शिवस्मारक म्हणजे, ‘आचार, विचार, उच्चारांचे आदर्श स्फूर्तीस्थान’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
शिवस्मारक म्हणजे, ‘आचार, विचार, उच्चारांचे आदर्श स्फूर्तीस्थान’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
हे हिंदवी स्वराज्य निर्माता. मराठ्यांचा भाग्यविधाता, दीन दुबळ्यांचा पालनकर्ता. दैन्य, दारिद्र्य, दुःखहर्ता, शरणागताचा आश्रयदाता. न्यायनिष्ठूर समन्यायी त्राता..साधू, संत, देवालये रक्षिता.. प्रजाहितदक्ष जाणता राजा.. माता, मातृभूमीचा उद्धारकर्ता.. धैर्य धुरंधर प्रतापवंता..गनिमी कावा रचियेता.. शौर्य निरंतर रणकंदन जेत्ता.. मुलुख मैदानी भगवी सत्ता..सह्याद्रीचा सिंह गर्जता…अश्वारूढ स्मारक पाहता… विनम्रतेने झुकतो माथा.. अखंड प्रेरणा स्फूर्तीदेवता, विश्ववंदनीय नितीमान राजा.. गतीमान शासन, समाधानी प्रजा.. दूरदृष्टी दृष्टा नेता, कुशल नेतृत्वाचा गाजावाजा.. महान कर्तृत्वाचा पर्वत साजा.. सह्याद्रीचा खडा कडा.. गर्वाने गातो अजूनी पोवाडा.. उत्तुंग पराक्रमाची यशोगाथा, भासते जणू दंतकथा.. सिंहासनारूढ छत्रपती होता.. झुकला कमरेत इथे गोरा.. लवून घाली तुम्हास मुजरा…नमन वीरा.. समरधीरा.. मावळप्रांतीच्या प्रतापशूरा.. त्रिवार मुजरा..! त्रिवार मुजरा..!!
‘महाराष्ट्र भूमीला पडलेले एक सोनेरी स्वप्न म्हणजेच छत्रपती शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊपोटी जन्मलेले हे रूद्रावतारी शिवरत्न.!’ बालपणातच रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याचे तोरण बांधून,आपल्या चतुर नितीचे भविष्यकालीन धोरण ठरवून टाकणारा एक महायोद्धा.! आठरा पगड जातीच्या विश्वासू प्राणप्रिय मावळ्यांची एकनिष्ठ मोट बांधून बलंदड मोघली सत्तेला एकामागून एक हादरे देणारा जीगरबाज शिवबा म्हणजे सह्याद्रीच्या खोर्यातला धगधगता अंगार. प्राणपणाने जपणारा मातृवचनाचा हुंकार आणि अल्पशा कारकीर्दितच त्यांनी दिला हिंदवी स्वराज्याला आकार…!
छत्रपती शिवाजीराजे भोसले, फक्त महाराष्ट्र किंवा हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण विश्वातच सर्वात जास्त स्मारके असणारा जगातला एकमेव राजा. ज्यांच्या राजनितीचा अभ्यास जगभर केला जातो. ज्यांचा गनिमी कावा म्हणजे भल्याभल्यांना एक भुल भुलैय्या वाटतो. शेकडो गड किल्ले उभारून स्वराज्याची तटबंदी बुलंद ठेवणारा धोरणी सम्राट. समुद्री आरमाराची उभारणी करणारा मुत्सद्दी राजा. स्वराज्याविरूद्ध छुप्या कारवाया करणार्या आप्तांनाही धडा शिकवणारा निष्पक्षपाती न्यायाधीश. परस्त्रीला मातेचा दर्जा देणारा आदर्श, सभ्य, संस्कारी राजा. ज्याच्या शिवशाहीचा सार्या विश्वातच दबदबा…!!!
काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरीता आ. राहुल दादांनी दिलेले शिवस्मारकाचे चित्र पाहताक्षणीच मनात अनेक विचारांची गर्दी झाली. शिवरायांचा समग्र इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. आज सर्वच राजकारणी शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करतात, मात्र त्यांची कृती पाहता. शिवशाहीची संस्कृती कुठेही दिसत नाही. उलट भ्रष्टाचारी प्रवृत्ती, गुन्हेगारी विकृती राजरोस बोकाळलेली दिसते. शेकडो वर्षानंतरही तुफानी वार्या वादळाला तोंड देत शिवबांचे किल्ले ताठ उभे आहेत. आणि काल परवा उभे केलेले स्मारक एकाच ऋतुत कोसळत आहे…? ही कोणती निती? आज प्रत्येक राजकीय नेत्याने छत्रपतींची आदर्श निती अवलंबली तर महाराष्ट्र देशातच काय जगात अव्वल होईल यात शंका नाही. सर्व शिलेदारांच्या हायकू लेखनाला भरभरून शुभेच्छा आणि आज मला परिक्षण लिहिण्याची दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह