‘रुसलेलं कुंकू’ मनाच्या गाभाऱ्यात आपली लाली पसरवत राहील; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

‘रुसलेलं कुंकू’ मनाच्या गाभाऱ्यात आपली लाली पसरवत राहील; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
काही दुःखांना शब्द नसतात, काही विरहांना अश्रूही अपुरे पडतात. काही आघात केवळ पानच नाही; तर संपूर्ण जीवनग्रंथच विस्कटून टाकतात. हा असाच आघात होता, कालपर्यंत अभिमानाने मिरवणारं कुंकू अचानक कसं रुसलं होतं? जीवनाच्या आभाळात, सुखी संसारात एकमेकांच्या हातात हात घेऊन चालणारे तुम्ही. एकाला ठेच तर दुसऱ्याला इजा… शरीर वेगळे पण विचार एक,आदर्शवत संसाररुपी रथाचे एक चाक अचानक असं कसं निखळून पडलं?
उद्याची ती स्वप्न, हसण्याचे ते क्षण, प्रेमाची, संसाराची फुललेली ती मोहकबाग सारं कसं उन्मळून पडलं. रुसलेलं कुंकू एवढं रुसलं की, त्याने तुमचं सारं विश्वच जणू पुसलं… एक अपघात…. आयुष्याला अशी कलाटणी देऊन गेला की आपण म्हणून जगणाऱ्या तुम्ही… आज ‘मी’ हा एकटेपणाचा शब्दच केवळ उरला. मृत्यू येतो तो फक्त माणसाला घेऊन जात नाही, तर स्वतः सोबत कित्येक स्वप्न, कितीतरी संवाद, उद्याचे क्षण आणि आयुष्यभर जपलेल्या आठवणी..सारं काही नेतो सोबत. सोडून जातो मागे केवळ एक कधीही न संपणारी प्रतीक्षा.
होय तेच कुंकू…ज्यात तुमच्या संसाराचं तेज सामावलेलं होतं. जी तुमच्या सहजीवनाची खरी ओळख होती. जे तुम्हा दोघांच्या अतूट प्रेमाचं प्रतीक होतं. ज्यात अनेक वर्षाची सेवा, त्याग, समर्पणाचा भाव होता. हे असं अचानक कसं बरं रुसलं? त्या रुसलेल्या कुंकूला मला एकच विचारावसं वाटतं…कुठे काय थांबलं? कालचक्राच्या गतीत तर सारं काही पुन्हा गतिमान झालं, भले हळूवार असेल, पण सुरू तर झालं. पण तुमच्या आयुष्यातली ही पोकळी, हा विरह, ही उणीव कधी आणि कशी बरं भरून निघणार?
घराच्या भिंतीही त्याच आहेत. देवघरात तेच देव आहेत… येणारे जाणारे तेच आहेत.. पण…पण नेहमी तुमच्या अवतीभोवती फिरणारी ‘काय करते आहे कविता? जरा बस ना हाताला आराम दे.. हा आवाज पुन्हा कधी ऐकायला मिळणार? कुंकवाच्या रंगाने नाही तर आठवणीच्या उबेतून, स्वाभिमानाच्या तेजातून, नव्याने उभं तर राहावे लागेलच. पण रुसलेलं कुंकू मनाच्या त्या गाभाऱ्यात सदैव आपली लाली पसरवत राहील.
आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘रूसलेले कुंकू’ हा भावनाप्रधान, मनाचा ठाव घेणारा विषय दिला आणि अनेक महिन्यांच्या माझ्या मनाच्या द्वंद्वाला जणू काही मोकळं रान मिळालं मी मनमोकळेपणे व्यक्त झाली. अर्थात सोबत होती पेनातील शाईची आणि माझ्या अश्रूंची. आपण सर्वजण आपापल्या परीने खूप छान व्यक्त झालात. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन पुढील लेखनासाठी अनंत कोटी शुभेच्छा…!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



