“जागरूक, संवेदनशील कवीमन, वन्यजीव संवर्धनाचे प्रभावी साधन”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू काव्य' स्पर्धेचे परीक्षण

“जागरूक, संवेदनशील कवीमन, वन्यजीव संवर्धनाचे प्रभावी साधन”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे परीक्षण
“जीवो जीवस्य जीवनम्” या न्यायाने चाललेली आणि भूचर,जलचर, व उभयचर अशा प्रकारात विभागलेली जीवसृष्टी म्हणजे पृथ्वीतलावरचे एक अजब गजब रसायन आहे. डोळ्यांनाही न दिसणार्या सूक्ष्म जंतू पासून ते महाकाय डायनॉसोर, देवमासे अशा प्राण्यापर्यंतच्या या अद्भूत जीवसृष्टीचा उदयास्त मात्र निसर्ग नियमानुसार परस्परांवर अवलंबून राहत अखंडपणे चालू आहे. कालौघात काही प्रजाती मात्र नामशेष झाल्या आहेत. आणि याला कारण नैसर्गिक जैवसाखळीत होणारा मानवी हस्तक्षेप हेच आहे. विशेष गोष्ट म्हणजे नामशेष होऊ पाहत असलेल्या काही प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काही वन्यजीव पशूपक्षीप्रेमी मानवच पुढाकार घेत आहेत.
पक्ष्यांच्या प्रजातीतील निशाचर या प्रकारात मोडणारी एक दुर्मिळ होत चाललेली प्रजाती म्हणजे घुबड. हा पक्षी रात्री जास्त वावरतो म्हणून याला निशाचर म्हटले जाते. घुबड हा विशेष पक्षी आहे, कारण याला भारतीय संस्कृतीत पौराणिक महत्त्व जितके आहे तितक्याच अंधश्रद्धेवर आधारीत अनेक मान्यता पण जनमानसात आजही रूढ आहेत. मानवी दृष्टीने घुबडाची अनेक शुभ अशुभ लक्षणे आहेत. मात्र एक विशिष्ट पक्षीजात म्हणून याच्याकडे पाहणे खूपच औत्सुक्यपूर्ण गोष्ट आहे. जगात फक्त घुबडाच्या दोनशेच्या आसपास उपजाती आहेत. आणि त्या सर्वच प्रदेशात आढळतात. याची कांही खास वैशिष्ट्य आहेत ती म्हणजे, याची पंखे अतिशय मऊ असल्याने उडताना फडफड असा आवाज होत नाही. याचे डोळे स्थिर आणि तिक्ष्ण दृष्टी असून शिकार शोधताना २७० अंशापर्यंत नजर स्थिर ठेवून मान वळवता येते. रात्रीच्या वेळी तीव्र श्रवणशक्तीमुळे भक्ष्याचा आवाज अचूक टिपला जातो. याचे डोके किंचित मोठे, चेहरा सपाट आणि वक्राकार चोच व नखे तिक्ष्ण असतात ज्याचा उपयोग भक्ष्यावर मजबूत पक्कड घेण्यास होतो. रात्री वावरणारे उंदीर, बेडूक, किटक, घूशी, लहान पक्षी हेच याचे मुख्य खाद्य असते.
काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेले चित्र अशाच एका दुर्मिळ होत चाललेल्या छोट्या कानाच्या घुबडाचे आहे. निबिड माळरानावरून हळूवार भरारी घेणारे हे घुबड एकाग्रता, शांतता, आणि स्वतःच्या शहाणपणाचे प्रतिक आहे. भोवताली पिवळे वर्तुळ असणारे डोळे धुक्यात आणि अंधारात सुद्धा आपले भक्ष्य शोधण्यात तरबेज नजर ठेवणारे असतात. गवताळ प्रदेशावरून एखाद्या पतंगाप्रमाणे हा पक्षी भक्ष्याचा शोधात उड्डाण करत असतो. चित्रात दिसणारा घुबड कुळातील हा लघुकर्ण घुबड एक देखणा पक्षी आहे.
भारतीय संस्कृतीत घुबड हा पक्षी लक्ष्मीचे वाहन असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे याचे अनेक शुभाशुभ संकेत आहेत. विशेषतः आजही घुबड दिसणे अशुभ मानले जात असले तरीही येणाऱ्या पिढीसाठी ही प्रजाती जपणे आपले कर्तव्य आहे. याकरिता जगभरात विशिष्ट उपक्रम राबवले जातात. ज्यातून अशा पशूपक्ष्याबददल मानवी मनात कुतुहल निर्माण केले जाते. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेत पक्षीफोटोग्राफीची एक अनोखी स्पर्धा घेतली जाते. ज्यातून काही दुर्मिळ पक्ष्यांचे नैसर्गिक फोटो पहायला मिळतात. ही स्पर्धा खूपच वास्तवदर्शी आणि कल्पक असते ज्यातून निसर्गातला बहुमूल्य क्षण अचूक टिपला जातो. अशाच एका स्पर्धेत परहम पौरहमद या सोळा वर्षांच्या फोटोग्राफरला २०२६ चा “यंग बर्ड फोटोग्राफर आॅफ दि इयर” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ज्याचा उद्देश जगभरातील पक्षी संवर्धन अभियानाला बळ देण्यासाठी केला जातो.
आ. राहुल दादांनी सुद्धा आपल्या समूहाच्या माध्यमातून अशीच एक सामाजिक नैतिक जबाबदारी नेहमीच उचललेली आहे. आपल्या काव्य कलेच्या माध्यमातून पक्षीसंवर्धनाचा मौलिक संदेश जनमानसात रुजविण्याचा हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या कल्पकतेला मनापासून सलाम आणि अशा स्पर्धेच्या माध्यमातून लेखन करणार्या हायकूकारांना सुद्धा मनापासून सलाम आहे. कारण एका महत्त्वपूर्ण अभियानाचा आपण छोटासा हिस्सा बनू शकतो. हायकू काव्य प्रकारातून याच जागतिक उपक्रमाला आपण बळ देऊया आणि पशूपक्षी प्रेम मनामनात रूजवूया.हीच अपेक्षा! आज मला हायकू परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार.!
विष्णू संकपाळ बजाजनगर
जिल्हा छ. संभाजीनगर
सहप्रशासक, मुख्य परीक्षक, कवी
मराठीचे शिलेदार समूह



