चाळीशीच्या वळणावरचं प्रेम
प्रतिमा नंदेश्वर ता. मूल, जि.चंद्रपूर

चाळीशीच्या वळणावरचं प्रेम
प्रणाली व राजेश यांच आयुष्य आपापल्या वाटेवर निट चाललेल होत. त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल आपल्या आयुष्यात कुणी अस अचानक येईल आणि कायम हृदयात घर करून जाईल.. एखादा आपल्या जीवनात येतो आणि आपल जगच बदलून जात. अगदी तसेच प्रणालीच्या आयुष्यात राजेश आला होता. मोबाईल वर गुडमॉर्निंग मॅसेज नंतर संवाद सुरू झाला हळूहळू संवाद वाढत गेला.ती चाळीशीची तो पस्तीसच्या आसपास म्हणतात ना, प्रेमाला वय नसतं. अगदी तसचं घडल.. एकमेकांना न बघताही ते प्रेमात पडले. काहीवेळ वास्तविक जबाबदारी विसरून दोघेही वागू लागले.एक अनामिक ओढ त्यांच्या मनात वाढू लागली. आभासी जगात दोघेही भेटू लागले.
जरी दिसले नाही तरी प्रेम अनुभवत होते. जसे तुटलेल्या पंखांना बळ हरवलेल्या स्वप्ननांना जगण्याचे भान यावे अगदी तसेच राजेशची सोबत प्रणालीला लाभली.. एकदा आता भेटायचे असे ठरले. एका शहरात ते दोघे भेटतात पहिल्या भेटीत सागराला भरती यावी अगदी तसाच आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर ओसंडून वाहात असतो. काही वेळ भान विसरून वेड्यासारखी प्रीत उसळतांना ही हक्काची सोबत एकमेकांना मोठा आधार वाटू लागते. दोघांच्या वयात खूप तफावत असतांनाही ते एकमेकांना पसंत करू लागले.
दोघांच्या मनात प्रेम इतक रूजलं की ते काही वेळासाठी जग विसरून जाता. तो तिची खूप काळजी घेत असतो.प्रणालीलाही एक क्षण त्याच्याविणा राहवेना..ती नेहमीच म्हणायची किती काळजी घेतोस रे माझी त्यावर राजेश म्हणायचा अग मी तुझ्यावर प्रेम करतोय ना, हळूहळू तिच अस्तित्व राजेशच्या जीवनात वाढतच गेल. एकत्र चहा,नास्ता, जेवण आता एकमेकांना भेटल्या शिवाय त्यांना चैनच पडत नसे..प्रेम म्हणजे मिळणं नाही फक्त जपणं त्याच्या आनंदात आपला आनंद शोधणं हेच तर खरं प्रेम असतं.असच त्या दोघांनी एकमेकावर खूप प्रेम करू लागले..!!
पण जेव्हा त्यांना कळले आपण कधीच एक होवू शकत नाही. या भावनेन त्यांच मन मात्र कोलमडलं, कोसळलं डोळ्यात पाणी आलं वेळ पुढे सरकत गेलं. तशा भेटीही कमी होत गेल्या. रेशीम धाग्यात बांधलेल, जीवापाड जपलेल, हृदयाच्या स्पंदनात खोलवर रूजलेल नातं आता तुटण्याची त्यांना भिती वाटू लागली. पण प्रेमाच नात नुसतच नातं नसतं इतक्या सहजासहजी तुटत नसतं. एकमेकांच्या आठवणीत जगण्याचा एक भक्कम आधार असतो. जरी कधी झालेच दोघात रूसवे फुगवे तर निखळ, निस्वार्थी प्रेमात ते विसरून परत बोलायचे एकमेकांची आता सवय झाली होती.पण वास्तवात ते कधीच एकत्र येऊ शकत नव्हते याची सल दोघांच्याही मनात होतीच.
दोघेही विवाहित ते आपला संसार सोडू शकत नव्हती, हातात हात घेऊन जगू शकत नव्हती..आता मनाला कितीही मजबूत केल तरी त्याच्याशिवाय जग अपूर्णच भासत होत. हृदय कुठेच रमत नव्हतं.मनाच्या कोपऱ्यात आठवणी इतक्या खोलवर रुजल्या की त्या विसरण कठीणच, त्या व्यक्तीचा स्पर्श,आवाज, हसू सगळ मनात पुन्हा जिवंत होत गेल..!
सर्वांनाच प्रेम मिळत नसतं कधी कधी प्रेम अपूर्णही राहतं. संवाद तुटतो भेट पण होत नाही प्रेमात माणूस हसतो तितकाच रडतोही पण तरीसुद्धा त्या वेदनेतही वेगळीच गोडी असते. ती व्यक्ती मनातून कधीच जात नाही आठवण बनून सावली सारखी सोबत राहते.त्यावेळी त्यांना एवढेच वाटतं. “लग्न करून सोबतच राहाव असही काही नाही.एकमेकांच्या आयुष्यात असणं पुरेस आहे.”चाळीशीतल्या वळणावरच प्रेम कदाचित असच असतं हक्क न मागता मिळालेलं.”आता प्रणाली व राजेश शरीराने दूर असले तरी मनाने ते जवळच आहेत.कारण प्रेम कधी तुटत नसतं.आजही आठवण बणून मोरपीसाप्रमाणे हृदयातील पुस्तकात कायम सोबत आहे..!
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर



