संविधान : एक आत्मपरीक्षण
संजय गरबड मराठे कवी, स्तंभलेखक उल्हासनगर, जि.ठाणे.

संविधान : एक आत्मपरीक्षण
भारतीय संविधानाने ७७ वर्षे पूर्ण करून ७८ व्या वर्षात पदार्पण केले असताना, ‘संविधान दिन’ हा केवळ औपचारिक सोहळा, भाषणांची मालिका किंवा ‘उद्देशिके’च्या सामूहिक वाचनापुरता मर्यादित राहता कामा नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने दिलेली घटनात्मक चौकट ही केवळ कायदेविषयक नियमावली नाही; ती एका सर्वसमावेशक, समताधिष्ठित आणि लोकशाहीवादी समाजव्यवस्थेची नैतिक व राजकीय रूपरेषा आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला, कलम ३९४ अंतर्गत काही तरतुदी तत्काळ लागू झाल्या आणि २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण संविधान अमलात आले. वसाहतवादी अधिपत्यातून स्वतंत्र, सार्वभौम आणि लोकशाहीवादी प्रजासत्ताकाकडे झालेली ही ऐतिहासिक वाटचाल समजून घेताना, आज संविधानाच्या शब्दांमागील मूळ आशय आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव यामध्ये किती अंतर पडले आहे, याचे प्रामाणिक, निर्भीड आणि अभ्यासात्मक परीक्षण करणे अपरिहार्य ठरले आहे.
संविधान निर्मितीचा आणि अंमलबजावणीचा इतिहास केवळ कालगणनेतील दोन तारखांमध्ये मर्यादित नाही; तो प्रशासकीय व कायदेशीर सार्वभौमत्वाच्या पुनर्रचनेचा प्रवास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि संविधान लागू होईपर्यंत देशाचा कारभार प्रामुख्याने ‘भारत सरकार कायदा, १९३५’ नुसार चालत होता. या कायद्याने केंद्र आणि प्रांत यांच्यातील अधिकारविभाजन, संघराज्यीय रचनेची प्राथमिक रूपरेषा आणि प्रशासकीय यंत्रणेची चौकट दिली असली, तरी तो मुळात ब्रिटिश साम्राज्याचे प्रशासन सोपे करण्यासाठी आणि केंद्रस्थानी वसाहतवादी सत्ता टिकवण्यासाठी रचलेला कायदा होता. २६ जानेवारी १९५० रोजी संविधानाने या कायद्याची जागा घेतली आणि देशाचा मूलभूत प्रशासकीय व घटनात्मक दस्तऐवज म्हणून भारतीय संविधान प्रतिष्ठित झाले; ज्यामुळे प्रशासनाचा केंद्रबिंदू शासकाची सोय यावरून नागरिकांचे हक्क, कल्याण आणि लोकशाही उत्तरदायित्व याकडे सरकला. त्याच दिवशी तात्पुरत्या स्वरूपात अस्तित्वात राहिलेल्या ‘भारताचे अधिराज्य’ या स्थितीचे ‘भारताचे प्रजासत्ताक’ मध्ये रूपांतर झाले. सर्वोच्च पद वंशपरंपरागत नसून लोकशाही प्रक्रियेतून निश्चित होणे आणि अंतिम सत्ता जनतेत व संविधानात निहित असणे, हा या परिवर्तनाचा गाभा आहे. संविधानाची ही स्वायत्तता केवळ राजकीय घोषणांपुरती मर्यादित न ठेवता तिला कायदेशीर आधार देण्यासाठी रचनाकारांनी कलम ३९५ ची तरतूद केली; ज्याद्वारे भारतीय स्वातंत्र्य कायदा, १९४७, भारत सरकार कायदा, १९३५ आणि त्यास पूरक ठरलेले ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द करण्यात आले. एखाद्या देशाच्या मूलभूत कायद्यांची मुळे परकीय संसदेच्या कायद्यांमध्ये गुंतलेली राहिल्यास सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते; कलम ३९५ ने हा वसाहतवादी कायदेशीर वारसा संपुष्टात आणून भारतीय संविधानाला स्वतःचे स्वतंत्र, मूळ आणि सर्वोच्च स्थान बहाल केले. २६ नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिन हे मूल्यांच्या स्मरणाचे व अभ्यासाचे प्रतीक आहे, तर २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन हे संविधानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे व नव्या युगाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे.
संसदीय लोकशाहीत कायद्याचे राज्य, अधिकारविभाजन आणि संस्थात्मक स्वायत्तता हे तीन आधारस्तंभ अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. न्यायपालिका, निवडणूक आयोग, नियंत्रक आणि महालेखापाल यांसारख्या घटनात्मक संस्थांना स्वायत्तता देण्यामागचा हेतू कार्यकारी मंडळाच्या संभाव्य मनमानीवर घटनात्मक अंकुश ठेवणे हा होता. परंतु, आज या संस्थांच्या निर्णयप्रक्रियेवर, निधी व अधिकारांच्या वापरावर आणि तटस्थतेवर समाजातून व अभ्यासकांतून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर, कायदेमंडळातील कामकाजाचा दर्जा हाही लोकशाहीच्या आरोग्याचा महत्त्वाचा निकष आहे. सभागृहांतील चर्चांचा दर्जा घसरणे, विरोधी मतांना पुरेसा अवकाश न मिळणे आणि महत्त्वाची विधेयके सखोल चिकित्सा व समिती छाननीविना घाईघाईने संमत होणे, ही घटनात्मक प्रक्रियेची चिंताजनक बाब आहे. लोकशाही केवळ ठराविक कालावधीने होणाऱ्या निवडणुकांनी टिकत नाही; तर ती संस्थात्मक विश्वसनीयता, पारदर्शकता आणि असहमतीच्या सन्मानातून जिवंत राहते.
संविधानाच्या कलम १४ ते १८ नुसार कायद्यापुढे सर्व नागरिक समान असले आणि भेदभावास मनाई असली, तरी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विषमतेची दरी अजूनही भक्कम आहे. संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नोंदवलेला विरोधाभास आजही तितकाच भेदक वाटतो; कारण राजकीय लोकशाहीतील ‘एक व्यक्ती-एक मत’ या तत्त्वाशी सामाजिक व आर्थिक जीवनातील विषमता अजूनही पूर्णपणे सुसंगत झालेली नाही. जात, धर्म, लिंग आणि आर्थिक स्तर यांवर आधारित भेदभाव, वंचित व दुर्बल घटकांवरील अत्याचाराच्या घटना, तसेच आरक्षणाच्या प्रश्नावरून समाजात निर्माण होणारे तणाव हे दर्शवतात की, समतेची लढाई केवळ कायद्याच्या कलमांपुरती मर्यादित राहून चालणार नाही. आर्थिक असमानतेची वाढती खाई आणि संधींची विषमता कमी करण्यासाठी सामाजिक न्याय हे केवळ घोषणेचे किंवा कागदावरील उद्दिष्टाचे रूप न घेता, ठोस धोरणात्मक प्राधान्य बनणे आवश्यक आहे.
नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार—विशेषतः कलम १९ अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलम २१ अंतर्गत जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार—हे लोकशाही समाजाला श्वास देणारे प्राणवायू आहेत. दुसरीकडे, कलम ५१-क मध्ये नमूद केलेली मूलभूत कर्तव्ये ही प्रत्येक नागरिकाच्या जबाबदारीची जाणीव करून देतात. आजच्या काळात एकीकडे पत्रकार, विचारवंत किंवा सामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती व असहमतीच्या आवाजांवर मर्यादा येत असल्याची भावना व्यक्त होते; तर दुसरीकडे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, कायद्याचे उल्लंघन, द्वेषमूलक विधाने आणि संवैधानिक मूल्यांची पायमल्ली यांसारख्या प्रकारांतून कर्तव्यांचा विसर पडल्याचेही दिसते. हक्क आणि कर्तव्ये यांचा समतोल साधणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाची सामूहिक नैतिक कसोटी आहे.
भारतीय संविधानाची रचना अर्धसंघात्मक असली, तरी केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंधांचा समतोल देशाच्या एकात्मतेसाठी व विकासासाठी कळीचा ठरतो. निधीवाटप, करांमधील राज्यांचा हिस्सा, राज्यपालांची भूमिका आणि कायदेविषयक अधिकार यावरून केंद्र व राज्यांमध्ये उद्भवणारे वाद संघराज्यवादाच्या मूलभूत तत्त्वांची कसोटी पाहतात. सत्तेचे विकेंद्रीकरण केवळ केंद्र ते राज्य इतक्याच पातळीवर मर्यादित न राहता, ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतराज आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचावे, हा संविधानामागील हेतू होता. मात्र, प्रत्यक्षात या संस्थांना पुरेसा निधी, स्पष्ट कार्यक्षेत्र आणि प्रत्यक्ष निर्णयस्वातंत्र्य किती प्रमाणात मिळते, हा गंभीर प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न होणे, प्रशासकीय हस्तक्षेप वाढणे आणि स्थानिक सत्तेचे केंद्रीकरण होणे यांमुळे तळागाळातील लोकशाही कमजोर पडते. खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरण साधल्याशिवाय सहभागात्मक लोकशाही पूर्ण होऊ शकत नाही.
नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणारी न्यायपालिका ही लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. मात्र, न्यायालयांमध्ये साचलेला कोट्यवधी प्रलंबित खटल्यांचा डोंगर, न्यायमूर्ती व आवश्यक पायाभूत सुविधांची कमतरता आणि खटले चालवण्याची संथ गती यामुळे वेळेवर न्याय मिळणे हा अधिकार कसोटीला लागतो. न्यायप्रक्रिया अधिक सुलभ, परवडणारी, पारदर्शक आणि वेगवान करणे, ही सामान्य नागरिकांच्या विश्वासासाठी अत्याश्यक बाब आहे. दुसरीकडे, बदलत्या काळाने नवी आव्हाने उभी केली आहेत. डिजिटल व्यवहारांचा विस्तार, माहितीची गोपनीयता, स्वयंचलित प्रणालीद्वारे होणारी पाळत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते प्रभावक्षेत्र यांमुळे कलम २१ अंतर्गत मान्य झालेल्या गोपनीयतेच्या अधिकाराचे व माहिती तंत्रज्ञानातील स्वातंत्र्याचे रक्षण कसे होईल, हा नवा घटनात्मक प्रश्न आहे. त्याचवेळी, हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड आणि जलसंकट या पार्श्वभूमीवर कलम ४८-क व कलम ५१-क(छ) मधील पर्यावरणीय जबाबदारी आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधणे, ही भविष्यातील पिढ्यांसाठी मोठी जबाबदारी ठरते. तसेच भारत हा बहुभाषिक, बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक देश असून, संविधानाने ‘विविधतेत एकता’ हे सूत्र स्वीकारले आहे; आठवी अनुसूची, भाषिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण या तरतुदींच्या पार्श्वभूमीवर भाषा, अस्मिता किंवा सांस्कृतिक श्रेष्ठत्वावरून निर्माण होणारे वाद टाळून विविधतेचा आदर करत राष्ट्रीय एकात्मता मजबूत ठेवणे आवश्यक आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ ते २६ जानेवारी १९५० हा काळ भारतीय इतिहासातील कायदेशीर हस्तांतरापेक्षाही अधिक खोलवरचा संवैधानिक पुनर्जन्म होता. भारत सरकार कायदा, १९३५ पासून ते कलम ३९५ अंतर्गत पूर्वीचे कायदे रद्द करण्यापर्यंत आणि अधिराज्यापासून प्रजासत्ताकापर्यंतचा हा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की, लोकशाही आणि स्वायत्तता ही कायमस्वरूपी मिळालेली देणगी नसून ती जागरूकता, संस्थात्मक विश्वसनीयता आणि संवैधानिक नैतिकतेतून सतत जपावी लागणारी जबाबदारी आहे. भारतीय संविधान हे केवळ भूतकाळातील एका ऐतिहासिक क्षणाचे फलित नसून, तो एक जिवंत दस्तऐवज आहे. प्रत्येक पिढीला आपल्या काळातील प्रश्नांच्या माध्यमातून संविधानाची नव्याने परीक्षा घ्यावी लागते; त्यामुळे संविधान दिन हा केवळ आत्मस्तुतीचा दिवस न राहता, तो आत्मपरीक्षणाचा आणि कायद्याच्या पुस्तकापलीकडे जाऊन समता, संवेदनशीलता व जबाबदारी अंगिकारण्याचा दिवस ठरला पाहिजे.
संजय गरबड मराठे
कवी, स्तंभलेखक
उल्हासनगर, जि.ठाणे.
========



