संक्रमण : सण संक्रांतीचा…!
अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि.अहिल्यानगर

संक्रमण : सण संक्रांतीचा…!
‘राशिभविष्य, शेती अन् संस्कृती..
इतिहास, भूगोल, गणितासह वाढविते महती भाषेची..
अशी ही स्नेहाचे संक्रमण करणारी संक्रांती..’
लहान-थोरांसह सर्वांना देते पर्वणी आनंदाची…!’
‘मकर संक्रांती’ हा भारतीय संस्कृतीतील एक आगळा-वेगळा सण आहे. पौष महिन्यात, जानेवारीच्या मध्यावर येणारा हा सण सौर कालगणनेवर आधारित असल्याने दरवर्षी एकाच दिवशी म्हणजे 14 जानेवारीला साजरा होतो. सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात, प्रकाश वाढतो आणि अंधार मागे सरकू लागतो. म्हणूनच संक्रांती म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर निसर्गाच्या बदलत्या लयीशी जुळवून घेतलेला जीवनोत्सव आहे.
भौगोलिक दृष्टीने पाहता, हा काळ ऋतूंच्या वळणावरचा असतो. उत्तरायणाच्या प्रारंभाने थंडीचा कडाका ओसरतो, सूर्यकिरणांमध्ये ऊब येते आणि भूमी नव्या पिकांसाठी सज्ज होते. भारतासारख्या कृषीप्रधान देशात हीच वेळ श्रमाचे फळ हातात येण्याची, धान्याने भरलेल्या कोठारांची, समाधानाने उजळलेल्या डोळ्यांची. त्यामुळे संक्रांती शेतकऱ्यांसाठी आशेचा आणि कृतज्ञतेचा सण ठरतो.
“हरभरा, वाटाणा, पावटा अन् भाजी गाजराची, एकात एक मिसळून वाढविते गोडी बाजरीच्या भाकरीची.”
या सणातली भाजी, भाकरी, तिळगूळ हे पदार्थ केवळ चवीपुरते मर्यादित राहत नाहीत; ते ऋतूबदलाच्या शहाणपणाची साक्ष देतात. उष्ण गुणधर्म असलेले तिळ आणि गूळ शरीराला ऊब देतात, तर मनालाही गोडवा देतात. म्हणूनच महाराष्ट्रात “संक्रांती म्हणजे नात्यांचं संक्रमण.”
“एवढ्याशा तिळाला गूळ साखर घालते आवरण,
सौंदर्य वाढते तिळाचे, भोवती स्नेहाचे शिंपण..”
“तीळगूळ घ्या, गोड गोड बोला..!” हा केवळ वाक्प्रचार नसून सामाजिक जीवनाचा मंत्र आहे. तिळासारखा कडूपणा आणि गुळासारखी गोडी स्वीकारून एकत्र राहण्याची शिकवण यातून मिळते. दुरावा विसरून संवाद साधण्याची हीच तर खरी संक्रांती. निळ्याशार आकाशात उडणारे रंगीत पतंग माणसाच्या आकांक्षांचे प्रतीक बनतात. हातातील दोरीवर तोल सांभाळत उडणारा पतंग जसा वाऱ्याशी संवाद साधतो, तसाच माणूसही या सणात सूर्याशी, प्रकाशाशी आणि नव्या ऊर्जेशी नातं जोडतो.
‘”प्रत्येकाच्या प्रेमाचा पतंग जाऊन भिडतो गगनाला’
‘काटाकाटीतही आनंद मिळतो मग साऱ्यांना..'”
महाराष्ट्रात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम संक्रांतीला विशेष महत्त्वाचा मानला जातो. सुवासिनी आपल्या साजशृंगारासह एकत्र येतात, वाण लुटतात आणि आनंद वाटून घेतात.हा स्त्रीजीवनातील सौहार्दाचा उत्सव ठरतो.
हळदी-कुंकवासह साजरा होतो मकरसंक्रांतीचा सण
साजशृंगार लेवूनी सुवासिनी आनंदाचं लुटतात वाण
संक्रांतीपाठोपाठ येणारी रथसप्तमीही सूर्योपासनेची आठवण करून देते. सहस्ररश्मी सूर्यदेवाच्या रथाची पूजा करून, तिळगुळाची पोळी अर्पण करताना भारतीय संस्कृतीत निसर्गपूजेचे स्थान किती खोलवर रुजले आहे, याची जाणीव होते.
“सहस्त्ररश्मीनी ओढीत रथ होते पूजा रथसप्तमीची
नैवेद्यासाठी रवी राजाला अर्पण करितो पोळी तिळा-गुळाची”
अशा प्रकारे मकर संक्रांती हा सण भूगोल, शेती, आरोग्य, संस्कृती आणि समाजजीवन यांचा सुंदर संगम घडवतो. अंधारातून प्रकाशाकडे, थंडीमधून ऊबेकडे आणि दुराव्यातून संवादाकडे नेणारा हा सण माणसाला पुन्हा एकदा माणूस बनवतो.निसर्गाशी नातं घट्ट करत, माणसामाणसांत गोडवा पेरत.
“असा हा सण संक्रांतीचा सोडायला लावतो अबोला,
सांगत फिरतो साऱ्यांना तिळगूळ घ्या, गोड बोला..!”
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि.अहिल्यानगर
========



