वृत्तीचा उकिरडा आणि संस्कारांचे मखमली कोंदण: मानवी पारखेचा अंतर्वेध
प्रा. डॉ. गोविंद पांडुरंग चौधरी (देव)

वृत्तीचा उकिरडा आणि संस्कारांचे मखमली कोंदण: मानवी पारखेचा अंतर्वेध
मानवी जीवन हे परस्पर संबंधांच्या विणलेल्या एका महावस्त्रासारखे आहे. या वस्त्रात कधी रेशमी धागे येतात, तर कधी खरखरीत तागाचे दोर. संत साहित्यापासून ते आजच्या आधुनिक तत्त्वज्ञानापर्यंत एका गोष्टीवर नेहमीच भर दिला गेला आहे, ती म्हणजे, ‘संगती’ आणि ‘प्रवृत्ती’. एका प्रसिद्ध महाराजांनी आपल्या हितगुजात गाढवाचे जे मार्मिक उदाहरण दिले, ते केवळ उपहासात्मक नसून मानवी मानसिकतेच्या एका गडद सत्यावर प्रकाश टाकणारे आहे. ते म्हणतात, “गाढवाला कितीही सुगंधी शॅम्पूने आंघोळ घातली, त्याला मखमली झूल पांघरली आणि पंचपक्वान्न खायला दिली, तरी त्याची अंतिम ओढ त्या उकिरड्याकडेच असते.” हे विधान वरकरणी कठोर वाटले, तरी ते ‘स्वभावदोष’ आणि ‘मूळ प्रवृत्ती’ यांचे दर्शन घडवणारे आहे.
संतांनीही या मानवी प्रवृत्तीवर अत्यंत रोखठोक भाषेत भाष्य केले आहे.
”काय कराली आंघोळी। भीतरि सकळ विटाळी ॥”
अर्थातच, जर अंतर्मनच दूषित असेल, तर बाहेरून कितीही स्नान घातले किंवा कितीही संस्कार केले तरी त्या विटाळाचा नाश होत नाही. जगद्गुरु संत तुकोबाराय पण म्हणतात की, माणसाची ‘जात’ सात्त्विक नसते, तोपर्यंत त्याला प्रेमाची आणि सद्गुणांची ‘खूण’ किंवा किंमत कळत नाही. ज्याप्रमाणे गाढवासाठी उकिरडाच सर्वस्व असतो, तद्वतच कुत्सित प्रवृत्तीच्या माणसाला आपण कितीही सन्मान दिला तरी तो आपल्या मूळ घाणेरड्या स्वभावाकडेच परत जातो.
स्वभावाचा अटळ परिपाक:
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अशी अनेक ‘माणसं’ भेटतात, ज्यांना आपण आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवतो. आपण आपला वेळ, भावना, श्रम आणि प्रसंगी सर्वस्व त्यांच्यासाठी पणाला लावतो. आपल्याला वाटते की आपल्या प्रेमाच्या पावसाने त्यांच्यातील स्वार्थाची आणि नीचतेची धूळ धुवून निघेल. पण वास्तव याच्या उलट असते. काही लोकांच्या रक्तात आणि वृत्तीतच एक प्रकारचा ‘कॅन्सर’ असतो. हा कॅन्सर म्हणजे कृतघ्नतेचा आणि क्षुद्रतेचा. अशा प्रवृत्तीच्या माणसांना आपण कितीही सन्मान दिला, तरी त्यांची ओढ खालच्या स्तरावर अर्थात उकिरड्यावर जाण्याकडेच असते.
पशू बरा, पण प्रवृत्तीचा गुलाम नको:
प्राणीजगताकडे पाहिले तर लक्षात येते की, जनावरं किमान कृतज्ञतेची भाषा तरी जाणतात. घरातला पाळलेला कुत्रा कोरड्या भाकरीच्या तुकड्यासाठी आपले आयुष्य आपल्या चरणी अर्पण करतो. कारण त्याच्याकडे ‘इमान’ आहे. पण मानवी जगात मात्र बुद्धीचा वापर हा अनेकदा विश्वासघातासाठी केला जातो. ज्या माणसांच्या अंतर्मनात उकिरडा साचलेला असतो, त्यांना स्वच्छ आणि निर्मळ हृदयाची किंमत कधीच कळत नाही.
समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोधात’ अशा अधम प्रवृत्तीच्या माणसांचे वर्णन करताना म्हटले आहे –
”अधमास उत्तम गुण सांगे। तो अधम आपणासचि लागे।
जैसा श्वान विष्ठेसीच लागे। नाना पक्वान्ने सोडूनी ॥”
समर्थ म्हणतात की, अधम माणसाला कितीही उत्तम गुण शिकवले तरी ते व्यर्थ जातात. ज्याप्रमाणे श्वान समोर ठेवलेली पक्वान्ने सोडून विष्ठेकडे धावतो, तशीच ही ‘गाढव’ प्रवृत्तीची माणसे सुसंस्कृतपणा सोडून उकिरड्याची वाट धरतात.
ओळखण्याची कला, काळाची गरज:
आजच्या काळात ‘माणूस ओळखणे’ हे कोणत्याही शास्त्रापेक्षा कठीण झाले आहे. मुखवटे इतके मोहक आहेत की त्यामागील हिडीस चेहरा शोधणे जिकिरीचे झाले आहे. पण महाराजांच्या हितगुजातील त्या वाक्यात एक मोठा संदेश आहे. “अशा लोकांना हृदयात जागा देण्यापेक्षा उकिरड्यावर सोडलेले बरे.” हे विधान द्वेषातून आलेले नसून ते ‘आत्मसन्माना’तून आलेले आहे.
कसे जगावे?
माणूस म्हणून जगताना आपण नक्कीच प्रेमळ असावे, पण आपले प्रेम हे ‘अंध’ नसावे. कोणावर किती विश्वास टाकावा आणि कोणाला हृदयाच्या गाभाऱ्यापर्यंत प्रवेश द्यावा, याचे भान असणे म्हणजे ‘विवेक’ होय.
१. पात्रता ओळखा: प्रत्येकाला आपल्या आयुष्यात स्थान देताना त्याची पात्रता तपासा. ज्याची दृष्टी केवळ उकिरड्यावर आहे, त्याला तुम्ही आभाळ दाखवू शकत नाही.
२. ऊर्जा वाचवा: वाळूवर नक्षी काढण्यात आणि दगडात प्राण फुंकण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नका. काही माणसे बदलण्यासाठी नाही, तर केवळ अनुभव घेण्यासाठी आपल्या आयुष्यात येतात.
३. अलिप्तता शिका: जेव्हा आपल्याला लक्षात येईल की समोरची व्यक्ती आपल्या प्रेमाच्या लायकीची नाही, तेव्हा शांतपणे त्या व्यक्तीला त्याच्या नशिबावर अर्थात उकिरड्यावर सोडून द्या.
शेवटी, गुलाब हा चिखलात रुजला तरी तो सुवासच देतो आणि गाढवाला स्वर्गात नेले तरी तो उकिरड्याचाच ध्यास धरतो. आपण कुणाला कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येकाचा ‘डीएनए’ (DNA) हा त्याच्या कर्माने आणि विचाराने ठरलेला असतो. अशा ‘कॅन्सर’ प्रवृत्तीच्या लोकांसाठी स्वतःच्या मनाचे मंदिर अशुद्ध करण्यापेक्षा, त्यांना जगाच्या विस्तीर्ण उकिरड्यावर त्यांच्या प्रवृत्तीसह सोडून देणे, हेच मानवी जीवनाचे खरे शहाणपण आहे. माणसावर प्रेम जरूर करा, पण लक्षात ठेवा की माणूस म्हणून ‘माणूस’ असावा, केवळ मानवी देह धारण केलेला ‘गाढव’ नसावा.
प्रा. डॉ. गोविंद पांडुरंग चौधरी (देव)
उपप्रचार्य तथा सहा. प्राध्यापक
ता. धर्माबाद, जि. नांदेड
======



