दीपावली महात्म्य
अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

दीपावली महात्म्य
“उजळू या लक्ष लक्ष दीप सारे
करू या मने ही स्वच्छ सारे,
निर्मळ मनाने करू या दिवाळी साजरी
दीपोत्सव करील तेजोमय धरती सारी”
आज माझ्या मुलाने मला विचारलं, “आई, दिवाळी साजरी करण्याचा नेमका उद्देश काय?” तेव्हा मी त्याला सांगितलं, की 14 वर्षांच्या वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येत परतले, तो दिवस म्हणजे अश्विन शुद्ध अमावस्या. अयोध्येतच नव्हे; तर संपूर्ण भारतामध्ये दिव्यांची आरास करून, दीपपूजन घराघरात मिठाई बनवून दिवाळी साजरी केली जाते. तेव्हा तो म्हणाला की, ‘मग या दिवशी लक्ष्मीपूजन का केले जाते? लक्ष्मीची पूजा का केली जाते?’ प्रभू श्रीराम आणि सीता मातेची पूजा का नाही? दुसरे म्हणजे, दिवाळीला लक्ष्मीसोबत गणेशाची पूजा का केली जाते, भगवान विष्णूची का नाही?
या प्रश्नांची उत्तरं देताना मात्र मी निरुत्तर झाले. आणि मग थोडीशी माहिती जमवून त्याला थोडंसं दिवाळी महत्व सांगितलं. खर तर दिवाळी हा सण सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन युगांशी संबंधित आहे. सत्ययुगात समुद्रमंथनामुळे त्या दिवशी माता लक्ष्मीदेवी प्रकट झाली होती, म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. त्रेतायुगात या दिवशी प्रभू श्रीरामही अयोध्येला परतले, तेव्हा अयोध्येतील लोकांनी घरोघरी दिवे लावून त्यांचे स्वागत केले, म्हणून त्याचे नाव ‘दीपावली’ आहे. त्यामुळे या पर्वाची दोन नावे आहेत. लक्ष्मीपूजन जे सत्य युगाशी संबंधित आहे आणि त्रेतायुगातील प्रभू श्रीराम आणि दिवे यांच्याशी संबंधित दुजा दिवाळी. माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे नाते काय आणि दिवाळीत या दोघांची पूजा का केली जाते? सागरमंथनात माता लक्ष्मी प्रकट झाली. भगवान विष्णूनी त्यांच्याशी लग्नकेले आणि त्यांना सृष्टीची धन संपत्तीची आणि ऐश्वर्याची देवी बनवण्यात आले.
माता लक्ष्मीने धन संपत्ती वाटण्यासाठी कुबेराला आपल्यासोबत ठेवले. कुबेर खूप कंजूष होता, त्याने धन वाटलेच नाही. तो स्वतःच धनाचा भंडारी होऊन बसला, हे पाहून माता लक्ष्मी दुःखी झाली. त्यांनी आपली व्यथा भगवान विष्णूना सांगितली. भगवान विष्णूंनी सांगितले की, ‘कुबेराच्या जागी संपत्ती वाटण्याचे काम दुसऱ्यावर सोपवा’. त्यावर लक्ष्मी देवी म्हणाली की, ‘यक्षांचा राजा कुबेर हा माझा महान भक्त आहे, त्याला वाईट वाटेल. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना गणपतीच्या अफाट बुद्धीचा उपयोग करून घेण्याचा सल्ला दिला’. माता लक्ष्मी देवीने गणेशाला कुबेरासोबत ठेवले. गणेश अतिशय बुद्धिमान होते. ते बोलले, “माताश्री, मी तुम्हाला कोणाचेही नाव सांगेल, त्यांना तुम्ही कृपा आशीर्वाद द्या”. मला कुठलाही उलट किंतू परंतु प्रश्न विचारू नका. माता लक्ष्मी हो म्हणाल्या व गणेशाने लोकांच्या धन सौभाग्याचे अडथळे दूर करण्यास सुरुवात केली. कुबेर फक्त पाहत राहिला आणि अशा प्रकारे कुबेरांच्या भांडाराची द्वारे गणेशाने उघड केली.
भगवान गणेशाची आपल्या भक्तांप्रती असलेली प्रेमळ कृपा पाहून माता लक्ष्मीने आपला मानसपुत्र श्री गणेश याला आशीर्वाद दिला की, ज्यावेळी माझे पती नारायण माझ्या सोबत नसतील त्यावेळी माझा पुत्र म्हणून तू माझ्यासोबत रहावे. दिवाळी अश्विन अमावस्येला येते, त्यावेळी भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात, ते अकरा दिवसांनी देवशयनी एकादशीला जागे होतात. शरद पौर्णिमा आणि दिवाळी या मधील पंधरा दिवसांत माता लक्ष्मीला पृथ्वी भ्रमण करण्यासाठी यावे लागते, म्हणून त्या आपला मानसपुत्र गणेशाला सोबत घेऊन येतात, म्हणून दिवाळीला लक्ष्मी गणेशाची पूजा केली जाते. अशी माहिती त्याला सांगितली खरी पण त्याचे समाधान होईच ना!
मग माझ्या मनातल्या कल्पनेने मी त्याला म्हणाले, ‘नभात जरी अमावस्या लुप्त जरी चंद्र तारे सर्व दिव्यांनी उजळून धरा’. साजरे करू प्रकाश पर्व चहू दिशां प्रकाशूनी प्रेम गंधाची करू या शिंपडण. आपुलकीच्या नात्याने माणूसपण जपू या सारेजण. भावस्पर्शी शब्दांच्या सुंदरतेने स्नेहमय होईल दुनिया. उधळण करीत आनंदाची साधू या आपण ही किमया. हात देऊनी सहाय्याचा मदत करूया गरजूंला, दिवाळी म्हणजे असतं काय कळेल त्यासी या दिवाळीला. मनामनांत त्याच्या पसरेल तेजोमय प्रकाश. दीपोत्सव हा घेऊन येईल त्यांचा उत्कर्ष..”! त्याच्या मनाचे समाधान झाले की नाही माहित नाही; पण मी मात्र मनाचे समाधान करून कामाला लागले….!!
‘दीपावलीच्या सर्वांना तेजोमय शुभेच्छा..!’
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
===========

