‘पंख पैंजण’ कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात, बरसल्या पावसाच्या कविता
'पाऊसधारा' कवी संमेलनातून वेचले साहित्यिकांनी काव्यमोती
‘पंख पैंजण’ कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात, बरसल्या पावसाच्या कविता
‘पाऊसधारा’ कवी संमेलनातून वेचले साहित्यिकांनी काव्यमोती
नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर व ‘मराठीचे शिलेदार’ प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या प्रसिद्ध कथाकार कुसुमलता वाकडे यांच्या पहिल्याच ‘पंख पैंजण’ कथासंग्रहाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, ऊरूवेला कॉलनी, वर्धा रोड नागपूर येथे दि. २३ जून २०२४ रोजी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
‘पंख पैंजण’ कथासंग्रहाचे प्रकाशन व ‘पाऊसधारा’ कवी संमेलनाचे आयोजन मराठीचे शिलेदार संस्था, बी. एस. फोर न्यूज चैनल, साप्ताहिक साहित्यगंध व बिनधास्त न्यूज चैनल यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. या कार्यक्रमास संमेलनाध्यक्षा म्हणून ज्येष्ठ कवयित्री ‘सविता धमगाये’ नागपूर, प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रत्नाकर तिडके, भंडारा, स्तंभलेखक डॉ. अनिल पावशेकर, ज्येष्ठ कवी डॉ. संजय पाचभाई, नागपूर, प्रमुख अतिथी समाजसेवक नितेश क्षीरसागर, अर्जुनी मोर, गोंदिया, बी एस फोर चैनलचे संपादक सूरज भिलकर, समाजसेविका आदिती सिरसीकर, नागपूर व लेखिका कथाकार कुसुमलता वाकडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘पंख पैंजण’ कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, बी एस फोर न्यूज चैनल व बिनधास्त न्यूज तर्फे सर्व मान्यवरांचा शाल, सन्मानचिन्ह, जागर मराठीचा विशेषांक, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या समारंभाचे प्रास्ताविक मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी मांडले. त्यांनी कथासंग्रहाच्या निर्मितीबाबतचा प्रवास व पाऊसधारा कवी संमेलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली. कथाकार कुसुमलता वाकडे यांनी आपल्या मनोगतीय भाषणातून ‘पंख पैंजण’ संग्रहातील कथा स्वानुभव लेखन असल्याचे सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा.रत्नाकर तिडके यांनी मराठी साहित्य व कवितेचा प्रवास उलगडून दाखवला. डॉ अनिल पावशेकर यांनी आपल्या भाषणातून लेखक कसा असावा व लेखकाने कसे लेखन करावे याबाबत मार्गदर्शन केले. तर डॉ संजय पाचभाई यांनी कवींनी बालमनात डोकावतांना बालपण वर्तमानात जगून बालकाव्य निर्मितीचा ध्यास मनी धरावा असे सांगितले. संमेलनाध्यक्षा सविता धमगाये यांनी आपला काव्यप्रवास उलगडतांना कविता कशाप्रकारे निर्माण होईल व दर्जेदार लिहिली जाईल याबाबत उपस्थितांना सांगितले.
याप्रसंगी मराठीचे शिलेदार संस्था व बी एस फोर न्यूजच्या वतीने नागपूर व ग्रामीण भागात प्रामाणिकपणे पत्रकारिता करणा-या प्रिंट मिडीया, डिजिटील मिडीया, इलेक्ट्रानिक माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘लोकशाही’ मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार ‘ज्ञानेश्वर पवार, बिनधास्त न्यूज भंडारा प्रतिनिधी संजय मेश्राम, बी एस फोर न्यूजचे संजय खांडेकर, व्हिडीओ जर्नालिस्ट रजत डेकाटे, मनीष वानखेडे, सिद्धेश सेंगर, मिताराम भोसले, प्रणय हाडके, शितल बोरकर, प्रवीण अडागळे, विनोद मोटघरे, चंद्रकात भोयर यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, जागर मराठीचा विशेषांक देऊन सन्मानित करण्यात आले.
‘पाऊसधारा’ कवी संमेलनात निमंत्रित कवींनी आपल्या बहारदार शैलीत काव्यरचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आयोजित कवी संमेलनात कवयित्री मेघा चेटुले, भंडारा, शाहिस्ता खान, यवतमाळ, कुसुमलता वाकडे, नागपूर, सिंधू बोदेले, नागपूर, प्रभाकर दुर्गे, गडचिरोली, वामन नील, नागपूर, डॉ संजय पाचभाई, नागपूर, प्रा. रत्नाकर तिडके, भंडारा, संजय खांडेकर, नागपूर, हर्षिता पाटील, नागपूर व कवी संमेलनास अनपेक्षितपणे उपस्थित झालेले सहप्रशासक, परीक्षक हायकूकार कवी हंसराज खोब्रागडे व कवयित्री प्रतिभा खोब्रागडे, अर्जुनी मोर, गोंदिया या सर्व कवींनी पावसाच्या कविता सादर केल्यात. आयोजित ‘पाऊसधारा’ कवी संमेलनातून साहित्यिकांनी काव्यमोती वेचल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून येत होता.
या प्रकाशन समारंभाचे बहारदार सूत्र संचालन कु. हर्षिता पाटील हिने केले तर आभार हंसराज खोब्रागडे यांनी मानले. याप्रसंगी शहरातील मराठी काव्यरसिक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तसेच दिलीप वाकडे, श्रीकांत पाचलवार, मुकेश मेश्राम, राहुल मेश्राम, रंजित वासनिक, भालचंद्र वरठी व वाकडे कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



