0
4
8
2
9
4
शब्दव्यूह
शब्दामध्ये असते ताकद
सारे काही बदलण्याची
शब्दखेळी करतात जेव्हा
होत्याचे नव्हते करण्याची ॥
शब्द नसावेत बाणासारखे
काळीज रक्तबंबाळ करणारे
शब्द नसावेत अग्नीसारखे
दुःखाने होरपळून टाकणारे ॥
शब्द असावेत मल्हमा सारखे
हृदयास फुंकर घालणारे
शब्द असावेत सुगंधासारखे
मनी सुखावह दरवळणारे ॥
शब्दांचाच खेळ सारा
जोडावे की तोडावे
वृत्ती असेल ज्याची जशी
तसे शब्दव्यूह रचावे ॥
शब्दव्यूहाचा जसा डाव
तसा इतिहास घडून गेला
शब्दव्युहातून अभिमन्यूस्तव
चक्रव्यूह रचला गेला ॥
शब्द असतील सामोपचाराचे
तरच घडतील सुसंवाद
शब्द असतील लावालावीचे
घडून येतील वादविवाद ॥
शब्दव्यूह रचला जावा
ज्यातून विश्वास प्रसूत व्हावा
माणूस माणसाशी जोडण्यासाठी
भक्कम विसावा देऊन जावा ॥
सरला टाले
राळेगाव, यवतमाळ
============
0
4
8
2
9
4



