आजची स्त्री
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा पुणे

आजची स्त्री
‘आजची स्त्री’ ही केवळ कुटुंबापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात ठाम निर्णय घेत पुढे चाललेली आहे. म्हणूनच तिला म्हणतात.” नारी जगात लय भारी”. काळ बदलला, परिस्थिती बदलली, आणि त्या बदलासोबत स्त्रीची भूमिकाही अधिक व्यापक, सक्षम आणि प्रभावी झाली आहे. शिक्षण, उद्योग, राजकारण, विज्ञान, क्रीडा, कला, शासन असे एकही क्षेत्र उरले नाही जिथे आजची स्त्री आपली छाप उमटवत नाही. आणि स्वतःला सिद्ध पण करून दाखवते. पूर्वी म्हणजे ‘चूल आणि मुल’ असेच होते. घरातच बाईचा जीवनक्रम चालायचा. पती, सासू, सासरे आणि मुलं एवढेच तिचे राज्य असायचे. घरी आलेल्या नातेवाईक, लोकं यांचे करून फक्त कर्तव्य पार पाडणे एवढेच तिचे काम होते. तिच्या कर्तृत्वाला घराच्या चौकटीतच बंदिस्त केले जायचे. पण आज परिस्थिती पूर्णतः बदललेली दिसते.
भारतातील स्त्रीशक्तीची परंपरा फार जुनी आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली; त्यांच्यामुळे आज लाखो मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली. इंदिरा गांधी यांनी देशाचे नेतृत्व करत स्त्रीही सर्वोच्च पदावर पोहोचू शकते हे दाखवून दिले. क्रीडा क्षेत्रात पी. व्ही. सिंधू, मेरी कोम यांसारख्या महिलांनी जगभरात भारताचा झेंडा फडकावला आहे. अंतराळ क्षेत्रही मुलींनी काबीज केले आहे. आजची स्त्री आत्मनिर्भर आहे. ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करते. नोकरी, व्यवसाय, स्टार्टअप, शेती, कला अशा विविध क्षेत्रांत ती आपली ओळख निर्माण करत आहे. आर्थिक स्वावलंबनामुळे तिच्या निर्णयक्षमतेत वाढ झाली आहे. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते, स्वतःच्या पायावर उभी राहते आणि कुटुंबालाही आधार देते. अनेक स्त्रिया घर आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आहेत. “सुपरवुमन” हा शब्द उदयास आला आहे. तंत्रज्ञानाच्या युगातही स्त्रीने आपले पाय खंबीरपणे उभे केले आहेत.
आजची स्त्री अजूनही अनेक आव्हानांना सामोरी जाते. स्त्रीभ्रूणहत्या, लैंगिक अत्याचार, वेतनातील असमानता, कौटुंबिक समस्या पूर्णपणे नाहीशा झालेल्या नाहीत. समाजात अजूनही काही ठिकाणी जुन्या विचारसरणीचा प्रभाव दिसतो. पण आजची स्त्री या समस्यांपुढे झुकत नाही. ती कायद्याची मदत घेते, आवाज उठवते आणि अन्यायाविरुद्ध लढते. तिच्या या धैर्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत. तिला समाजाची उत्तम साथ मिळत आहे. आजची स्त्री फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठीही कार्य करत आहे. सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती, शिक्षण प्रसार या क्षेत्रांत ती पुढाकार घेत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. राजकारणातही महिलांचे प्रतिनिधित्व वाढत आहे. तिला समाज समजून घेत आहे.
कुटुंब व्यवस्थेतही आजची स्त्री महत्त्वाची भूमिका बजावते. ती मुलांना चांगले संस्कार देते, कुटुंबात प्रेम आणि समन्वय राखते.
आधुनिकतेसोबत परंपरांचा समतोल राखण्याची कला तिला अवगत आहे. ती बाई म्हणून आपली कर्तव्ये पार पाडते; परंतु त्याचबरोबर स्वतःची ओळख टिकवून ठेवते. आजची स्त्री आत्मविश्वास, शिक्षण, कर्तृत्व आणि संवेदनशीलता यांचा सुंदर संगम आहे. ती कठोर परिश्रम करते.समाजाच्या विकासातही तिचा मोठा वाटा आहे. “स्त्रीशक्ती” आजच्या वास्तवाचे प्रतिबिंब आहे. एकूणच, आजची स्त्री ही परिवर्तनाची शिल्पकार आहे. ती स्वप्ने पाहते, ती पूर्ण करण्यासाठी झटते आणि इतरांनाही प्रेरणा देते. तिच्या प्रगतीतच समाजाचा आणि देशाचा खरा विकास दडलेला आहे. म्हणूनच आपण सर्वांनी स्त्रीला समान संधी प्राप्त करून दिली आहे. “स्त्रीला फक्त लढ म्हणा, शाबासकी द्या आणि बघा घराचे, समाजाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.” ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, हे उगीच म्हणत नाहीत.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
===========



