“बाली इंडोनेशिया ट्रिप” भाग ४
वसुधा वैभव नाईक
“बाली इंडोनेशिया ट्रिप” भाग ४
बाली इंडोनेशियाचा चौथा दिवस दि. ३/०४/२०२५ रिसाटा रिसॉर्टवर नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासास निघालो. आमचा अस्तफा गाईड, डे ड्रायव्हर व गाडी हजर होते. आम्ही सर्व गाडीत बसलो. आम्हाला पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. आज आम्ही बिचेस पाहायला जाणार होतो.१) ब्रोकन बीच २) एंजल बीच ३) क्रिस्टल बीच ४) क्लिकिंग बीच. आणि लुसापेनिया आयलँड पाहायला चाललो होतो. गाडीत बसल्यानंतर हे नेमके कुठे आहे? आपल्याला किती वेळ लागणार आहे? हे सर्व आम्हाला अस्तफा गाईडने समजून सांगितले.
सर्वप्रथम आम्ही क्रिस्टल बीच येथे गेलो. क्रिस्टल बीचची जी रेती आहे ती चमकती रेती आहे. सुंदर निळेशार,हिरवट पाणी. पाणी इतके स्वच्छ होते की समुद्राचा तळ दिसत होता. खडकाळ भागाचे आर्च तयार झाले होते. अप्रतिम देखावा होता. तिथे आम्ही 20 ते 25 मिनिटं घालवली आणि पुढे ब्रोकन बीच पाहायला निघालो. ब्रोकन बीचला जाताना जो रस्ता होता जवळजवळ दोन किलोमीटरचा तो अगदीच ब्रोकन होता. म्हणजे अगदी खडकाळ असा वाटला आणि गाडी हलत होती. रस्ता खूप छोटा होता. रस्त्यावरून दुतर्फा येणारी वाहने होती. पण आजपर्यंत एकही एक्सीडेंट तिथे झालेला ऐकलेला नाही. सर्व वाहनांचा शिस्तीत कारभार चाललेला दिसला. कोणीही वाहनांचे हॉर्न वाजवत नव्हते. आम्ही सहा दिवस तिथे होतो पण एकदाही गाडीचा हॉर्न ऐकायला आला नाही. सर्व वाहने शिस्तीत आणि एका वेगात चालले होती. छोट्या टू व्हीलर मात्र मुंग्यांसारख्या मस्त वाट काढत चालल्या होत्या.
ब्रोकन बिचला पोहोचलो. तिथेच एंजल बिच सुद्धा आहे. ते नैसर्गिकरीत्या तयार झालेले सर्व आर्च पाहून मन मोहून जाते. निसर्गाचा हा नजराणा नयनी साठवून ठेवला. हृदयाअंतरी कप्प्यात भरून ठेवला. तिथेही आम्ही व्हीडिओ काढले, फोटो काढले. निसर्ग कॅमेऱ्यात साठवून ठेवला. हे निसर्ग देखावे अप्रतिम आहेत. तिथेच पुढे मग आम्ही क्लिकिंग बीच बघायला गेलो. नयनांचे पारणे फेडणारे हे दृश्य. अप्रतिम, उत्कृष्ट याशिवाय शब्दच नाहीत. निशब्द होतात शब्द इथे हे नजराने पाहून. मन मोहून जाते. तिथे तासंतास वेळ घालवावा असे वाटते. पण पुढील प्रवासासाठी आम्हाला तेथून निघावेच लागले. तेथील प्रसिद्ध ‘लुसापेनिया आयलँड ‘पाहायला गेलो. जवळ जवळ मिलेनियमच्या घरामध्ये दररोज पर्यटक तिथे भेट देत असतात. ही माहिती आम्हाला गाईडने दिली. आणि त्या परिसराचे महत्त्व सांगितले.
‘आयलँड म्हणजे माझा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे’. आयलँड वर 2019 साली अमेरिका येथे मी पोहोचले. त्यावेळी माझ्या डोळ्यातून अक्षरशः आनंद अश्रू वहायला लागले होते. कारण आयलँड वर पोहोचणे आणि आयलँड पाहणे हे माझे स्वप्न होते. आणि बालीच्या ह्या ठिकाणी पुन्हा मी आयलँड वरच गेले होते. हे ठिकाण आम्ही जीवनात विसरणार नाही. दुपारी आम्ही इंडोनशियन फूडचा स्वाद घेतला. आम्ही नेलेले मेथीचे ठेपले खाल्ले. जरा बाजारामध्ये फेरी मारली. रात्रीचे आठ वाजले. आम्ही रात्री ‘महाराजा’ या इंडियन हॉटेल वरती जेवण करायला गेलो. तिथे ऑर्केस्ट्रा चालू होता. आमच्या गाण्याच्या फर्माईश त्यांनी पूर्ण केल्या उत्तम भारतीय जेवणाबरोबर सुश्राव्य अशा गीतांची मेजवानी ही इथे आम्हाला मिळाली. जेवणानंतर आम्ही परत आमच्या रीसाटा रिसॉर्ट वरती आलो.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जिल्हा- पुणे
==========



