तुम्ही कोणता दिवा लावणार?
स्वाती मराडे आटोळे ता. इंदापूर, जि.पुणे

तुम्ही कोणता दिवा लावणार?
दिवाळी म्हटलं की, डोळ्यासमोर येतात मातीच्या पणत्या. एका पणतीने घर उजळते, पण विचारांची पणती लागली तर आयुष्य उजळते. यंदा आपण फक्त तेलाचे नाही, तर विचारांचे दिवे लावूया. आणि कोण कुठला दिवा लावणार हे पणतीचं चित्र काढून त्याखाली लिहायचं असं वर्गात सांगितलं. लहानपणी आजी सांगायची, ‘दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तो एक संकल्प आहे’. त्याच विचारातून वर्गातील मुलांनी छोट्या पणत्यांसोबत दहा स्लोगन तयार केले आणि चित्र तयार झाले.
एक दिवा स्वाभिमानाचा.. आपण लक्ष्मीपूजन करतो. पण खरी लक्ष्मी कोण? स्वतःच्या कष्टावर उभी राहणारी ती. जेव्हा स्वकमाई होते, तेव्हा हातात फक्त पैसा नसतो, स्वाभिमान असतो. यंदा लक्ष्मीसोबत स्वाभिमानाचा दिवा लावूया. एक दिवा.. स्वप्नांचा… मनात स्वप्न असतं – शिकण्याचं, काहीतरी बनण्याचं. स्वप्नांचा दिवा तेवत ठेवा. पुढे जायला लावणारा. ‘स्व’ला एक नवे आयाम देणारा. एक दिवा शिक्षणाचा.. शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध. शिक्षण म्हणजे उत्कर्ष. प्रगतीचा मार्ग. या शिक्षणाविषयी जागरूक होऊया. हा दिवा अनंत तेवत ठेवूया. एक दिवा संस्काराचा.. संस्कार नसतील तर शिक्षणाची किंमत शून्य आहे. तेव्हा हा दिपक मनामनात लावूया. एक दिवा आरोग्याचा.. सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस खऱ्या अर्थाने दुर्लक्ष करतो ते आरोग्याकडे. नको त्या आहाराच्या आहारी गेल्याने होणारी आरोग्याची हेळसांड थांबवूया.
एक दिवा – विश्वासाचा.. हा दिवाही मुलांना खूप आवडला. एका मुलाने सांगितलं, “मी विश्वासाचा दिवा लावणार, म्हणजे मी खोटं बोलणार नाही.” एक दिवा स्वच्छतेचा… स्वच्छता फक्त अंगणाची नाही, तर मनाची पण. एक दिवा मदतीचा.. केवळ, सहानुभूतीचे शब्द नव्हे तर प्रत्यक्ष मदत देऊया. एक दिवा माणुसकीचा.. मातीत मळले हात ज्यांचे त्यांना उचलून घेऊया. दिप माणुसकीचा लावूया. एक दिवा संस्कृतीचा.. आपली संस्कृती ही आपली ओळख आहे. थोर संस्कृती आपली जतन तिचे करूया.
जेव्हा दहा मुलं हातात पणत्या घेऊन “एक दिवा एकतेचा, एक दिवा समानतेचा” म्हणतात, तेव्हा खरी दिवाळी साजरी होते. कारण अंधार फक्त घराबाहेर नसतो, तो मनातही असतो. फक्त दहाच नव्हे तर मग आणखीही बरंच काही सुचलं मुलांना. एक दिवा निसर्गाचा, एक दिवा सैनिकांचा, एक दिवा समतेचा, एक दिवा एकतेचा. या पणत्यांनी केवळ वर्गखोली उजळली नाही, तर दहा मनंही नक्कीच उजळली. या दिवाळीत आपणही एक संकल्प करूया. फटाके, फराळ सगळं होईलच. पण सोबत एक विचाराचा दिवा लावूया. जो फक्त उजेड देणार नाही, तर एक नवी दिशा देईल.
स्वाती मराडे आटोळे
ता. इंदापूर, जि.पुणे
========

