खगोल शास्त्रज्ञ डॉ. श्री. सुहृद श्रीकांत मोरे या मराठी तरुणाचा दैदिप्यमान खगोल प्रवास
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
खगोल शास्त्रज्ञ डॉ. श्री. सुहृद श्रीकांत मोरे या मराठी तरुणाचा दैदिप्यमान खगोल प्रवास
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती.’
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
देहू येथील श्री. श्रीकांत मोरे व अलिबाग तालुक्यातील मुशेत गावच्या सौ. आशा श्रीकांत मोरे या दांपत्याच्या पोटी दि. २० अॉक्टोबर १९८३ रोजी डॉ. श्री. सुहृद श्रीकांत मोरे या अनमोल रत्नाचा जन्म झाला. श्री. श्रीकांत मोरे हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि आज ते सेवानिवृत्त आहेत. त्याचप्रमाणे सौ. आशा श्रीकांत मोरे या अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील श्री. स.म. वडके विद्यालयात सहाय्यक शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या आणि आज सेवानिवृत्त आहेत.
डॉ. श्री. सुहृद श्रीकांत मोरे हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे तसेच अभ्यासू व जिज्ञासू होते. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची वृत्ती त्यांच्यात ठासून भरलेली होती. त्यांचे केजी ते इयत्ता ६ वी पर्यंतचे शिक्षण इंडियन एज्युकेशन सोसायटीची शाळा, वरसोली – अलिबाग येथे झाले. इयत्ता ७ वी ते इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण जनरल अरुण कुमार वैद्य हायस्कूल – अलिबाग येथे झाले. इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी चे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज – पुणे येथे झाले. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [ आय. आय. टी. ], पवई – मुंबई येथे शिक्षण घेऊन सन २००५ मध्ये बी. टेक इन इंजीनियरिंग फिजिक्स ही पदवी संपादन केली.
पुढे त्यांनी जर्मनीमधील हाइडलबर्ग येथील मॕक्स प्लांक इन्स्टिट्यूट मधून खगोलशास्त्रात पी.एच.डी. पदवी संपादन केली. पुढे त्यांनी अमेरिकेतील शिकागो युनिव्हर्सिटी मधून पोस्ट डॉक्टोरल रिसर्च केले. नंतर जपान मधील टोकियो युनिव्हर्सिटीच्या कावली इन्स्टिट्यूट फॉर द फिजिक्स अँड मॅथेमॅटिक्स ऑफ द युनिव्हर्स मध्ये त्यांनी फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले.
त्यानंतर सन २०१८ मध्ये डॉ. श्री. सुहृद मोरे भारतात परतले आणि पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स [ आयुका ] मध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत.
डॉ. श्री. सुहृद मोरे हे मुख्यत्वे विश्वविज्ञान,आकाशगंगेची निर्मिती आणि उत्क्रांती यांवर संशोधन करतात. कृष्ण पदार्थ आणि कृष्ण ऊर्जा यांसारख्या गुढ घटकांवर त्यांनी काम केले आहे.
विश्वाचे २० ते २५ टक्के वस्तुमान व्यापणाऱ्या कृष्ण पदार्थांचा तपशीलवार त्रिमितीय नकाशा बनवण्यात खगोल शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाला यश मिळाले आहे. या संशोधन प्रकल्पात डॉ. श्री. सुहृद मोरे यांचा प्रमुख सहभाग होता. हा त्रिमितीय नकाशा तयार करण्यासाठी गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावातून प्रकाशाचे वक्रीभवन होणाऱ्या प्रक्रियेचा आधार घेण्यात आला होता. डॉ. सुहृद मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हायपर सुप्रीम कॅम सर्व्हे अंतर्गत हवाई बेटावरील ८.२ मीटर व्यासाच्या सुबरु टेलिस्कोप आणि ८२० मेगापिक्सलचा कॅमेरा वापरून अब्जावधी प्रकाश वर्षे दूर असणाऱ्या सुमारे एक कोटी दीर्घिकांची छायाचित्रे घेतली. या दीर्घिकांचा आकार तपासून त्यांच्या आकारात ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग मुळे झालेला अतिसूक्ष्म बदल नोंद केला. दीर्घिकांच्या आकारातील या बदलावरून आकाशाच्या ठराविक भागांमध्ये कृष्ण पदार्थांचे असणारे अस्तित्व तर सिद्ध झालेच पण त्या भागांमध्ये असणारे त्यांचे प्रमाणही समजले. कृष्ण पदार्थांच्या त्रिमितीय नकाशामुळे कृष्ण पदार्थांच्या स्वरूपाप्रमाणेच त्यांच्यामधील घडामोडींना कारणीभूत ठरणाऱ्या कृष्ण ऊर्जेविषयीही शास्त्रज्ञांना माहिती मिळत आहे. विश्वाच्या सुरुवातीच्या काळात दीर्घिकांची निर्मिती होण्याचा वेग किती होता, भविष्यात विश्वाचे प्रसरण किती वेगाने होईल हे समजण्यासाठी कृष्ण पदार्थांचे त्रिमितीय नकाशे उपयुक्त ठरतील.
डॉ. श्री. सुहृद मोरे यांनी नवव्या ग्रहाच्या शोधासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या गटासोबत काम केले आहे. या शोधासाठी हवाई बेटांवरील सुबरू टेलिस्कोप च्या मदतीने होणाऱ्या सर्वेक्षणात त्यांचा सहभाग होता.
आयुका येथे कृष्णविवरांवर आधारित विषयांवर त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून माहिती दिली आहे तसेच पुलस्त्य सायन्स फेस्टिव्हल मध्ये नवव्या ग्रहाचा शोध या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले आहे.
डॉ. श्री. सुहृद मोरे हे भारतीय राष्ट्रीय खगोल विज्ञान व विज्ञान अॉलिम्पियाड टिमच्या मार्गदर्शकांपैकी एक आहेत. ते भारतीय राष्ट्रीय खगोल विज्ञान आणि विज्ञान अॉलिम्पियाड मध्ये सहभागी झालेल्या संघाला मार्गदर्शन करणाऱ्यांपैकी आहेत.
मुंबईमध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अॉलिम्पियाड स्पर्धेतील ब्राँझ मेडल विजेत्या स्पर्धकांना डॉ. श्री. सुहृद मोरे यांच्या हस्ते ब्राँझ मेडल प्रदान करण्यात आली.
डॉ. सुहृद मोरे यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन शनिवार दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्र सरकारने त्यांना शांतीस्वरूप भटनागर विज्ञान युवा पुरस्कार – २०२५ जाहीर केला आहे.
डॉ. सुहृद मोरे यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले आहेत.
‘यशाच्या फुलांना स्पर्श करण्यासाठी आधी कष्टाच्या वाटा तुडवाव्या लागतात आणि संघर्षातून काट्यांना बाजूला काढावं लागतं.’ हे डॉ. सुहृद मोरे यांनी आपल्या उत्तुंग कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे. डॉ. सुहृद मोरे यांचा जीवन प्रवास आणि कर्तृत्व म्हणजे आजच्या युवकांसाठी प्रेरणेचा आणि सकारात्मकतेचा अनमोल स्त्रोत आहे.
डॉ. श्री. सुहृद मोरे यांच्या जिद्द, चिकाटी, परिश्रम, कुशाग्र बुद्धिमत्तेला, ज्ञानाला, विद्वत्तेला आणि उत्तुंग कर्तुत्वाला माझा आदरपूर्वक नमस्कार !
डॉ. सुहृद मोरे यांना घडविण्यात त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर केलेले सुसंस्कार, त्यांना केलेले योग्य मार्गदर्शन, केलेला त्याग व कष्ट अतिशय मोलाचे आहेत. त्यांचे वडील श्री. श्रीकांत मोरे व आई सौ. आशा मोरे यांच्या सुसंस्कारांना, मार्गदर्शनाला, त्यागाला आणि कष्टाला माझा आदरपूर्वक नमस्कार !
श्री. धनंजय सुनिता सुरेश भगत
मु. पो. – आवास जि रायगड





