ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरसाहित्यगंध
पर्याय नव्हे, प्राधान्य हवे
वर्षा मोटे पंडित छत्रपती संभाजीनगर

0
6
3
9
6
0
पर्याय नव्हे, प्राधान्य हवे
तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात
माझेच अस्तित्व फुलावे,
शेकडो चेहऱ्यांच्या गर्दीत
माझेच प्रतिबिंब खुलावे …
प्रेम नको फक्त सोयीपुरते
अन् नको नाते गरजेपुरते
अढळ स्थान हवे हृदयात
म्हणून तुझ्यासाठी झुरते…
बहू पर्यायांच्या यादीमध्ये
माझे नाव मुळीच नसावे
तुझ्या मनाच्या निवडीमध्ये
माझेच स्थान खास असावे…
तुझ्या हास्यात माझा ऋतू
तुझ्या मौनात माझी चाहूल,
तुझ्या प्रत्येक स्पंदनातूनही
मला लागावी प्रितीची चाहूल..
येथे असतील वाटा शेकडो
पर माझ्याच वाटेने वळावे
अन् असतील चेहरे लाख
मन माझ्यातच तुझे गुंतावे…
नको शपथा चंद्रताऱ्यांच्या
नको शब्दांचे व्यर्थ अवडंबर
तुझ्या श्वासातूनही व्हावा
माझाच नाम जप निरंतर…
पर्याय होऊन जगण्यापेक्षा
वाटे एकमेव होऊन उरावे
सख्या तुझ्या माझ्यामधले
आता सारे सारे अंतर सरावे…
वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजीनगर
0
6
3
9
6
0



