“निर्मळ, निरागस बालपण, एक आयुष्यातलं सोनेरी पान”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
“निर्मळ, निरागस बालपण, एक आयुष्यातलं सोनेरी पान”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
बालपण…! विधात्यानं मानवाला दिलेलं निर्मळ, निरागसतेचं अनमोल वरदान, सळसळत्या उत्साहाचं सदाबहार हिरवं रान, खळखळत्या प्रवाहाचं सुरीलं गान, भिरभिरत्या वार्याचं रानोमाळ थैमान, हाडकुळ्या देहातलं अमाप अवसान, दे धडक बेधडक भिडण्याचं अनोखं ज्ञान, जिंकलं काय हरलं काय खेळण्यातलं समाधान, साधन सुविधा हव्याच कशाला? आहे त्यातच आनंद महान, ज्वारीच्या ताटाची लांबलचक आगीनगाडी, कागदाचं विमान आणि कागदाचीच होडी, निकामी टायरची मस्त मोटारगाडी, इंजिन असो की हाॅर्न तोंडाचीच शिट्टी, अडवळणी पायवाट, डोंगरघाट काटेकुटे सर्वाशीच गट्टी, हर ऋतु अंगाखांद्यावर, निसर्गाशी इमान, मातीत लोळणं खेळणं, फुलपाखरावाणी बागडणं, अल्लड अवखळ उंडारणं, धमाल मौजमस्ती, कमाल खोडकर हस्ती, निखळ निस्वार्थ दोस्ती, गरीब श्रीमंत छू मंतर, कुणालाच नाही अंतर, एकच गोळी दाताने तोडी, चार तुकडे वाटून खाई, रूसणे फुगणे, झगडे खटके, लटके भांडणे, क्षणात हसणे, आईची शप्पथ देवाची शप्पथ, गळामिठीत सारे माफ, निर्मळ मन स्वच्छ साफ, आत कांहीच नसे पाप, एकमेकांच्या हातात हात, असायची अशी पक्की साथ, सुरेख बालपण क्या बात.. !! मानवी आयुष्यातलं सोनेरी पान..!!
आयुष्याच्या या वळणावरून वळून पाहिले की, प्रत्येकाला नक्कीच वाटून जातं की जर ते बालपण मिळणार असेल फिरून, तर सारं भौतिक ऐश्वर्य क्षणात टाकीन फुंकून…
ज्या मोठेपणात आज वावरतो आहोत त्यात आहेच काय ? पराकोटीचा स्वार्थ, कमालीचा अहंकार, भौतिक श्रीमंतीचा गर्व, जीवघेणी कुरघोडी, पैशाचा माज, या सर्व गोष्टीत गुरफटून हरवून गेलय निखळ निर्मळ जगणं, मनमोकळं हसणं, आणि अगदीच घट्ट जडलय मानसिक अशांतीचं जीवघेणं दुःखणं….!
काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेसाठी आ. राहुल दादांनी दिलेले तीन मुलांचे एकाच सायकलवरून बिंधास्त फिरतानाचे चित्र म्हणूनच खूप बोलके आहे. चित्र पाहताच मन बालपणात गेले. आणि सारे काही क्षणात डोळ्यासमोर उभे राहिले. पंधरा वीस पैसे दोघातिघांनी मिळून जमवायचे आणि तासाभराच्या भाड्यावर सायकलची हौस भागवून घेतलेले ते दिवस आठवले. आलटून पालटून सर्वांनी शिकायचे, एकमेकांना शिकवायचे, हे करत असताना पडलो झडलो, ढोपर कोपर फुटले, रक्तबंबाळ झाले तरीही माती लावून घ्यायची. पण या कानाची खबर त्या कानाला होऊ द्यायची नाही… अशा त्या बालपणावर काल सर्वच हायकूकारांच्या लेखण्या मनसोक्त थिरकल्या. रचनांचा अक्षरशः पाऊस पडला. अनेकांनी विविध अंगांनी बालपण डोळ्यासमोर साक्षात उभे केले.
सर्वांच्या लेखणीला शुभेच्छा आहेतच.. तरीही एक सूचना करावीशी वाटते की हायकू मध्ये शब्दांची पुनरावृत्ती टाळून चित्राच्या पलिकडे जाऊन सूक्ष्म विचार करावा आणि अव्यक्त क्षण सतरा अक्षरांत टिपावा. कलात्मकता आणि कल्पकतेचा संगम दिसावा. आज मला हायकू परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनापासून आभार…!!
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
परिक्षक, सहप्रशासक सदस्य मराठीचे शिलेदार समूह



