ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये “अमली पदार्थ सेवन प्रतिबंध” विषयावर सेमिनार
तुषार थळे, प्रतिनिधी
ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये “अमली पदार्थ सेवन प्रतिबंध” विषयावर सेमिनार
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: दि.१९ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० वा.ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये भारत सरकाराच्या अमली पदार्थ सेवन जागरुकता अभियानांतर्गत ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेज आणि सुरभी स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “अमली पदार्थ सेवन प्रतिबंध”या विषयावरील सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने मनोविकारतज्ञ डॅा.अनिल अनंत डोंगरे यांच्यामार्फत अमली पदार्थांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.तंबाखू आणि तंबाखूमुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारामुळे अनेक भारतीय आपले जीव गमावत आहेत याविषयी त्यांनी माहिती दिली.तंबाखूसोबतच भारतामध्ये दारू प्यायलाने अनेक भारतीय पुरुष गंभीर आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.व्यसनाधीनता वाढीस लागण्याच्या कारणांमध्ये मित्रांचा आग्रह,चिंतातुरता,बेरोजगारी यासारखी अनेक कारणे आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले.व्यसनाधीनता ही peer pressure मुळे सरु होते आणि माणसांच जीवन उध्वस्त करते.”गांजा” या वनस्पतीपासून तयार होणारे अमली पदार्थांचे सेवन भारतीय तरुणांमध्ये जास्त प्रमाणात केले जाते.गांजा हा उत्साहवर्धक असल्याने अनेक व्यक्ती गांजाचे सेवन करतात परंतू गांजाच्या अतिसेवनाने तरूणांना मनोविकाराला सामोरे जावे लागते अशी माहिती त्यांनी दिली.अफू आणि एम.डी.या अमली पदार्थ्यांच्या सेवनाने अनेक तरूण तरुणी व्यसनाधीन होऊन आपले जीवन उध्वस्त करत आहेत अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.ई सिगारेटमुळे अनेक तरुण तरूणी व्यसनाधीन बनत आहेत याकरिता सरकार आणि समाज या दोन्हींनी एकत्रित उपाययोजना करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा सौ.सुप्रिया जेधे यांनी सुरभी संस्थेमार्फत कश्या पध्दतीने व्यसनमुक्तीसाठी कार्य केले जाते याबाबत उदाहरणासहित मार्गदर्शन केले.ग्रामपंचायत व्यसनमुक्तीसाठी अनेक उपाययोजना करु शकते असे मत त्यांनी मांडले.महाराष्ट्र अंधलध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते श्री.नितीनकुमार राऊत यांनी व्यसनाधीनता समाजासाठी कशी घातक आहे आणि व्यसनमूक्त समाज देशाच्या उभारणीसाठी कसा आवश्यक आहे याबाबत विश्लेषण केले.दारूच्या व्यसनामुळे आणि अमली पदार्थांच्या सेवनामुळे कौटुंबिक हिंसाचार,चोरी,बलात्कार, खून,यासारखे गंभीर गुन्हे घडल्याने पोलिस आणि न्यायालयीन यंत्रणा यावर ताण येतो,त्यामळे निरोगी आणि व्यसनमूक्त समाज निर्माण करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकांचे तज्ञांमार्फत निरसन करण्यात आले.प्रा.निलम म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य सौ.नीलम हजारे यांनी आभार मानत विद्यार्थ्यांनी व्यसनाधीन न बनता सुदृढ नागरिक बनून आपले जीवन वृद्धिंगत करावे असा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.ॲड गौतम पाटील, उपाध्यक्ष डॅा.साक्षी पाटील ,लॅा कॅालेजच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे यांनी मार्गदर्शन केले.आय.क्यु.ए.सी. समन्वयक प्रा.डॅा.संदिप घाडगे, प्रा.निलम म्हात्रे, प्रा.चिन्मय राणे आणि प्रा.पियुषा पाटील यांनी महाविद्यालयातील महिला विभाग कक्ष आणि अंतर्गत समितीमार्फत कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले.या कार्यक्रमामध्ये प्रा.कौशिक बोडस,प्रा.सुरज पूरी,१०० विद्यार्थी आणि शिक्षकेतर उपस्थित होते.





