कुस्तीपटू ‘श्रावणी चौगुले’ची राष्ट्रीय सुवर्णपदकास गवसणी
स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे मुख्य सहसंपादक 'साप्ताहिक साहित्यगंध

कुस्तीपटू ‘श्रावणी चौगुले’ची राष्ट्रीय सुवर्णपदकास गवसणी
इयत्ता तिसरीत असल्यापासून तिने सरावाला सुरुवात केली. खरेतर खेड्यात राहून प्रवाहाविरुद्ध विचार करणे धाडसाचेच. पण हा विचार तिच्या वडिलांनी केला आणि तिला कुस्तीपटू म्हणून घडवायला सुरूवात केली. काहीजण साथ देणारे असतात, तर काहीजण नावं ठेवणारेही असतात. पण याचा विचार न करता स्वविचारावर ठाम राहत श्रावणी व तिच्या वडिलांनी पुढील वाटचाल सुरू केली. सुरूवातीला केस कापल्यानंतर तिला शाळेत थोडा संकोच वाटत होता. पण कळसमधील जि. प. प्राथमिक शाळेतील तिच्या तेव्हाच्या वर्गशिक्षिका श्रीम. घुगे मॅडम व मीही.. तू खूप छान व वेगळे क्षेत्र निवडले आहेस असे सांगून तिला प्रेरणा देत होतो. यामुळे इतर विद्यार्थ्यांनीही तिला कधी चिडवण्याचे धाडस केले नाही. याचवेळी एकजण म्हणाले ही मुलगी तर एवढी शांत आहे मग तिला कुस्ती जमेल का? यावर मी ठामपणे म्हणाले होते. तिचा हाच शांत स्वभाव कुस्ती खेळताना तिला उपयोगी पडेल. शांत चित्ताने विचार करत ती आपले डाव खेळणार व नक्कीच जिंकणार. आज या गोष्टीची मला मनोमन खात्री पटली.
कळस, ता. इंदापूर येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेली श्रावणी एक कुस्तीपटू म्हणून स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करत आहे. कळसच्या या कन्येने दिल्लीतील कुस्ती आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत संपूर्ण देशात महाराष्ट्राची मान उंचावली आहे. सध्या कळस येथील श्री हरणेश्वर विद्यालयात सातवीत शिकत असलेल्या श्रावणी नवनाथ चौगुले हिने दिल्लीतील त्यागराज स्टेडिअम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षे (वजन ३६ किलो) वयोगटातून सुवर्णपदकाला गवसणी घातली. या कुस्ती स्पर्धेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करत साखळी सामन्यात उत्तराखंड, राजस्थान, हरियाना व अंतिम सामन्यात दिल्लीच्या स्पर्धकाला अस्मान दाखवून सुवर्ण पदक पटकावले आणि देशात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला.
‘स्कूल गेम्स फेडरेशन’ इंडियातर्फे त्यागराज स्टेडिअम दिल्ली येथे ८९ वी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सहभागी झालेल्या श्रावणीने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच जिंकण्याचे इरादे स्पष्ट केले होते. तिने अत्यंत चपळाईने आणि कौशल्याने एकामागून एक तगड्या मल्लांना चितपट केले. उत्तराखंड, राजस्थान आणि कुस्तीचा गड मानल्या जाणाऱ्या हरियानाच्या मल्लांना तिने पराभवाचे पाणी पाजले. दिल्लीच्या स्पर्धकाविरूद्ध खेळताना श्रावणीने आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्पर्धी मल्लाला अस्मान दाखवत सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केले.
एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रावणीच्या प्रवासात पावलोपावली अडचणी होत्या. पण उन्हातान्हात राबणाऱ्या वडिलांचे कष्ट आणि त्यांनी दिलेली प्रेरणा श्रावणीसाठी ऊर्जा ठरली. गादीवरच्या कुस्तीत उतरण्यापूर्वी तिने गरिबी आणि सोयी-सुविधांच्या अभावाशी दोन हात केले. श्रावणीच्या या यशात तिचे वडील ‘नवनाथ चौगुले’ यांचा मोठा वाटा आहे. आपल्या मुलीने कुस्तीसारख्या मर्दानी खेळात नाव कमवावे, हे त्यांचे स्वप्न श्रावणीने आज सत्यात उतरवले. तिच्या या यशासाठी तिचे हार्दिक अभिनंदन. तिचे हे यश आज दिसत असले, तरी या यशामागे आहे गेल्या पाच वर्षांपासूनची तिची मेहनत, चिकाटी व संयम आहे. यापुढेही आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला यश लाभो व देशाचे नाव उज्ज्वल होवो याच शुभेच्छा.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
मुख्य सहसंपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध



