“ब्रम्हांड दर्शन घडवणारी नारी, ही पवित्र तुलशीदल”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

“ब्रम्हांड दर्शन घडवणारी नारी, ही पवित्र तुलशीदल”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
कुणीतरी विद्वान व्यक्तीने असे लिहून ठेवले आहे की, उत्तुंग पराक्रमाचे मातृत्व पुरूषाकडे असले, तरी मातृत्वाचा पराक्रम फक्त स्रीच करू शकते…! निसर्गातील हर सृजनाची उद्गाती आहे नारी. हर नवनिर्मितीची मूळ स्त्रोत आहे नारी. जगातील सार्याच पुष्पजातींचा अर्क काढून बनवली गेली आहे नारी. म्हणून तर ती रूप, गुण, स्वरूपाने न्यारी. बाल्य ते वृद्धत्व हर अवस्थेत भारी, भाळणारी आणि सांभाळणारी, आहे तीच सर्वगुणसंपन्न खरी, किती काळाचे अस्तित्व याची खंत ना खेद उरी, हर फुलाप्रमाणेच ती, माया, ममता, कर्तृत्वाचे रंग, गंध, कायम दरवळत ठेवणारी.
कळी ते फूल किती अल्प आयुष्य! तरीही जपते प्राजक्ताचं सर्व समर्पण. ‘नारी म्हणजे जाईजुईचे नाजूकपण, कोवळ्या चाफेकळीचं पिवळधमक शांतपण, तीव्र दुःखाच्या लाही लाहीतही गुलमोहराचं बहरलेपण’. बकुळ, मोगर्याचं श्वास गंधीत करणारं धुंदपण. नैराष्यतमावर मात करणारं रातरीणीचं शितल चांदणपण, केवडा आणि कस्तुरीचं मंतरणारं गंधीतपण, घरातल्या घरात फुलणारं नारी पसंतीचं वसंतपण, मनांगणात खुलणारं सप्तरंगी इंद्रधनूचं स्वप्नाळूपण. म्हणूनच तर हर नात्यात, हर भूमिकेत, हर चरित्रात, हर आव्हानांत, हर परिस्थितीतही भारी, ठरतं तीच बाईपण.
‘मराठीचे शिलेदार’ समूहात काल शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेकरीता समूह प्रमुख आदरणीय राहुल दादांनी पुष्पाच्छदित स्री प्रतिमेचे दिलेले चित्र खरेच खूप बोलके होते. स्रीला कायम फुलाची उपमा दिली जाते. कदाचित फुलाप्रमाणेच तीचे जीवनही समर्पणातच सार्थकतेचा अनुभव घेणारे आणि आदर्शाचा वस्तूपाठ समोर ठेवणारे असेच दिव्यरूपदर्शनी असते. नारी जितकी कोमल तितकीच प्रसंगी कठोरही होऊ शकते. ती फूल असली तरीही अंगार सुद्धा होवू शकते. इतिहास याचा साक्षीदार आहे.. म्हणून असे म्हणावे वाटते की, नारी ब्रम्हांड दर्शन घडवणारी ब्रम्हकमल, तर कधी पवित्र तुलशीदल असते.!
आता राहिला प्रश्न हायकूचा.. दिलेला चित्र विषय हायकूबद्ध करताना. त्यातला अदृश्य क्षण आणि दृश्य परिणाम दर्शवणारी कलाटणीयुक्त मांडणी, अतिशय कल्पकतेने टिपणे हेच दर्जेदार हायकूकाराचे लक्षण म्हणा किंवा ओळख आहे. आपल्या हायकू रचनेतून एक खास संदेश निर्गमित करण्याची कला साधता आली पाहिजे. तेही केवळ सतरा अक्षरात. म्हणूनच “पाच +सात+पाच” अशा आकृतीबंधात बांधणी करताना विनाकारण भरीची एकाक्षरे टाळून. एक कल्पक अर्थपूर्ण हायकू निर्मिती करण्याचे कसब आपल्या लेखणीत उतरले पाहिजे. यासाठी घाई करू नये. आधी सूक्ष्म निरीक्षण करावे. चिंतन मनन करावे आणि मग विचारपूर्वक मांडणी करावी. सर्व हायकूकार शिलेदांरांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज मला हायकू परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे पण आभार..!!
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





