एक प्रेरणादायी अनुभव देणारी सहल
सौ.अनिता व्यवहारे
एक प्रेरणादायी अनुभव देणारी सहल
‘सहल’ अगदी सहज सुलभतेने उच्चारला जाणारा शब्द. “सहल म्हणजे आपले मित्र मैत्रिणी आप्त इष्ट यांच्यासोबत मनोरंजनार्थ मारलेला फेरफटका”. यातून मिळणाऱ्या आनंदाचे मोल तोलता येणार नाही. म्हणूनच आमच्या ‘क्रांतीज्योती महिला’ मंडळांतील सख्यांनी सहलीला जायचे ठरविले. आमच्या मंडळाचे नावच मुळी सावित्रीबाईंच्या सन्मानार्थ ठेवलेले. “नायगावच्या या लेकीने शिक्षणाची पेटवली मशाल’ तिच्या शिक्षण कार्याने उजळले भारतीय स्त्रियांचे भाळ”. त्यामुळे सावित्रीबाईंच्या जन्म गावी सहल न्यावी, असा आमच्या महिला मंडळातील मैत्रिणींचा ध्यास. म्हणूनच तर 10 मार्च सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून आम्ही नायगाव येथे सहलीला जायचे ठरविले.
दरवर्षी आम्ही श्रीरामपूर येथील सावता महाराज चौकात सावित्रीबाईंच्या जयंती पुण्यतिथीला त्यांना अभिवादन करण्यासाठी जमत असतो. आज मात्र सहलीला जायचे असल्याने पहाटे पाच वाजता आम्ही सर्व महिला श्रीरामपूर येथील सावता महाराज चौकात जमा झालो. इथे आजही व्यासपीठ उभारून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी त्यांचा फोटो ठेवलेला होता. आमच्यासाठी तर ही एक आनंदाची पर्वणीच होती. मग काय तिथे देखील आम्ही सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन केले. आणि सहा वाजता पुढील प्रवासाला निघालो. आजची ही सहल नक्कीच अविस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरणार याची खात्री झाली. आम्ही सर्व सख्या खूप आनंदात होतो. कारण आजचा हा दिवस म्हणजे सोमवार एकादशी आणि त्यात सावित्रीबाईंची पुण्यतिथी… असा तिहेरी पवित्र संगम.!
पुढे मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन त्यानंतर सोमेश्वर येथील श्री शंकरांचे दर्शन घेऊन पुढे निघालो… जणू देवालाही आमच्या या सहलीचे कौतुक वाटले असावे, म्हणून साक्षात देवदर्शन झालं होतं. परमेश्वराचे आशीर्वाद घेऊन मजा करीत पुढे जात होतो. दुपारचा एक वाजला असेल..!! पोटात कावळे ओरडत होतेच. काही वेळातच आम्ही निरा येथे पोहोचलो तेथे माझे मेहुणे सुहास शिंदे व बहीण सौ शैला शिंदे यांनी ‘अतिथी देवो भव’ या संकल्पनेतून आमचे आदरातिथ्य केले. तेथे पोटपूजा करून, पाहुणचार घेऊन आम्ही काही वेळातच नायगांव येथे पोहोचलो. गावात प्रवेश करतात वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवली. सावित्रीबाईंच्या कार्याचा ठसा अजूनही गावाने जपलेला होताच.
“संस्कार ज्ञान समतेचा दिला तिने सन्मान,
नायगावचे भाग्य उजळले सावित्रीबाईच्या जन्मानं”
त्यांच्या जन्मस्थळी पोहोचल्यावर तेथील सरपंचा मा. सौ. स्वाती जमदाडे आणि त्यांच्या सदस्यांनी जेव्हा आमचा सत्कार आणि सन्मान केला; तेव्हा सावित्रीच्या लेकी असल्याच्या अभिमानाने उर भरून आला. त्यांच्या जीवन प्रवासाची आठवण झाली. एका अशिक्षित स्त्री दुर्दशेने ग्रासलेल्या समाजाला सुधारण्यासाठी सावित्रीबाई कशा झगडल्या असतील याची जाणीव झाली.त्यांच्या जिद्दीमुळेच आज आपला स्त्री-पुरुष सन्मान हक्काबद्दल झगडू शकतो हे ही पटलं. तिथे असलेल्या सावित्रीबाई फुले ज्योतिबाराव फुले यांच्या स्मारकाला वंदन केले. तिथे उभारलेल्या शिल्पसृष्टीतून त्यांच्या संपूर्ण कार्याचा परिचय झाला. त्यानंतर गावातील लोकांशी संवाद साधला. त्यांच्या आठवणी, त्यांच्या कार्याची प्रेरणा ऐकताना अंगावर काटा आला. शाळा सुरू करून मुलांना शिक्षण देण्याचा संघर्ष केवळ प्रेरणादायी नाही तर आमच्यासाठी जबाबदारीची जाणीव करून देणारा वाटला.
ही सहल केवळ एक प्रवास नव्हता तर स्त्री शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि संघर्षाचे महत्व समजून घेण्याची जणू संधीच होती. सावित्रीबाईंनी दाखवलेल्या मार्गावर आपण चाललो तर त्यांचे कार्य नक्कीच पूर्णत्वास जाईल हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून… “अंधाराचा काळ गेला शिक्षणाचा उजेड झाला”, सावित्रीबाईंच्या याचं प्रेरणे मुळे ज्ञानाचा मार्ग सुफळ झाला.” मंडळातील आम्हा सर्व मैत्रिणींना एक नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली होती. मा. सरपंच, गावकरी यांचे शतशः आभार मानून आणि त्यांचा यथोचित सन्मान करून आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघालो. त्यानंतर ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वाई येथील नवसाला पावणाऱ्या गणरायाचे दर्शन घेऊन. सातार मुक्कामी निघालो दुसऱ्या दिवशी देखील अशाच एका ठिकाणी जायचे होते ते म्हणजे गड किल्ले आणि त्यावरूनच आपल्याला स्वराज्य मिळवून देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांपैकी एक असलेला अजिंक्यतारा किल्ल्याच्या भेटीला.. त्याचे अनुभव मांडणार आहेच. पण पुढील लेखात..!!
सौ.अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर



