आमचा तालुका ‘चाळीसगाव’
पितळखोराची भारी लेणी
डोंगरी नदीची भरजरी वेणी,
टप टप चालतो ‘खाज्या’ चा घोडा
उंच उंच ‘सातमाळा’ चा कडा.
सरसर उतरतो कन्नडवरून
औट्रमचा अवघड घाट,
आठ मैलाची ती वनराई
खतरनाक ती कठीण वाट.
दर्शन देतो बामोशी बाबा
गिरणाडॅम चा गाजावाजा,
दहिवद वरून भाऊ कढरा
बहीण खडकी, भाऊ पळासरा.
वरखेड्याचे बॅरेज भारी
खोल कप्प्यात गुजरदरी,
गिरणाकाठ मेहुणबारे, रहिपुरी
चहापाण्याला बहाळ शेवरी.
झुक झुक चाले धुळे गाडी
भोरस, जामदा पुढे मोहाडी,
सांगवी, बोढरं, जुनपाणी, जामडी,
भऊर, भामरे, बोरखेडा, चांभार्डी.
हिरवंगार ते आदर्श उंबरखेड
शिरसगांव, टाकळी आणि उपखेड,
पिंपळगांव, तळोंदा, सायगांव-बगळी
गिरणाकाठचे पिलखोड भारी.
राजदेहरेचा राज्यकरी
रोहिणीवर नजर मारी,
करगांवची बोकडतर्री
वाल्मिक ऋषींची वालझरी.
दळणवळणचे तळेगाव
खेडी बर्डीचे खेडगाव,
पोहरा पकडून कळमडू वळलो
मुक्कामाला धामणगाव गाठलं.
शिधा मागायला शिदवाडी
बेल वाटायला बेलदारवाडी,
३२ नं, वलठाण तांडा
पिंपरी, चिंचगव्हाण, विसापूर तांडा.
पिलबाग केळीचे पिलखोड
वेडवाकडं मोरदड-खोरदड,
गणेशपूर, चितेगाव, पिंपरखेड
मूग गिळे भाऊ मुंदखेड.
तिरपा-तारपा न्हावा-ढोमणा
खरजई, तरवाडा, अभोणा,
चंडिकादेवीचे गाव पाटणा
मन्याड काठवर मांदुर्णा.
सातवाहन राजाची वाघळी
बेलगंगा ते टुमदार देवळी,
चाळीसगावाला चिकटली टाकळी
लहान असे भवाळी.
१९७० साली आला महापूर
गाव बसलंय हिरापूर,
रांधून रांधून कंटाळली शिंदी
वाघडू वडाळीत पाण्याची पांदी
तुझं-माझं करू नको
ऐलाड-पैलाड बसले हिंगोणे,
गायी-म्हशीचं हिरवं गायरान
शाकंबरी मायचं गाव डामरुण.
वेळ ना मिळे जातो तिरपोळे
ससा मासा चे गाव रताळे,
‘शेंडी-मानता’ चे खेडे जावळे
बकऱ्या-मेंढ्यां’ चे गाव बोळे.
काळी काळी पोरगी अंधारी
तिची सोबतीण दडपिंप्री,
सातरांजणचे रांजणगाव
मोठमोठ्या जात्यांचे जातेगाव.
बाणगाव-मळगाव शेजारी-शेजारी
ब्राम्हणशेवगा, माळशेवगा आजारी,
रडत-कुढत आले लोणजे-खेरडे
तळणी-श्यामवाडी, वलठाण-बरडे.
डोंगरकाठाला बसलंय ओढरे
मजे-मजेचं आहे मजरं,
शहरात त्याची असते नजर
पाटचारीचे गाव ओझर.
रडून कुढूध बनू नको वाकडी
पातोंडा आणि कृष्णावाडी,
बऱ्याच दशकांची दस्केबर्डी
‘सोलर’ राणी चंडिकावाडी.
वटवट करे लांबे वडगाव
रहदारीचे गाव आडगाव,
गिरणापुलाचे दसेगाव
मळमळ करी मळगाव.
शितोळ्यांचे ‘तळेगाव’
साळुंख्यांचं ‘खेडगाव’,
देशमुखांची ‘देशमुखवाडी’
कुमावतांची ‘बेलदारवाडी.’
राजा बाजीरावाचे नगर
राजदेहरे-शिवापूर,
आडवळणाचे असे कुंझर
इतका मोठा तालुका चाळीसगाव.
संकलन: रवींद्र चव्हाण सर
शिरसगांव .ता.चाळीसगांव
=======



