Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनखानदेशदादरा नगर हवेलीदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

‘रमणीगर्व’ हा अहंकार नसून, स्त्रीत्वाचा आत्मविश्वास आहे; सविता पाटील ठाकरे

बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 6 7 7 4 8

‘रमणीगर्व’ हा अहंकार नसून, स्त्रीत्वाचा आत्मविश्वास आहे; सविता पाटील ठाकरे

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

ती अबला नाही, ती सबला आहे. ती परावलंबी नाही, ती स्वावलंबनाची प्रेरणा आहे. ती केवळ कोणाची कन्या, पत्नी, माता किंवा भगिनी नाही तर ती स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची स्वामिनी आहे. तिच्याच अस्तित्वाने सृष्टीला अर्थ प्राप्त होतो. तिच्या संस्कारांनी पिढ्यांना दिशा मिळते. तिच्या कर्तृत्वाने इतिहासाला नवे पर्व लाभते. ‘ती केवळ सौंदर्याची प्रतिमा नव्हे, ती सृष्टीच्या सृजनशीलतेचा साक्षात आविष्कार आहे’. तिच्या अस्तित्वात कोमलतेचा गंध आहे, तर तिच्या व्यक्तिमत्त्वात वज्रासमान कठोरतेचे सामर्थ्यही सामावलेले आहे. तिच्या हास्यात चांदण्यांची शीतलता आहे, तर तिच्या संघर्षात सूर्याची प्रखरता आहे. ती कधी वात्सल्याची मूर्तिमंत प्रतिमा होते, कधी कर्तृत्वाचा उत्तुंग शिखर गाठते. ती आपल्या स्वाभिमानासाठी संपूर्ण व्यवस्थेलाच प्रश्न विचारण्याचे धैर्य दाखवते.

ती प्रयोगशाळेत संशोधन करते सोबत अवकाशात झेप ही घेते. ती देशाच्या सीमांचे रक्षण करते आणि न्यायासनावर बसून न्यायदान ही करते. ती उद्योगविश्वात नवनिर्मिती करते आणि घराच्या उंबरठ्यापासून जागतिक व्यासपीठापर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवते. तिच्या हातातील पाळण्याची दोरी आणि तिच्या हातातील विज्ञानाचे उपकरण या दोन्ही गोष्टी समान प्रतिष्ठेच्या आहेत. कारण स्त्रीचे सामर्थ्य तिच्या कार्यक्षेत्राच्या मर्यादेने ठरत नाही, तर तिच्या विचारांच्या उंचीने निश्चित होते. खरे तर समाजातील प्रत्येकच स्त्री ही अभिमानी आहे, ‘रमणीगर्व’ हा अहंकार नसून, स्त्रीत्वाचा आत्मविश्वास आहे. तिच्या या बहुआयामी अस्तित्वाचा गौरव म्हणजेच ‘रमणी गर्व!’

रमणी असणे म्हणजे केवळ स्त्री असणे नव्हे; तर आपल्या स्त्रीत्वातील सामर्थ्याची जाणीव असणे होय. स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार, स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान आणि स्वतःच्या अस्मितेचे निर्भय जतन म्हणजे रमणी गर्व. हा गर्व अहंकाराचा नाही, तर आत्मभानाचा आहे. तो दुसऱ्याला कमी लेखण्यातून निर्माण होत नाही, तर स्वतःचे मूल्य ओळखण्यातून फुलतो. निसर्गाने तिच्या व्यक्तिमत्त्वात कितीतरी रंग भरले आहेत. ती नदीसारखी प्रवाही आहे. पर्वतासारखी स्थिर आहे. आकाशासारखी विशाल आहे. धरतीसारखी सहनशील आहे. इतिहासाची पाने उलटली की, स्त्रीशक्तीच्या तेजस्वी परंपरेचे असंख्य दीप आपल्या नजरेसमोर उजळतात.

जिजाऊंच्या संस्कारांतून स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे शिवछत्रपती घडले. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी समाजाच्या अवहेलनेची पर्वा न करता स्त्रीशिक्षणाचा ज्ञानदीप प्रज्वलित केला. अहिल्यादेवी होळकरांनी न्याय, प्रशासन आणि लोककल्याण यांचा आदर्श निर्माण केला. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंनी पराक्रमाची नवी व्याख्या लिहिली. या स्त्रियांचे कर्तृत्व केवळ इतिहासाचा विषय नाही तर ते प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाला मिळणारे चिरंतन बळ आहे.

‘रमणी गर्व’ म्हणजे स्त्रीत्वाचा अहंकार नव्हे, तर स्त्री-अस्तित्वाचा स्वाभिमानी हुंकार! याच भावनेने आज बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार ‘ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी हा विषय दिला. सर्वांनीच विषयाला खूप छान सजवले. भगवद्गीतेतील दहाव्या अध्यायातील ३४ व्या श्लोकात सांगितलेय, “कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा। अर्थात स्त्रियांमध्ये लक्ष्मी ही कीर्ती, वाणी, स्मृती, बुद्धिमत्ता, धैर्य आणि क्षमा या गुणांच्या रूपाने वास करते”. म्हणजेच स्त्री ही केवळ सौंदर्याची प्रतिमा नसून बुद्धिमत्ता, धैर्य, विवेक, संयम आणि क्षमाशीलतेचा अद्भुत संगम आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील हे गुणच तिच्या सामर्थ्याचे खरे वैभव आहेत. स्त्रीचा सन्मान म्हणजे तिच्यातील या दैवी गुणांचा सन्मान होय. “जिथे स्त्रीच्या बुद्धिमत्तेचा सन्मान होतो, तिच्या कर्तृत्वाला संधी मिळते आणि तिच्या आत्मसन्मानाचे रक्षण होते, तिथेच खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा जागर होतो.” हा जागर करण्याची संधी या निमित्ताने आदरणीय राहुल सरांनी उपलब्ध करून दिली. तेव्हा पुन्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदनही…!!

सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 7 4 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे