पत्रलेखन -जिव्हाळ्याचा विषय
गौरी संतोष नेर्लेकर नेवासा, जि.अहिल्यानगर

पत्रलेखन -जिव्हाळ्याचा विषय
पूर्वी म्हणजे मी प्राथमिक शाळेत असताना पोस्टमन काका यायचे. प्रत्येक वर्गात जायचे, खूप सारे पत्र त्यांच्याकडे असायचे. ते गावात तर घरोघरी जायचेच, पण त्यांना शाळेत सोपं जायचं आणि मग ते आम्हा मुलांकडे पत्र द्यायचे. कुणाचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारी पाजारी, आप्तेष्ट सर्वांची पत्रे यायची. आम्हाला देखील खूप मजा वाटायची. पत्र पोहोच करायला, एक वेगळीच मजा वाटायची.
त्यानंतर कॉलेजला बाहेरगावी जावे लागले. होस्टेलला राहावं लागलं मग आईचं पत्र यायचं, भावाचं पत्र यायचं. खूप छान वाटायचं. त्यामधून आईचं प्रेम, सांगितलेल्या सर्व प्रेमाच्या गोष्टी शाळेच्या आणि सर्वात महत्त्वाचं जीवनात उपयोगी पडणाऱ्या बहुमूल्य अशा गोष्टी आई सांगायची. पत्र म्हणजे एक अमूल्य भेट वाटायची आणि पुन्हा पत्र कधी येईल याची एक उत्सुकता मनामध्ये दाटलेली असायची. तसेच आलेल्या पत्राला उत्तर देताना सुद्धा तितकंच प्रेम जिव्हाळा वाटायचा.
खरंतर, पत्रामधून ज्या भावना व्यक्त होतात, करता येतात. त्या फोन किंवा व्हाट्सअपच्या मेसेज मधून नाही करता येत. फोनवरचा मेसेज हा वरवरचा वाटतो, कोरडेपणा वाटतो. त्या बोलण्यात ओलावा नसतो. पत्रामधून भावना, विचार चांगल्या प्रकारे मांडता येतात. भावनांची उकल, विचारांची देवाणघेवाण चांगल्या प्रकारे होते. ‘मन मोकळं करण्याचं साधन म्हणजे पत्रलेखन’.
परंतु काळाच्या ओघात पत्रलेखन हा विषय फक्त परीक्षेपुरताच मर्यादित झाला. खरंतर पत्र जिव्हाळ्याचा विषय. एका मैत्रिणींन दुसऱ्या मैत्रिणीला पत्र लिहावं, खुशाली विचारावी, जीवनातील सुखदुःखांचा लेखाजोखा उलगडावा. एकमेकांना अडचणी सांगाव्यात त्यावर काहीतरी उपाय निघतो आणि त्यानिमित्ताने एकमेकींच्या संसार विषयक आणि अडचणींचा ही उहापोह होतो. असंच मुलीनं आईला पत्र लिहावं, तिच्या तब्येतीची विचारपूस करावी. यातून आईला किती छान वाटेल. मुलानं वडिलांना पत्र लिहावं, वडिलांविषयीचे प्रेम आदर त्यातून व्यक्त करावं ही अमूल्य भेट ठरेल वडिलांसाठी.
एकमेकांना पत्र लिहून आपण त्यांच्या विषयीच्या भावभावना व्यक्त केल्या पाहिजेत. जेणेकरून भावनांचा ओलावा नात्यातील ओलावा कायम राहतो. सध्याच्या आधुनिक युगात फोनवरील मेसेजला जास्त महत्त्व आले. परंतु, विविध कारणास्तव आपण आप्तेष्टांना नातेवाईकांना मित्र-मैत्रिणींना पत्राद्वारे प्रेमाची भेट दिली पाहिजे. आभासी दुनियेत तरुणाई वाहत चालली. फोनवरील मेसेजच मुलांना आकर्षण वाटते. युवाशक्ती विधायक कामात गुंतण्याऐवजी आभासी जगात राहून कमी कष्टात यशाची अपेक्षा करते. अशावेळी या युवाशक्तीला यातून बाहेर काढणं गरजेचं आहे.
एकमेकांना पत्र पाठवण्यातून एकमेकांमधील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाढते. पंडित नेहरूंनी इंदिरा गांधीजींना पत्र पाठवलेली आहेत. जीवनाचा उद्देश जीवन कसं जगलं पाहिजे, जीवनातील चढ-उतार या सर्व गोष्टी पंडित नेहरू इंदिराजींना आपल्या पत्राच्या माध्यमातून सांगतात आपल्या सर्वांसाठी तो एक आदर्श आहे. खरोखर पुन्हा एकदा पत्र लेखन सुरू व्हावे. केवळ वरवरच्या दुनियेत न राहता जीवनाला वास्तविकतेचा स्पर्श व्हावा. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन, भावनांची, प्रेमाची चांगल्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी. आणि यासाठी पत्रलेखन हे खूपच प्रभावी आणि महत्त्वपूर्ण माध्यम आहे.
“पत्र लिहावे आप्तेष्टांना
मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना,
उलगडावा भावनांचा प्रवास
हर्षून जावे मनमोकळं होताना..”
गौरी संतोष नेर्लेकर
नेवासा, जि.अहिल्यानगर



