Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

खरं सांगू का… कुणाला सांगणार तर नाही?

डॉ. राजेश काळे 'राजस' ता. जिल्हा नागपूर.

0 4 8 2 9 0

खरं सांगू का… कुणाला सांगणार तर नाही?

“खरं सांगू का… कुणाला सांगणार तर नाही. तुम्ही आहात म्हणून सांगतो. मला इतरांवर इथकिंचितही विश्वास नाही. पण पाहा, तुम्ही कुणाला सांगू नका हं… माझी शपथ आहे तुम्हाला!” असं बोलणारे लोक आपण सर्वांनीच अनुभवलेले असतात. मित्र, नातेवाईक, शेजारी, घरकामाला येणारे, ऑफिसमध्ये उगाचच नाक खुपसणारे यांची संख्या कमी नाही. एका साध्याशा घटनेला हे लोक इतकं रंगतदार रूप देतात की, ऐकणारा नकळत त्यात ओढला जातो. आवाजात मऊपणा, शब्दांत आपलेपणा, चेहऱ्यावर विश्वासाचं आवरण आणि बोलताना अर्थपूर्ण इशारे या सगळ्यांच्या जोरावर ते आपल्या मेंदूवर कधी राज्य करू लागतात, हे कळतही नाही.

त्यांच्या वाकचातुर्यावर, अभिनयक्षम शैलीवर आणि बनावटी सत्यनिष्ठेवर आपोआप विश्वास बसू लागतो. आपण सुशिक्षित, समजूतदार असूनही त्यांच्या शब्दजाळ्यात अडकतो. इथेच आपली मोठी चूक होते. कारण त्यांच्या स्वभावामुळे आपण किती असहाय्य, किती लाचार, कधी कधी तर किती मूर्ख ठरत आहोत याची जाणीव आपल्याला होत नाही. आपल्या विचारांना, नात्यांना, संसाराला, कामाला आग लावून हे लोक निवांतपणे तमाशा पाहत असतात आणि त्यातूनच त्यांना विकृत आनंद मिळतो.

उदाहरणार्थ, एखाद्या ऑफिसमध्ये सहकाऱ्याबद्दल “हे फक्त तुलाच सांगतो” म्हणून कुजबुज सुरू होते. त्यात अर्धसत्य, अर्धकल्लोळ मिसळलेला असतो. आपण ते मनात साठवतो, प्रतिक्रिया देतो, अंतर वाढवत जातो आणि काही दिवसांतच लक्षात येतं की तीच गोष्ट इतरांनाही तितक्याच ‘गुप्ततेने’ सांगितलेली असते. नातं बिघडलेलं असतं, पण सूत्रधार मात्र सुरक्षित असतो. किंवा एखादी शेजारीण, “मला कुणाशी बोलायला नाही आवडत, पण तुमच्यावर खूप विश्वास आहे” असं म्हणून दुसऱ्याच्या घरातल्या गोष्टी सांगते. आपण त्या विश्वासाला मोलाचं मानतो. पण काही काळानंतर आपल्या घरातलीच एखादी खाजगी गोष्ट इतरांच्या ओठांवर फिरताना दिसते, तेव्हा कळतं की आपण फक्त एक दुवा होतो, केंद्रबिंदू नव्हे.

हे लोक “मी फक्त तुम्हालाच सांगितलं” असं म्हणत आपल्या डोक्यात स्वतःसाठी खास जागा निर्माण करतात. पण सत्य हे असतं की ते सगळ्यांशीच असंच वागतात. आपण मात्र गाफिल असतो. आपल्याला वाटतं, ही गोष्ट फक्त आपल्यालाच ठाऊक आहे. पण प्रत्यक्षात

“पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है,
जाने ना जाने गुल ही ना जाने, बाग तो सारा जाने है.”

अशीच आपली अवस्था झालेली असते. आपली कथा जगाला माहीत असते; आपणच त्यात शेवटचे असतो.

म्हणूनच अशा लोकांना दुरूनच सलाम करावा. जवळ आले, की ते कधी, कुठे आणि कसं पोखरतील याचा नेम नाही. गोड बोलणं म्हणजे आपलेपणा नव्हे, आणि गुपित सांगणं म्हणजे विश्वास नव्हे, हे वेळेत उमगलं, तरच मन, नाती आणि आयुष्य सुरक्षित राहतात.

“हळूच येऊन कानात काही सांगून जातात
आपलेपणाचं ओझं क्षणात टाकून जातात,
दोन ओठांत अडकलं असं भासवत बोलणं
पण गावभर पोहोचतं त्याच क्षणी तेच बोलणं.”

डॉ. राजेश काळे ‘राजस’
ता. जिल्हा नागपूर.
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे