प्राणांतिक वेदनामय… कट्टीचा महिना !!; शर्मिला देशमुख

प्राणांतिक वेदनामय… कट्टीचा महिना !!; शर्मिला देशमुख
बोलावे गोड बोल सर्वांशी
असावा सुखाचा सुकाळ…
नकोच कुठे अबोला जराही
कशास नाजूक मनाचे हाल…
झाले ना भांडण ?धरला ना अबोला ? किती अस्वस्थ आहेस? जमत नाही ना तिच्या वाचून राहणं ?नाही ना करमत तिच्याशिवाय? मग कशाला भांडत असता गं? आई समजावत होती वैष्णवीला. पण वैष्णवी चे रडणे थांबतच नव्हते. वैष्णवी आणि सरिता अगदी जिवलग मैत्रिणी. क्षणभर सोडून राहत नव्हत्या एकमेकींना. एकीला बोलले कोणी तर दुसरी उत्तरे देई. जणू दोन जीव एक प्राण होत्या त्या. पण अल्पशा कारणावरून दोघीत कसले बिनसले काय माहित आणि एकमेकींकडे त्यांनी पाठ फिरवली. दोघींनाही खरं म्हणजे अजिबात इच्छा नव्हती अबोला धरण्याची पण अहंपणा येतो ना आडवा कधी कधी आणि तसेच झाले. त्यांचा अबोला सर्व मैत्रिणी, शाळा, घरच काय तर गावात ही पोहोचला. जणू आता अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला की आधी कोणी बोलायचे? काही जणांना बरेही वाटत होते या दोघींचा दुरावा पाहून. शाळेत त्या दिवशी वैष्णवी सारखी रडत आहे हे बाईंच्या लक्षात आले.त्यांनी दोघींना जवळ घेऊन समजावले. त्यांचे बोलणे ऐकून दोघींच्याही डोळ्यातून अश्रू घळघळ ओघळत होते. वैष्णवी चा अचानक बांध फुटला तिने सरिताच्या गळ्याला मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागली. नकळत बाईंच्याही डोळ्यात अश्रू तरळले.काय होते आहे त्यांच्या पण लक्षात येईना .त्या आत्मचिंतन करू लागल्या. वैष्णवी चे रडणे साधे नव्हतेच. वातावरण शांत झाल्यावर बाईंनी वैष्णवीला बोलावून घेतले. तेव्हा तिच्याकडून समजले काल ती आईबरोबर आईच्या नातेवाईकांच्या मौतीला गेली होती,आई नको म्हणत असताना. एक जीर्ण शरीर झालेली आजोबा मृतावस्थेत निश्चल पडून होते. प्रथमच ती हे दृश्य पहात होती. सर्वांचा आरडाओरडा चालू होता, तितक्यात एका आजोबांना दोन मुलांनी तिथे पकडून आणले .ते धायमोकलून रडत होते.थरथरत आधाराने गुडघ्यावर टेकून बसून तोंड झाकून रडत होते. कोणीतरी म्हणाले बालपणीपासूनचे मित्र आहेत. आजपर्यंत सोबत राहिले आणि आज एक जण एकाला एकाकी सोडून जात आहे. हे पाहून वैष्णवीला सरिता दिसली जणू तिला जीवनाचे मर्मच समजले होते. चार दिवस जीवन आहे त्यात कशाला हा अबोला? तो ही क्षुल्लक कारणावरून? तिला तसेच पळत जाऊन सरिताच्या गळ्यात पडावे वाटले. पण ..पण ती बाहेरगावी होती. तिला खूप पश्चाताप झाला. त्या क्षणांनी तिला दाखवून दिले की जीवन किती क्षणभंगुर आहे त्यात आपण कशामुळे एकमेकांशी भांडतो आणि अबोला धरतो?आज आहेत तर उद्या….. असो.
आज आम्ही मराठीचे शिलेदार समूहामध्ये “आम्ही बालकवी ” समूहात स्पर्धेचा विषय आपले आगळेच वेगळेपण घेऊन अवतरला. “कट्टीचा महिना”. आता सुट्टीचा महिना ऐकले होते पण कट्टीचा महिना काय? नेहमीच विषयांचे वेगळेपण आणि कल्पनांना विविध पंख देणारी हस्ती म्हणजे राहुल दादा.. तर अशा कल्पक राहुल दादांनी कट्टीचा महिना तर अनुभवला नाही ना??? असा एक बालिश प्रश्न मनात आला आणि हसू आले. खरं म्हणजे कोणाच्याही आयुष्यात असा कट्टीचा महिना केव्हाही येऊ नये. कारण दोघांनाही होणाऱ्या वेदना अगणित असतात. स्वतःचा अहंपणा सोडून पुन्हा प्रेमाचा हात पुढे करण्यासाठी लागणारा मनाचा मोठेपणा सर्वांनी जपावा. जीवन आहे तरी काय आज आहे तर उद्या नाही. माणसांची किंमत वेळेत समजली तर ठीक नाहीतर आपण विनाकारण एखाद्याशी किती चुकीचे वागलो याचा पश्चाताप करण्याची आणि जीवनभर तोच डोक्यावर घेऊन वावरण्याची वेळ येऊ नये हीच अपेक्षा.
आज बाल कवी समूहात मात्र सर्वजण सुट्टीला गेले आणि सर्व मित्र- मैत्रिणी, आजी-आजोबा नातेवाईकां पासून दूर गेल्यामुळे कट्टीचा महिना जगले. सर्व शिलेदार बंधू-भगिनींनी सुट्टीच्या मौज मस्ती बरोबर कट्टीची ही मौज मस्ती अनुभवली. सर्व ताई दादांना पुढील बाल काव्य लेखणीच्या कल्पकतेसाठी भरभरून शुभेच्छा. राहुल दादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे शतशः ऋण. तूर्तास अल्पशी कट्टी घेऊन थांबते. धन्यवाद….!!