Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

अंधश्रद्धा आणि बुवाबाजी : विवेक हरवलेली श्रद्धा

अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर, जि अहिल्यानगर

0 5 4 7 7 9

अंधश्रद्धा आणि बुवाबाजी : विवेक हरवलेली श्रद्धा

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर, जि अहिल्यानगर

ऐसे कैसे झाले भोंदू,
कर्म करोनी म्हणती साधू…
अंगा लावूनि या राख,
डोळे झाकूनी करिती पाप…
तुका म्हणे सांगू किती,
जळो तयांची संगती!”

‘संत तुकाराम महाराज’ यांच्या या अभंगातील ओळी आजच्या वास्तवावर अगदी अचूक बोट ठेवतात. हल्ली अंधश्रद्धा आणि बुवाबाजीचं वाढत चाललेलं प्रस्थ पाहिलं की या ओळींचं महत्त्व अधिकच प्रकर्षाने जाणवतं.

भारत हा श्रद्धेचा देश आहे. ही श्रद्धा माणसाला मानसिक आधार देते, जगण्याची दिशा देते. पण जेव्हा हीच श्रद्धा विवेक हरवून आंधळी बनते, तेव्हा ती अंधश्रद्धेत रूपांतरित होते. कोणताही वैज्ञानिक आधार नसताना, तर्क न लावता आंधळेपणाने विश्वास ठेवणं, हीच अंधश्रद्धेची खरी ओळख. आजही आपण मांजर आडवं गेलं, विधवा समोर आली तर अपशकुन झाला असं मानतो. गळ्यात ताईत, अंगारे-धुपारे, तंत्र-मंत्र यामागे धावत सुटतो. भीती, अज्ञान आणि असुरक्षितता..या सगळ्यांचा फायदा घेऊन बुवाबाजी फोफावते.

संत कबीर म्हणतात, “माला फिरत जुग गया, मन न फिरो आप…” हातात माळ, पण मनात वाईट विचार…अशा ढोंगी साधूंना समाजात स्थान नाही. आजकाल काही तथाकथित “बाबा” भीतीचं वातावरण निर्माण करतात. “तुमच्यावर भूतबाधा आहे… करणी झाली आहे…” आणि मग उपायांच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जातात. कष्टाने कमावलेला पैसा आपण स्वतःहून त्यांच्या हवाली करतो. हे बाबा की दरोडेखोर हा प्रश्न निर्माण होतो.

खरं तर समर्थ रामदास स्वामी यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, भूत-प्रेत ही केवळ भ्रमाची कल्पना आहे. तसेच दयानंद सरस्वती यांनीही ‘सत्यार्थ प्रकाश’ मध्ये भूत-प्रेतांविषयीचे गैरसमज दूर केले आहेत. वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र यांचं ज्ञान नसल्यामुळे अनेक शारीरिक-मानसिक आजारांना लोक भूतबाधा समजतात आणि ढोंगी लोकांच्या जाळ्यात अडकतात. अंधश्रद्धेचं हे रूप इतकं भयावह आहे की काही ठिकाणी निरपराध मुलांचे बळी, गुप्तधनासाठी अमानुष कृत्ये यांसारख्या घटना घडताना दिसतात. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो. माणुसकी, मानवता संपली का?

ही अंधश्रद्धा केवळ अशिक्षितांमध्येच नाही, तर सुशिक्षितांमधील अज्ञानातूनही वाढताना दिसते. हे अधिक चिंताजनक आहे. मात्र या अंधश्रद्धेविरुद्ध लढण्याची उदाहरणेही आहेत. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे देवीसमोर बकरं कापण्याची प्रथा बंद करण्यासाठी युक्तीने लोकांची मानसिकता बदलली. लोकांच्या श्रद्धेला धक्का न लावता, त्यांना विचार करायला भाग पाडलं..आणि अंधश्रद्धेवर मात केली. यातून एकच संदेश मिळतो, ‘अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षण, विवेक आणि जागृती आवश्यक आहे’. श्रद्धा असावी, पण ती डोळस असावी. विचारांनी सजलेली, विवेकाने मार्गदर्शित.

श्रद्धा जेव्हा डोळस असते,
तेव्हा ती माणूस घडवते…
पण अंधश्रद्धा झाली की,
तीच माणूस उद्ध्वस्त करते…!

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर, जि अहिल्यानगर
=============

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 7 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे