किशोरवयीन विद्यार्थ्यांना समजून घेतांना.
प्रशांत शेळके (एक वाटसरू) ता. हिंगणघाट, जि. वर्धा
किशोरवयीन विद्यार्थ्यांना समजून घेतांना.
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात किशोरवयीन विद्यार्थ्यांना समजून घेणे हे पालक, शिक्षक आणि समाज या तिघांसमोर एक मोठे आव्हान बनले आहे. तंत्रज्ञान, इंटरनेट, सोशल मिडिया, करिअरच्या नव्या संधी, स्पर्धा आणि बदलते सामाजिक मूल्य यांच्या संगमातून आजचा विद्यार्थी घडतो आहे. त्यामुळे त्यांच्या विचारविश्वाचा, वागणुकीचा आणि स्वभावाचा वेध घेताना केवळ पारंपरिक चौकटीतून पाहणे अपुरे ठरते.
किशोरवयीन वय हे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे, भावनिक स्थैर्य मिळविण्याचे आणि आत्मविश्वास जोपासण्याचे महत्वाचे टप्पे असते. या काळात विद्यार्थी केवळ अभ्यासाकडे नाही तर मैत्री, क्रीडा, कला, मोबाईल, इंटरनेट या सर्व गोष्टींकडे आकर्षित होतो. तो स्वप्न पाहतो, प्रयोग करतो आणि अपयशाचा सामना करण्याची कला शिकतो. अशा काळात त्याला समजून घेणे म्हणजे केवळ त्याच्या हो ला हो लावणे नव्हे तर त्याच्या भावनांना, कुतूहलाला, शंकांना आणि त्याच्या वैचारिक प्रगल्भतेला शोधण्याच्या प्रवृत्तीला योग्य मार्गदर्शन करणे होय.
आजच्या मुलांकडे माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध आहे. गुगल, युट्युब, सोशल मिडिया यामुळे ज्ञान मिळवणे सोपे झाले आहे; पण या माहितीचे विश्लेषण, योग्य-अयोग्य ठरविण्याची क्षमता अजून पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चुकीच्या दिशेने जाऊ नये यासाठी पालकांनी संयमाने त्यांना मार्गदर्शन करणे, त्याचा मित्र बनून त्याला वेळ देणे तसेच शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या पलिकडे जावून विविध उपक्रमातून त्याची विचारसरणी घडविण्यावर भर देणे आवश्यक आहे. हे लिहीताना जेवढे सोपे तेवढेच प्रत्यक्षात आणने एक आव्हान आहे.
या विद्यार्थ्यांना सर्वाधिक गरज असते ती समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची. त्यांच्या चुका केवळ ओरडून दुरुस्त होत नाहीत; उलट त्यांना प्रेम, विश्वास आणि संवादाची जागा मिळाल्यास ते सहजपणे सुधारतात. असे मला वाटते. आजचे विद्यार्थी वेगळे विचार मांडतात, प्रश्न विचारतात, “का?” विचारण्याची सवय त्यांना असते. तेव्हा त्याला विरोध न मानता प्रोत्साहन देता आले पाहिजे. कारण हीच प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती भविष्यात संशोधक, वैज्ञानिक, लेखक किंवा विचारवंत निर्माण करते.
याचबरोबर या वयातील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. गुण, निकाल, करिअर या दबावाखाली अनेकदा विद्यार्थी तणावग्रस्त होतात. अपयश आल्यास आत्मविश्वास डळमळतो. अशा वेळी त्यांना समजावून सांगणे की अपयश हा यशाकडे जाण्याचा पहिला टप्पा आहे, हे फारच गरजेचे ठरते. शाळांमध्ये समुपदेशन, संवाद, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम यांना प्रोत्साहन दिल्यास विद्यार्थी अधिक सशक्त होतो.
आजचे विद्यार्थी “डिजिटल जनरेशन”, ‘AI” आहेत. ऑनलाईन गेम्स, सोशल मिडिया आणि मोबाईल त्यांच्या आयुष्याचा भाग झाला आहे. यातून सकारात्मकता आणि नकारात्मकता दोन्ही येतात. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर शिकविणे हीच खरी गुरुकिल्ली आहे. तसेच विद्यार्थ्यांना समजून घेण्याचा मुख्य मंत्र म्हणजे संवाद, विश्वास आणि सहकार्य. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे, त्यांच्या मतांना महत्त्व देणे, चुका केल्यावरही त्यांच्यावर विश्वास ठेवणे हे संबंध दृढ करते.
शेवटी, आजच्या या विद्यार्थ्यांना समजून घेणे म्हणजे त्यांना फक्त अभ्यासात पुढे ढकलणे नव्हे, तर जीवनाचे धडे देणे आहे. स्वप्नांना पंख द्यायचे, मूल्यांचे भान द्यायचे, आणि अपयश आले तरी त्यातून शिकण्याची ताकद द्यायची. त्यांच्या कुतूहलाला, कल्पनाशक्तीला आणि आत्मविश्वासाला पोषक वातावरण मिळाले, तर आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक नक्कीच ठरतील.
प्रशांत शेळके (एक वाटसरू)
ता. हिंगणघाट, जि. वर्धा
========



