सकलजनांचे मन चिंब करण्या.. ये रे घना…; स्वाती मराडे
गुरूवारीय 'चित्र चारोळी' स्पर्धेचे परीक्षण
सकलजनांचे मन चिंब करण्या.. ये रे घना…; स्वाती मराडे
गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेचे परीक्षण
ये रे घना.. ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना..!
गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेसाठीचे चित्र पाहिले आणि मन गुणगुणायला लागले. चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभूंच्या या ओळी आशा भोसलेंच्या स्वरात ऐकताना मन अगदी गुंग होऊन जाते. याचा मतितार्थही तितकाच सुंदर.. ‘माझ्या मनात चुकूनमाकून प्रसिद्धीचा अहंकार वाढू नये आणि वाढलाच असेल तर ये रे घना आणि धुवून काढ माझ्या मना, शुद्ध कर त्याला.’ वरवर केवळ पावसाचे वर्णन वाटणाऱ्या या ओळीतील खरा अर्थ मनाचा ठाव घेणाराच आहे ना..!
आठवते का तुम्हाला गदिमांची कविता ‘नदीचे माहेर’. नदी सागरा मिळता, नाही येत बाहेर.. असं लोकांना वाटतं. पण डोंगराच्या अंगाखांद्यावर खेळणारी नदी सागराला जाऊन मिळते अन् पुन्हा माहेरीसुद्धा येते. तिचा बाप डोंगर तिला भेटायला आतुर होतो. तेव्हा नदीला तिच्या माहेरी घेऊन येतात ते हे घनच. त्यामुळे आकाशातील ढगांचे चित्र पाहून मला आठवले ते या बापाचे आसुसलेले डोळे. मग ते डोळे आपसूकच म्हणत असतील ना.. ‘ये रे घना… ये रे घना.’
कधी कधी उदास वाटतं. मनात घालमेल होते. कळत नाही काय झालंय, पण कुठूनतरी एखादी थंड झुळूक हलकेच यावी व मनावर फुंकर घालून जावी असे वाटू लागते. पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे असेच काहीसे.. मनातले हे ओझे हलके कसे व्हावे. दाटून आलेले मळभ अलगद ओघळावे नि मन हलके व्हावे.. ‘ये रे घना.. ये रे घना..’ डोळ्यातून ओघळणारे अश्रूरूपी हे घन मन नक्कीच हलके करतात. तर कधी कधी भवताल दु:खाने भारलेला असताना अचानक सुख ओंजळीत पडतं.. अन् डोळे पाझरू लागतात. जणू घन ओथंबून येतात. कधी हे घन सुखाचे असतात तर कधी दु:खाचे.. पण सुखात ओघळले की मन चिंब व दु:खात ओघळले की मनाचा भार हलका.
घन.. चिंब करणारे, भिजवणारे, आठव देणारे, थंडावा घेऊन येणारे, कधी सोबत पाऊस घेऊन येणारे, तर कधी केवळ मळभ होऊन गुरफटून बसणारे. तो बळीराजा अन् ती धरणीही घन पाहूनच सुखावतात. राने आनंदतात. मोर नाचतात. पण पावसाचे दिवस येऊनही जेव्हा ते येत नाहीत तेव्हा आभाळाकडे पाहून पशुपक्षी, झाडेवेली, धरणी, कृषीवल, सगळेच विनवणी करतात, मन चिंब करण्या.. सुखावण्या..
ये रे घना.. ये रे घना, किती पहावी वाट
संपू दे दुष्काळ आता, होऊ दे पाऊस पहाट..!
सध्या सुरू असलेला पावसाळा ऋतू व त्या अनुषंगाने आलेले स्पर्धेसाठीचे चित्र.. सर्वांनी केलेली त्याभोवतीची शब्दगुंफण मनभावनच. धरणीचं वाट पाहणं, बळीराजाचं वाट पाहून थकणं, आशेची पेरणी, पावसाची मनधरणी, कुठे व्यथा तर कुठे आनंदाचा झरा.. विविधांगी रूपांनी आजच्या रचना शब्दबद्ध झाल्या. आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
स्वाती मराडे,इंदापूर जि पुणे
मुख्य परीक्षक,कवयित्री,लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



