गोधडी : मायेची ऊब जपणारी शिदोरी
अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

गोधडी : मायेची ऊब जपणारी शिदोरी
‘गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्यांचा बोचका…’
‘गोधडी म्हणजे मायेला मिळणारी एक ऊब असते.’
इयत्ता आठवीच्या वर्गात अभ्यासक्रमात असलेली ‘प्रख्यात कवी डॉ. कैलास दौंड यांची ‘गोधडी’ ही कविता शिकवायला घेतली’. कवितेचे नाव ऐकताच मुला-मुलींना थोडे आश्चर्य वाटले. एक मुलगी तर म्हणाली, “मॅडम, गोधडी हा विषय का दिला अभ्यासाला? आता तर कोणी गोधडी वापरतही नाही.”
मी तिचे बोलणे थांबवत म्हणाले, “अगं, गोधडी हे फक्त अंथरूण-पांघरूण नाही. कवी सांगतात त्याप्रमाणे ‘स्मृतीच्या सुईने शिवलेलं ते एक वस्त्र असतं.’ असं वस्त्र की ज्याच्या प्रत्येक पदरात, प्रत्येक टाक्यात नात्यांचा गोडवा गुंफलेला असतो.” मग मी वर्गाला प्रश्न केला “कुणाच्या घरी गोधडी आहे? आणि कोण वापरतो?”
मुलं तर सोडाच, पण मुली देखील ‘आमच्या घरी गोधडी आहे’ हे सांगायला लाजत होत्या. कारण आधुनिक युगात लुगड्याची जागा जशी साडीने घेतली, तशी गोधडीची जागा चादर, रजई, दुलई, ब्लँकेट, रग या वस्तूंनी घेतली आहे. त्यामुळे अनेक घरात गोधड्या जुन्या फडताळात बांधून ठेवलेल्या असतात. पाहुणे आल्यावर अंथरूण कमी पडले, तरच त्यांचा वापर होतो. त्यामुळे मुलांच्या मनात गोधडीबद्दल थोडासा संकोच होता.
पण जेव्हा मी कवितेचा भावार्थ उलगडू लागले, तेव्हा विद्यार्थ्यांनाही गोधडीतील गोडी जाणवू लागली. हळूहळू मुलं अभिमानाने सांगू लागली की, त्यांच्या घरीही ‘गोधड्या’ आहेत आणि त्या वापरल्या जातात. मुलं आपल्या घरच्या गोधड्यांचे वर्णन करू लागली. रंगीबेरंगी कापडांच्या, रेशमी गोंड्यांच्या, आईच्या लुगड्यांच्या सोनेरी काठाच्या, त्रिकोणी – चौकोनी आकारांच्या कितीतरी गोधड्या जणू वर्गात उभ्या राहिल्या. मुलं इतकी रमली की माझी कविता, कविता न राहता जणू कादंबरीच झाली.
मी पुन्हा विषयाकडे वळले. ‘गोधडी ही आपल्या कौटुंबिक कष्टाची आणि जिव्हाळ्याची साक्ष असते.’
‘देई विश्वाची गोडी
‘माझ्या आईच्या लुगड्याची गोधडी
अंथरूण पांघरूण नव्हे ती मजसाठी
ती शिदोरी मायेच्या प्रेमाची.’
गोधडी कशी शिवतात हे मी सांगण्याआधीच मुलं सांगू लागली. अक्षदाची गोष्ट तर आगळीच. तिच्या गोधडीत तिच्या लहानपणीचे सगळे कपडे आईने किती प्रेमाने बसवले होते! मामांनी घेतलेला गुलाबी ड्रेस, पप्पांनी आणलेला हिरवा – पिवळा फ्रॉक, आजीने शिवलेला खणाचा परकर-पोलका आणि त्यावर आईच्या मायेचे मऊ लुगड्याचे अस्तर. आता मला पुन्हा कवितेकडे वळायचे होते.
‘गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका’. घरातील सगळ्यांच्या जुन्या कपड्यांचे तुकडे बापाच्या फाटक्या धोतराचे पट, आईच्या साडीचा पदर, मामांनी आणलेले कपडे हे सारे सुईदोऱ्याने जोडून आई किंवा आजी आठवणींचे धागे विणत गोधडी तयार करते.
‘थंडीपासून करावया संरक्षण शिवते आई गोधडी’
‘मायेची ऊब साठवून ठेवते अशी चौघडी’.
आता तोच वर्ग, जो गोधडीला जुनाट समजत होता, तो अभिमानाने सांगत होता, “मॅडम, आम्ही गोधडी प्रेमाने वापरतो.” एक मुलगा म्हणाला, “मॅडम, गोधडी म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ना!” मी हसून म्हणाले, “अगदी बरोबर!” गोधडी, चौघडी, वाकळ, लपेटी… नावं वेगवेगळी, पण ऊब मात्र सारखीच. मला तर रजईपेक्षा गोधडीच आवडते, सगळ्याच ऋतूत ती हवीहवीशी वाटते.
“असल्या जरी चिंध्या तिच्यात,
तरी ती मखमली ऊब देते…”
आता माझा वर्ग गोधडीमय झाला होता. माया, ममता आणि आठवणींच्या ऊबदार भावनेत सगळेच हरवले होते. गोधडी ही गरीबांची वस्तू नसून मायेची श्रीमंती आहे हे विद्यार्थ्यांना उमगले होते. “बहीण-भावाच्या प्रेमाची असते जिथे साठवण, मायबापाच्या कष्टांची देते ती आठवण…” आता माझ्यातली कवयित्री जागी झाली होती. ‘गोधडी’ नावाची नवी कविता जन्माला येणार होती; पण तेवढ्यात तास संपण्याची बेल वाजली. गोधडीमय झालेल्या वर्गाला गोधडीची घडी करून ठेवावी लागली…! आणि मी मात्र त्या ऊबदार विचारांची शिदोरी मनात घेऊन वर्गातून बाहेर पडले.
.
अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
========



