विश्वसंवाद आणि साहित्यभारती, पुणे आयोजित जाणीवा जागृतसाठी लेखक कार्यशाळा
अमृता खाकुर्डीकर, पुणे

विश्वसंवाद आणि साहित्यभारती, पुणे आयोजित जाणीवा जागृतसाठी लेखक कार्यशाळा
लेखकाच्या प्रतिभेला हवी नवी दृष्टी नवी दिशा
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे: (दि २३) गतीमान जगण्याचा प्रचंड वेग आणि काळ मुठीत धरून ठेवू पाहणारी प्रसार माध्यमे यांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा ताबा घेतला आहे. विविध माध्यमातून आपल्यावर सतत कोसळणारी माहिती पाहता हे युग म्हणजे माहितीचा विस्फोट करणारे युग अवतरले आहे. या धबधब्याखाली माणसाची नैसर्गिक बुध्दीमत्ता दबून जाते आणि माहितीच्या रेट्यात खरे ज्ञानही दबून जाते.
अशावेळी ज्ञानवंत आणि प्रतिभावंतांच्या जाणीवा जागृत होणे, जातीवंत प्रतिभेला नवी दृष्टी, नवी दिशा मिळणे यातूनच आजच्या काळाला साजेशी नव सर्जनाची निर्मिती शक्य होईल.
आजच्या कृत्रिम बुध्दीमत्तेच्या आधुनिक तंत्रयुगात खरी नैसर्गिक मानवी प्रतिभा आणि प्रज्ञा यांना खरे धुमारे फुटण्यासाठी योग्य दिशा मिळायला हवी आणि त्यासाठी नव्या डिजीटल युगाप्रमाणे नवी दृष्टीही मिळाली तरच कसदार साहित्य निर्मिती होऊ शकेल. म्हणूनच “विश्वसंवाद,” आणि “साहित्यभारती” यां पुण्यातील दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे नुकतीच एक लेखक कार्यशाळा आयोजित केली होती.
मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यशाळेचे उदघाटन झाले. विश्वसंवादचे अध्यक्ष, अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून प्रथम या कार्यशाळेचा उद्देश सांगून पाहुण्यांचा पुस्तकभेट देऊन स्वागतपर सत्कार केला. कार्यशाळेच्या पहिल्या सत्राच्या सुरवातीला साक्षेपी विचारवंत प्रमोदजी बापट यांनी आपल्या बीजभाषणात ही कार्यशाळा कुशल आणि कसलेल्या लेखकांसाठी असल्याचे आवर्जुन नमूद केले. आजच्या लेखकांनी नव्या प्रेरणेतून लिहीताना प्राचीन संचित बरोबर घेऊन नव्या दृष्टीने नव निर्मितीची दिशा शोधावी, यासाठी आजची कार्यशाळा मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पहिल्या सत्रात प्रसिध्द लेखक, संपादक आनंद हर्डीकर यांनी केलेले मार्गदर्शन खरोखर मोलाचे ठरले. त्यांनी यावेळी लेखकांना दिलेला कानमंत्र अगदी परीणामकारक होता. त्यांनी सांगितले की, लेखकांनी भरपूर व्यासंग, सखोल चिंतन आणि संदर्भ शोध घेऊन केलेला अभ्यास यामुळेच त्यांच्या हातून सकस साहित्य निर्मिती होईल.
यानंतरचे दुसरे सत्र अत्यंत वेधक ठरले. प्रसिध्द साहित्यिक आणि नाट्यलेखक अभिराम भडकमकर आणि चित्रपट लेखक, दिग्दर्शक , अभिनेता दिग्पाल लांजेकर तसेच तत्त्व चिंतक लेखिका रमा गर्गे यांनी ” जेन झी आणि विविध विचारांचे सुलभीकरण” या विषयाचे चर्चासत्र श्रवणीय ठरले. 1990 नंतर जन्मलेली तरूण पिढी म्हणजे “जेन झी ” ही संकल्पना सध्या खूपच चर्चेत आहे. यात समाविष्ट असलेली झिंग, म्हणजेच नशा ही कल्पना मुळात पाश्चात्य असून आपली भारतीय मुले कुटूंबाशी घट्ट नाते धरून असल्याने आपली संस्कृती, संस्कार व जीवनमूल्ये याचे महत्त्वं जाणतात. त्यामुळे आपल्याकडे “जेन झी” च्या उद्रेकाचा कुठलाही धोका नाही, असा निर्वाळि या तीनही मातब्बर वक्त्यांनी दिला. या चर्चेचे संचलन शिक्षण विवेकच्या संपादक अर्चना कुरतडकर यांनी केले.
विश्रामानंतर तिस-या सत्रात ” पंचपरिवर्तन” ही संकल्पना प्रसिध्द वक्ते दिलीप क्षीरसागर यांनी विशद करून सांगितली. स्वबोध, समरसता, पर्यावरण, कुटूंबप्रबोधन आणि नागरी कर्तव्ये हे पाच आयाम प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगिकारने तर “ईष्ट ते परिवर्तन” घडून येईल. यातून समाज सकारात्मक विचारांकडे वळेल आणि समरसतेच्या भावनेने अधिक सुदृढ होईल. म्हणूनच लिहिणा-या लेखकांनी हे पंचपरिवर्तनाचे पाच विषय घेऊन विविध प्रकारची साहित्य निर्मिती करावी, असे सांगून नव्या विषयाकडे लेखकांचे लक्ष वेधले.
यानंतर अखेरचे समारोप सत्र सर्व सत्रांचे तात्पर्य सांगणारे ठरले. या सत्राचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय विचारवंत प्रशांत पोळ यांनी “अमृतकाळातील आव्हाने व संधी” या वेधक विषयाची सविस्तर मांडणी केली. कोविड सारख्या कठीण परिस्थितीत भारताने लस निर्मितीचे आव्हान पेलून इतरही कोविड संबंधित अनेक नविन मेडिकल उत्पादनांची निर्मिती केली. यातून आपली तर गरज पूर्ण झालीच शिवाय, इतर देशांचीही गरज भागवली गेली. म्हणजेच भारताने अत्यंत आव्हानात्कक स्थितीत संधी शोधून आत्मनिर्भरतेचे उदाहरण जगासमोर ठेवले असे सांगून त्यांनी देश-विदेशातील त्यांच्या भेटीत भारताची प्रतिमा अनेक कारणांनी
उंचावली असल्याचे आपले विविध अनुभव सांगितले. यात प्रामुख्याने योग, आयुर्वेद, आध्यात्मिक साधना, धार्मिक सहिष्णुता याबाबत भारताचे जगाला असलेले आकर्षण अभिमानास्पद आहे, असे सांगून आजच्या लेखकांनी आपल्या देशाचे हेच गौरवास्पद चित्र वास्तवदर्शी पध्दतीने आपल्या साहित्यातून रेखाटावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित लेखकांना आवर्जुन केले.
पुण्यात फर्ग्युसन काॅलेजच्या फिरोदिया सभागृहात आयोजित या कार्यशाळेत गोवा, कोकण, विदर्भ मराठवाडा अशा विविध भागातून 150 लेखकांनी सहभाग नोंदवला. सावरकर अभ्यासक अक्षय जोग, एकताच्या संपादक रूपाली भुसारी, विमर्श मासिकाच्या संपादक नयना कासखेडीकर, पुणे आकाशवाणीच्या वृत्त निवेदक स्वाती महाळंक, हे नामवंत लेखक कार्यशाळेत विशेषत्वाने सहभागी झाले होते. तसेच, प्रसिध्द वक्ते व लेखक प्राचार्य श्याम भुर्के, फर्ग्युसन काॅलेजचे उप प्राचार्य प्रा. कुंभार, अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे डाॅ. सुनिल भंडगे, काश्मीर विषयाचे अभ्यासक विनय चाटी, समरसाता साहित्य परिषदेचे अध्यक्ष काशिनाथ पवार,या मान्यवरांनी विशेष सहभाग घेतला. योगायोग म्हणजे अमेरिकेतून सध्या भारतात आलेलेही एक लेखक या कार्यशाळेत आनंदाने सहभागी झाले. सहभागी सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या सत्रात अनेक शंकांचे निरसन करून घेतले. आयोजकांच्या वतीने सहभागी लेखकांकडून कार्यशाळेबाबतचे प्रतिसाद पत्र भरून घेण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री आणि विश्व संवादचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात विश्वसंवादच्या संपादक अंजली तागडे, आयाम प्रमुख आनंद पवार यांनी कार्यशाळेचे यशस्वी संयोजन केले. एकूणच भोवतीच्या संभ्रमित वास्तवातून स्वतःचे वैचारिक विमर्श निर्माण करावे आणि अंतिमतः राष्ट्रीय विचारांची पेरणी करण्यासाठी लेखकांनी लेखणी हाती घ्यावी अशी जाणीव निर्माण करणारी ही कार्यशाळा लेखकांना नवा विचार देऊन प्रकाशाची वाट दाखवणारी ठरली.





