अभिजात भाषेच्या वाटेवर माय मराठीची ‘झोळी’ फाटकीच..!!
वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर
अभिजात भाषेच्या वाटेवर माय मराठीची ‘झोळी’ फाटकीच..!!
ऑर्डर प्रमाणे केक ‘करुण’ मिळेल, ‘आर्शिवाद’ अपार्टमेंट, ‘पिन्याचे पाणी’, धोकादायक ‘वळन’, येथे ‘घान’ करु नये. या आणि अशाच मजेशीर पाट्या आपण कधी ना कधी वाचल्या असतीलच. पेंटरची चूक म्हणून आपण ती लगेच दुर्लक्षित करतो. पण खरेच मराठी शुद्धलेखन ही दुर्लक्ष करण्याची गोष्ट आहे का ?
कवीवर्य सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे, “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी”, मग असे भाग्य लाभलेल्या धन्य झालेल्या मराठी माणसांनी कुठवर अशुद्ध बोलावे, लिहावे ? की नियमबाह्यच लिहित जावे आणि अभिजात भाषेच्या मागणीसाठी शासनदरबारी फक्त गळे काढत राहावे ? नुकतीच एक बातमी वाचण्यात आली, की शालेय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी एक ‘महावाचन’, उपक्रम राज्यभर घेण्यात आला. त्यामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यात असंख्य चुका निदर्शनास आल्या. निदान शासनाच्या अखत्यारीत असलेल्या प्रमाणपत्रांना अचूकतेची जोड हवीच.
महाराष्ट्र राज्यात दर बारा कोसांवर भाषा बदलते म्हणतात. तसेच राज्याच्या प्रत्येक विभागानुसार त्यात बोलीभाषेचा शिरकाव झालेला, विदर्भात व-हाडी, झाडीबोली, तर जळगाव, खानदेश भागात अहिराणी, खानदेशीचा वावर , तिकडे कोकण किनारपट्टीत मालवणी, कोकणीचा गोडवा…अशा या महाराष्ट्रात मराठी भाषेमध्ये एकसुत्रीपणा यावा म्हणून प्रमाणभाषा निश्चित केलेली आहे. जी शासन दरबारी, पाठ्यपुस्तके आणि प्रशासकीय कामकाज यांत वापरली जाते.
गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मागणी सुरू आहे. कारण अभिजात भाषेचा दर्जा लाभल्यास त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव अनुदान मिळते. आजवर तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा लाभलेला आहे. मात्र केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांनुसार मराठी भाषा पात्र असूनही तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. यास कदाचित आपल्या मराठी बांधवांचीच उदासीनता दिसून येते. तसेच सध्याच्या उत्सवप्रिय काळात तर शासन दरबारीही ‘माय मराठीची झोळी’ फाटकीच आढळते.
खरेतर काही वर्षांपूर्वी जेव्हा आंतरजाल, गुगल यांची सोय नव्हती; तरीसुद्धा शुद्धलेखनाचे धडे प्रामाणिकपणे गिरवले जात. एखादा शब्द चूक की बरोबर ठरविण्यासाठी वर्तमानपत्र प्रमाण ठरवले जाई. इतके काटेकोरपणे लेखनाला महत्त्व असायचे. पण आजच्या चालतयं ना…काय होतं…? या काळात खरोखरच भाषेची दैना बघवत नाही. त्यातल्या त्यात याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा संवर्धनासाठी काही व्यक्ती मोलाचे कार्य करीत आहेत. जसे नागपूर येथील ‘मराठीचे शिलेदार’ बहुउद्देशीय संस्था, आपल्या व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून अनेक लेखक कवी घडवत आहेत. दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी शिस्तपालनाचे धडे देताना समूह प्रशासक राहुल पाटील तारेवरची कसरत करीत असतात. त्यांच्याच प्रेरणेने आजचा हा लेख आकारास आलेला आहे. हा लेख मराठीचे शिलेदार समूहास समर्पित….!
वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर
मुख्य सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध





