दीपावली: वास्तव आणि संस्कृती
संजय गरबड मराठे कवी,स्तंभलेखक उल्हासनगर, जि.ठाणे

दीपावली: वास्तव आणि संस्कृती
भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव हे केवळ करमणुकीचे साधन नसून ते मानवी जीवनमूल्यांचे, समाजजीवनाचे आणि अर्थकारणाचे अत्यंत सखोल प्रकटीकरण असतात. या सर्वोत्सवांमध्ये ‘दीपावली’चे स्थान सर्वोपरी आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या उदात्त आणि आध्यात्मिक भावनेतून जन्मलेला हा दीपोत्सव आज एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. एका बाजूला प्राचीन संस्कृतीचा समृद्ध वारसा, मानवी मूल्ये आणि आपुलकीचे धागे आहेत, तर दुसऱ्या बाजूला बाजारपेठेचे आक्रमक जाळे, यांत्रिक जीवनशैली आणि दिखाऊपणा यांच्या संघर्षात आजची दिवाळी अडकली आहे. या उत्सवाचे भूतकाळ आणि वर्तमानकाळातील स्वरूप तपासताना मानवी नात्यांपासून ते ग्रामीण अर्थकारणापर्यंत अनेक पदर उलगडत जातात, ज्याचे प्रामाणिक आत्मपरीक्षण करणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे ठरते.
दीपावलीच्या उजेडात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असला, तरी अनुभवाच्या पातळीवर जमीन-अस्मानाचा फरक आहे. सणाचा आनंद हा प्रत्येकासाठी सारखा नसून तो त्याच्या सामाजिक आणि आर्थिक वास्तवावर अवलंबून असतो. भारताचा शेतकरी खरीप पिकांच्या काढणीच्या अपेक्षेने या सणाकडे पाहतो. शेतातून पिकलेले धान्य बाजारात येईल आणि हातात पैसा येईल, यावर त्याच्या दिवाळीचे गणित असते. परंतु, अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव नसणे आणि वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे त्याच्या घरी आनंदाचे दिवे लागण्याऐवजी काळजीचे डोंगर उभे राहतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी समृद्धीची प्रार्थना करणारा बळीराजा वास्तवात महागाई आणि अनिश्चिततेच्या कात्रीत सापडलेला असतो.
असंघटित क्षेत्रातील मजूर, कारखान्यांतील कामगार आणि रोजंदारीवर जगणारे घटक यांच्यासाठी दिवाळी म्हणजे केवळ जगण्याची धडपड असते. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस आणि सानुग्रह अनुदान यामुळे बाजारात उलाढाल होते, परंतु दुसरीकडे हाच उत्सव कोट्यवधी गरिबांच्या वाट्याला आर्थिक विषमतेची नवी दरी घेऊन येतो. मुलांचे कपडे किंवा फटाके घेताना कामगाराला अनेकदा हात आखडता घ्यावा लागतो; त्यांचे हे श्रमच दीपावलीच्या उजेडामागील गडद पार्श्वभूमी असतात. मातीचे दिवे घडवणारे कुंभार, हाताने आकाशकंदील बनवणारे कारागीर आणि बांबूची कामे करणारे बलुतेदार हे दीपावलीचे खरे प्राण आहेत. मात्र, चायनीज प्लास्टिकच्या वस्तू आणि मशीनच्या स्वस्त उत्पादनांमुळे या हस्तकलेचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. दिवसभर माती तुडवणाऱ्या या कारागिरांची मेहनत आजच्या मशीनच्या युगात दुर्लक्षित होत चालली आहे. ‘स्थानिक ते जागतिक’ किंवा ‘लोकल फॉर व्होकल’ या घोषणा केवळ कागदावर राहिल्यामुळे घामाचा गंध असणारी ही कला आज अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे.
काळानुसार आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि पारंपरिक संबंधांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. पूर्वीच्या आणि आजच्या दिवाळीची तुलना करताना नात्यांमधील हा बदल मनाला चटका लावणारा ठरतो. पूर्वी पोस्टाची रंगीबेरंगी कार्डे शोधणे, त्यावर स्वहस्ते आत्मीयतेचे दोन शब्द लिहिणे आणि ती जपून ठेवणे यात एक वेगळाच रोमांच होता. आजच्या सोशल मीडियाच्या युगात एका क्लिकवर येणारे फॉरवर्डेड मेसेज आणि स्टिकर्सने संवादातील ओलावा मारून नेला आहे; संपर्क वाढला असला तरी माणसांमधील प्रत्यक्ष संवाद आणि जिव्हाळा हरवला आहे.
पूर्वी भेटवस्तू किंवा फराळाची देवाणघेवाण ही प्रेमाची आणि आदराची प्रतीके होती. आज त्याजागी ऑनलाईन शॉपिंग, डिझायनर ड्रायफ्रूट्स पॅकेट्स आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगने घेतली आहे, जिथे वस्तूच्या आत्मीयतेपेक्षा तिच्या किमतीवर आणि ब्रँडवर भर दिला जातो. संयुक्त कुटुंबपद्धतीत माहेरवाशिणीचे दिवाळीसाठी माहेरी येणे हा एक भावनिक सोहळा असे. सासरच्या कटकटींपासून दूर, आईच्या हातचा फराळ खाण्यासाठी आणि मोकळे श्वास घेण्यासाठी आतुरलेली माहेरवाशीण हा त्या काळातील आनंदाचा केंद्रबिंदू होता. आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीत आणि चाकरमानी संस्कृतीत ही ओढ केवळ ‘सुट्ट्यांचे नियोजन’ बनली आहे. दोन-तीन दिवसांच्या धावपळीत सासर आणि माहेर सांभाळताना तिच्या वाट्याला येणारा निवांतपणा आता दुर्मिळ झाला आहे. ‘भाऊबीजेचा दिवस म्हणजे अतूट प्रेमाचा सोहळा’. प्रवासाचे कितीही कष्ट असले तरी प्रत्यक्ष भेटून औक्षण करण्याची पूर्वीची ओढ आज व्यस्ततेमुळे ‘पेटीएम भाऊबीज’ किंवा कुरिअरच्या माध्यमातून औपचारिकता पार पाडण्याच्या पातळीवर येऊन ठेपली आहे. नात्यातील भावना तीच असली तरी व्यक्त करण्याच्या माध्यमांमध्ये व्यावसायिकता आली आहे.
पूर्वीची दिवाळी ही गल्लीबोळातील सामूहिक उत्सव होती. किल्ले बनवणे, शेजाऱ्यांमध्ये फराळ वाटणे आणि एकत्र येणे यामुळे समाजमनात एकोपा राहिला. आजच्या अपार्टमेंट किंवा फ्लॅट संस्कृतीत शेजारी कोण आहे हेदेखील अनेकदा माहीत नसते. सण साजरा करण्यापेक्षा तो सोशल मीडियावर कसा दिसेल, याचे प्रदर्शन आजच्या पिढीला महत्त्वाचे वाटते. महिलांच्या सहभागातून घरोघरी बनणारा घरगुती फराळ आणि त्यामागचा श्रमपरिहार हा संस्कृतीचा भाग होता. आजच्या धकाधकीत तो मॉलमधून येणाऱ्या रेडीमेड डब्यांनी बदलून टाकला आहे, ज्यामुळे परंपरेचा गोडवा कमी झाला आहे.
चिनी रोषणाई आणि फटाक्यांच्या अतिशयोक्तीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. अर्थात, आज तरुण पिढीकडून पर्यावरणपूरक दिवाळीची नवी जाणीव रुजत आहे, जी या बदलत्या पटावरील एक आश्वासक बाब आहे. दीपावलीचे स्वरूप बदलणे ही काळाची अपरिहार्यता असू शकते, कारण जग वेगाने पुढे जात आहे. परंतु, या परिवर्तनाच्या प्रवाहात आपण आपल्या संस्कृतीचा मूळ आत्मा, मानवी मूल्ये आणि जिव्हाळा गमावून बसलो आहोत. आज गरज आहे ती आधुनिकता आणि परंपरा यांच्यात सुसंवाद साधण्याची. जेव्हा आपण दिव्याचा प्रकाश केवळ स्वतःच्या घरापुरता किंवा सोशल मीडियाच्या स्क्रीनपुरता सीमित न ठेवता, तो अंधारात जगणाऱ्या शेतकऱ्याच्या, उपाशी कामगाराच्या आणि जगण्यासाठी झगडणाऱ्या पारंपरिक कारागिराच्या दारापर्यंत पोहोचवू, तेव्हाच खऱ्या अर्थाने दीपावलीचे सार्थकीकरण होईल. सण हा बाजाराचा हुकूमशाह बनण्याऐवजी माणसाला माणसाशी जोडणारा जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील सेतू राहावा, हाच या पर्वानिमित्तचा खरा विचार असला पाहिजे.
संजय गरबड मराठे
कवी,स्तंभलेखक
उल्हासनगर, जि.ठाणे
============

