जातो माघारी विठूराया; पांडुरंग घोलप
जातो माघारी…विठूराया
जातो माघारी विठूराया
पंढरपूरा लागले पाय
धन्य झाला जन्म अवघा
मागाया न उरले काय… १
मी भक्तिभावाने केली
वारी तुझ्या पंढरीची
आस होती बा विठ्ठला
फक्त तुझ्या भेटीची… २
शीण गेला अवघा दूरी
तुझी पाहिली पंढरी
कृतार्थ झाले जीवन
हे दयाळा श्रीहरी…. ३
भेट झाली पावन झालो
समाधान दाटले उरी
मागितली जी इच्छा
खात्रीने होणार पूरी… ४
वारी करताना तुझी
पाहिला आनंद सोहळा
भक्तगण तुझ्या दर्शना
झाले होते गोळा… ५
टाळ मृदुंग होते करी
मुखी नाम तुझे पांडुरंगा
सारेच भारावून गेले
काय वर्णावे प्रसंगा…. ६
भक्तवत्सल तू सावळा
शोभला आज मंदिरी
वामांगी रखुमाई सवे
युगे अठ्ठावीस विटेवरी…. ७
भक्त पुंडलिकासम घडो
मज हाती मायबाप सेवा
हेच वरदान प्रार्थितो
तूज पंढरीच्या देवा…८
होवोत सुखी सारे
मागणे दुजे नाही
गोड नाम तुझे
मुखी सदा राही…९
जाताना माघारी आता
आनंदास नाही पारावार
वारकरी मी तुझ्या राऊळाचा
वारी तुझी करीत राहणार…१०
पांडुरंग एकनाथ घोलप
मु.पो.रोहोकडी,ता.जुन्नर जि.पुणे



