे पवित्र कार्य अत्यंत तन्मयतेने सुरू होते. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पाठ शिकवत नव्हते, तर त्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करत होते. विद्यार्थीही उत्साहाने, जिज्ञासेने आणि एकाग्रतेने अध्ययनात रमले होते. कुठे प्रश्नोत्तरांची मैफल रंगली होती, तर कुठे शिक्षकांभोवती रिंगण करून शंकानिरसन सुरू होते. प्रत्येक चेहऱ्यावर शिकण्याचा आनंद आणि प्रत्येक वातावरणात शिक्षणाचा सुगंध दरवळत होता. त्या शाळेतील प्रत्येक कोपरा माझ्याशी काहीतरी बोलत होता. वर्गातील बाक, प्रार्थनेचे मैदान, अंगणातील झाडे आणि भिंतींवर उमटलेले संस्कारांचे रंग… सर्व काही पुन्हा एकदा बालपणाच्या गोड आठवणी जागवत होते.
नकळत माझे मन पुन्हा त्या निरागस दिवसांत हरवून गेले. त्या काही क्षणांनी मला आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा आठवणींची सुंदर शिदोरी दिली. मन पुन्हा एकदा बालपण जगले, डोळे नकळत ओलावले आणि हृदय कृतज्ञतेने भरून आले. आजच्या या भेटीने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसते; ती संस्कार, आठवणी, माणुसकी आणि आयुष्याला दिशा देणारे एक पवित्र मंदिर असते.
ज्योतीताई मोहनदास वाभीटकर
गडचांदूर, ता. कोरपना, जि.चंद्रपूर
========



