‘समृध्द वैचारिक परंपरेतून सघन विमर्श निर्माण करण्याचे काम दिवाळी अंकातून होते’; पद्मश्री दादा इदाते
अमृता खाकुर्डीकर, पुणे
‘समृध्द वैचारिक परंपरेतून सघन विमर्श निर्माण करण्याचे काम दिवाळी अंकातून होते’; पद्मश्री दादा इदाते
‘विमर्श दिवाळी अंक’ प्रकाशन सोहळा साजरा
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे. (दि.24)प्रतिनिधी: आपल्याकडे तत्त्वज्ञानाची फार प्राचीन अशी समृध्द परंपरा आहे ; तशीच मराठीत दिवाळीअंकांची सुध्दा समृध्द परंपरा आहे. मनोरंजाना बरोबरच ज्ञान आणि विचार देणा-या दिवाळी अंकातून नवे वैचारिक प्रज्ञा प्रवाह जन्म घेतात. विवेकानंद, एकनाथजी रानडे, पंडित दीनदाळ उपाध्याय, बाबासाहेब अंबेडकर अशा थोर समाजधूरीणांनी वेळोवेळी देव, देश आणि धर्म यांच्याविषयी नव्याने तात्विक मांडणी करून त्याला व्यवहाराची जोड दिली.कारण प्रत्यक्ष जीवनात अनेक वैचारिक विमर्शांना व्यावहारिक उत्तर शोधावे लागतात. अशा मंथनातून वैचारिक परंपरा अधिक समृध्द होते आणि सघन विमर्श पुढे येतात.
दिवाळी अंकाच्या माध्यमातूनही अशाच वैचारिक नव्या दिशा शोधण्याचे प्रयत्न होत असतात. यंदाच्या “विमर्श” दिवाळीअंकात त्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते आहे. विशेषतः विविध वैचारिक लेख आणि ‘जातीजनगणना’ या परिसंवादातून चांगली वैचारिक चर्चा घडवून आणली आहे” अशा शब्दात पद्मश्री दादा इदाते यांनी विमर्श आणि वैचारिक परंपरा या विषयावर आपले चिंतन मांडले. ‘विमर्श’ दिवाळीअंक प्रकाशन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
दादा इदाते यांच्या हस्ते दिवाळीअंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर हरीभाऊ मिरासदार, अंकाच्या संपादक नयना कासखेडकर व किशोरजी शशीतल उपस्थित होते. प्रसिध्द लेखक अभिजित जोग यांनी यंदाच्या “विमर्श दिवाळीअंका” त अतिथी संपादक म्हणून विशेष योगदान दिले. प्रसिध्द व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या व्यंगचित्राने अंकाचे मुखपृष्ठ सजले आहे. मोतीबागेतील केशव सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दिवाळी अंकातील लेखक-कवीं व मुद्रक यांचा सत्कार करण्यात आला. लेखकांच्या वतीने संजय तांबट व मिलींद शिंत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना हरिभाऊ मिरासदार यांनी विमर्श या त्रैमासिकाची भूमिका विशद केली. नयना कासखेडकर यांनी अंकातील साहित्याचा थोडक्यात परिचय करून दिला. सूत्रसंचालन ॲड.अभिजित देशमुख यांनी केले. कार्यक्रमास विमर्श परिवारातील सर्व सदस्य आणि कवयित्री आश्लेषा महाजन, लेखक व व्याख्याते प्रा. श्याम भुर्के, अजय महाजन, दिलीप क्षीरसागर असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



