आभारातून व्यक्त व्हावे,मुक्त व्हावे,समूहाचे देणे समूहास वहावे: कवयित्री संध्या पाटील

आभारातून व्यक्त व्हावे,मुक्त व्हावे,समूहाचे देणे समूहास वहावे: कवयित्री संध्या पाटील
झाला सन्मान
मराठी भाषा दिनी
धन्य लेखणी..
सर्वप्रथम आज २७ फेब्रुवारी..प्रसिद्ध कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त महान व्यक्तिमत्त्वास मानवंदना अर्पण करीते आणि आपणा सर्व शिलेदार परिवारातील साहित्यिक माननीय बंधू -भगिनींना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
व्यक्त न होणे
होतेच ठरविले
मन हरले..
२२ ऑगस्ट आईसाठी शेवटचा दिवस ठरला…आणि माझ्या मनात कोणता भावच नाही उरला..तिचे आम्हांस गाफील ठेऊन जाणे.. अजूनही शक्य झालेले नाही ते दुःख पचविणे.. जरी ती पंचाहत्तरीची झाली होती.. तरी अशी तडकाफडकी निघून जाण्याची वेळ आलेली नव्हती…कोण म्हणतं आईला वय असतं..नाही..आईला कधीच वय नसतं…किती बरं झालं असतं जर देवाने तिला अमरत्व दिलं असतं..आता कितीही मन रडलं..त्या विधात्याशी रोज भांडलं..तरी काही उपयोग नाही..गोड आठवणीतच हुंदका दाटून राही… जन्म -मृत्यू निसर्गाचा आहे नियम..तरीही वाटतेच की आई असावी सोबत कायम.. तिची जागा कोणी घेऊ शकत नाही.. आयुष्यभराची ती पोकळी तशीच राही… मला तर अजूनच कमी मिळाला हा पवित्र मायेचा सहवास… भाग्यवंत म्हणायला परमेश्वराने राहू दिले नाही हे कारण खास… जन्मदात्यांचे असे अकाली जाणे..शक्य नाही या वेदना शब्दात मांडणे.. नको वाटते पुन्हा वाचकांनाही दुखावणे…. बरे आहे इथेच लेखणीचे थांबणे..बरे आहे इथेच लेखणीचे थांबणे…!
कालचे हायकू चित्र असेच काहीचे वाटले की जोपर्यंत सांसारिक जबाबदाऱ्या असतात तोपर्यंत कुटुंबच परमार्थ वाटत असतो.. परंतु मुले मोठी होतात, आपापल्या मार्गी लागतात, आपलेही वय होते, त्यात सहजीवनाचा एक साथीदार निघून गेला तर अजूनच हा जीवन प्रवास एकाकी पार करणे कठीण होते.. तेव्हा वाटते की निघावे आता पंढरीच्या वाटेला.. विठुमाऊलीच्या भेटीला..आणि डोळ्यासमोर आई आली.. असे वाटले की तीही या मोहातून सुटली.. तिनेही पंढरी गाठली..आणि त्यानुसार लेखणीतून भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न केला….
आईच्या जाण्याने मानसिक अवस्था खूप खराब झाली होती.. थोडे दिवस आश्रमात जाऊन राहत होती, मेडिटेशन, गुरुकार्य यात स्वतःला गुंतवून घेतले होते.. तेव्हापासून माझं समूहात वाचन, लिखाण पूर्णपणे बंद होते..एरव्हीही माझी हजेरी कमीच असते…परंतु माझ्या बाल मित्र -मैत्रिणी आणि माझे काव्यगुरु प्रिय स्वातीताई, आदरणीय विष्णूदादासाहेब यांनी सतत विचारपूस करीत मला लिखाणासाठी प्रोत्साहित केले.. तसेच आदरणीय गायकवाड दादाही तब्बेतीची चौकशी करत लिखाणास प्रेरणा देत गेले..म्हणून एखाद्या दिवशी इच्छा झाली तर लिहिते..तसेच आजही काहीसे झाले…तरीही माझ्या लेखणीचे नेहमीच समूहात स्वागत होत असते व वेळोवेळी सन्मानित ही केले जाते… आपल्या सर्वांसाठी मन मोकळे करण्यास तितकेच लिखाणात मन गुंतवून सुखात वाटेकरी आणि दुःखाचा भार काही प्रमाणात हलका होण्यासाठी हे हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिले ते म्हणजे आपले समूहाचे सर्वेसर्वा, मुख्य संपादक, प्रशासक आदरणीय राहुल पाटील सरांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते…खूप खूप धन्यवाद सर…
या शिलेदार समूहातून ९०% गैरहजर राहणाऱ्या माझ्यासारखीचा काव्यसाधना प्रकाशित करून मला कवयित्रीचा सन्मान बहाल केला आहे… आणि सर्वात जास्त आनंद हा आहे की आईला माझा पुस्तक वाचण्याचा आनंद मिळाला .. मागच्या वर्षी ७ मे रोजी छ.संभाजीनगर येथे पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला, ८ मे ला मी आईला धुळे येथे भेटली. माझं पुस्तक तिला दिले.. मात्र दुर्दैवाने ती आमची शेवटची भेट ठरली… मग रोज रचना वाचून झाली की ती मला कॉल करायची ..तुझ्या रचना वाचून मला तुझं खूप कौतुक वाटतं आणि रडायलाही येतं असं म्हणायची… कारण बऱ्यापैकी रचना स्वानुभवातून लिहिल्या गेल्यात…
असो .. हे असे होते शेवटी विषय आईवरच येऊन थांबतो…😌
आदरणीय राहुल दादांचे पून:श्च
मनापासून आभार..🙏🏻🙏🏻🙏🏻तसेच संस्थेच्या सचिव आदरणीय पल्लवीताई, मुख्य परीक्षक आ.सविता ताई, आ. स्वातीताई, आ. शर्मिलाताई, आ. वृंदाताईसो, आ.तारकाताई, आ. प्रतिमाताई..तसेच आ. विष्णूदादा,आ. संग्रामदादा,आ. प्रशांतजी ठाकरे दादा, आ.उरकुडे दादा, आ.अशोक दादा आ.हंसराज दादा आणि संपूर्ण प्रशासकीय मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करते ..खूप खूप धन्यवाद..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तसेच समूहातून शुभेच्छा देऊन हायकू रचनेचा मान वाढविला..त्याबद्दल सर्व आदरणीय ताई, दादांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.
सौ.संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर गुजरात
मराठीचे शिलेदार समूह सदस्या



