‘धुमधडाका’ अन् ‘जल्लोष’, मनावर संयम हवा..!; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

‘धुमधडाका’ अन् ‘जल्लोष’, मनावर संयम हवा..!; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
साधारण रंगपंचमी झाली, की चैत्राचे वेध लागतात. सारी सृष्टी वसंताच्या आगमनाने धुंद झालेली असते. रंगपंचमीला उधळलेले रंग लेवून पाने फुले सजलेली असतात अनेक रंगी उधळण ठायीठायी दिसते. सर्वत्र रंगोत्सव सुरु असतो. वातावरणात एक प्रकारची लगबग सुरु असते. आंबा, कडुलिंब यांच्या मोहोराचा गंध, मोगरा, चाफ्याचा दरवळ, सगळीकडं तजेला, सृजनाची आस दिसते. पक्षी घरटी बांधण्यात दंग असतात. सृष्टीत असा सृजन सोहळा रंगात असताना माणसं उत्सवात मग्न असतात.
माणूस हा उत्सवप्रिय असतो. सण, सोहळे यात तो रममाण होतो. सणाचा उद्देशच हा असतो कि, सर्वांनी एकत्र यावे, आनंदाची देवाणघेवाण करावी. चैत्र महिन्याच्या प्रारंभ झाला कि गुढीपाडव्यापासून सण सुरु होतात. रामनवमी, ईद ए मिलाद, हनुमान जयंती असे अनेक सण, उत्सव सुरु होतात. विविध गावच्या यात्रा जत्रांना उधाण येतं. पालखी सोहळा, भंडारा गुलाल उधळण, नैवेद्य, सासनकाठ्या मिरवणं अशा प्रथा असतात. सर्वत्र उत्साह असतो. एकंदरीत या सण यात्रांखेरीज अनेक सोहळे साजरे होतात. आता लग्न सराई सुरु आहे. कुणाचे वाढदिवस, कुणाला परीक्षेत यश, कुणाची कुठल्या पदावर निवड, जिंकलेला सामना यांचा सोहळा साजरा केला जातो. साध्या साध्या कार्यक्रमांचे ‘इव्हेंट’ होतात. मग खर्चाची वारेमाप उधळपट्टी केली जाते.
आता लग्न समारंभात डीजे, नाच, मोठ्या आवाजात गाणी असतातच. पण अक्षता उकळताना किती तांदूळ पायदळी जातो. त्याऐवजी फुलांच्या पाकळ्या हा पर्याय छान आहे. जेवताना अती आग्रह करणं टाळता येऊ शकतं. खर्चाला आळा घालून आपण शांतपणे समारंभ साजरा करू शकतो. आता साध्या कार्यक्रमांचा जल्लोष केला जातो. मग विद्युत रोषणाई, डीजे, मोठ्या आवा जात जात गाणी, बेभान होऊन नाचणं, फटाके उडवणं हे गृहीत धरलं जातं. कोणत्याही समारंभात धुमधडाका अपेक्षित असला, तरी ध्वनी, वायू प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करावा. लेझीम, ढोल,सनई चौघडा या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. मनावर संयम ठेवून आपण कोणताही कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा करू शकतो. त्यासाठी मनात उत्साह असावा.
आता दिनांक सात मे रोजी आपल्या मराठीचे शिलेदार समूहातर्फे संभाजीनगर येथे राज्यस्तरीय भव्य काव्य वाचन स्पर्धा, अभिजात मराठी विशेषांक व पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा करूया. आजच्या काव्यत्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘धुमधडाका’ विषय छान आहे. शिलेदारांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह





