शैक्षणिक, साहित्यिक आणि समाजसेवा हीच आनंदाची त्रिसूत्री
वसुधा नाईक धनकवडी, जि.पुणे

शैक्षणिक, साहित्यिक आणि समाजसेवा हीच आनंदाची त्रिसूत्री
पैसा कमवून अनेक वस्तू विकत घेता येतात; सुखसोयी, दागिने, कपडे, घर, गाडी आणि अनेक गोष्टी मिळवता येतात. पण काही माणसे अशी असतात की, ती पैशाने स्वतःसाठी आनंद विकत घेत नाहीत, तर समाजसेवेसाठी आपला पैसा, वेळ आणि श्रम खर्च करून वेगळ्याच प्रकारचा आनंद कमावतात. त्यातील मी एक वसुधा. माझ्यासाठी समाजसेवा म्हणजे केवळ प्रसिद्धीचा मार्ग नाही, तर ती मनाची खरी गरज आहे. घरदार, नोकरी यातून आनंद मिळवायचा असेल तर खरंच समाजास आपण जोडले जावेत, असे माझे मत आहे. नको ते वादविवाद फक्त प्रेम आणि प्रेम आणि प्रेम हवे. हा माझा स्वभाव आहे असे म्हणाल तर मी खूप लहान होते तेव्हापासूनच आहे. मी फलटणमधे राहत होते.
माझा जन्म पुण्यातला, शिक्षण फलटण. मुधोजी बालक मंदिर, मुधोजी हायस्कूल आणि मुधोजी कॉलेज. त्यावेळी 1983 मधे मुधोजी कॉलेजला असताना तिथे मा. शिवाजीराव भोसले हे प्राचार्य म्हणून होते. त्यांच्या सानिध्यात एक वर्ष मिळाले. त्यांच्या विचारांचा थोडाफार पगडा माझ्यावर आहे. त्यांच्या ज्ञान सागरात अगदी पाय ओले होतील इतके पण मी घेऊ शकले नाही असे मी म्हणेन. मला आठवतंय मी अगदी दुसरी, तिसरीत असताना आमच्या घरी बोहरीण यायची, सुया, बिब्बे घे ग माय… म्हणत पूर्ण गल्ली फिरायची.!! ज्यावेळी ती आमच्या घराशी येत असेल त्यावेळेला तिच्याकडे तिचे मूल झोळीत बांधलेले, तिच्या छातीशी असायचे. (आजही हे दृष्य दिसते. ) त्या मुलाकडे बघितले की माझे मन अस्वस्थ व्हायचे. आई रागवेल ओरडेल हा विचार न करता त्या बाईला ते मुल माझ्याजवळ मागत असे. आणि ती जेवढ्या वेळ आमच्या तिथे त्या एरियामध्ये असायची तेवढ्या वेळ ते माझ्याकडे असायचे. ते काळे काळे बाळ, नाकाला शेंबूड आहे ढुंगी उघडी आहे, बाळ उघडेच असायचे. कपडे सुद्धा नसायचे असे ते बाळ बघितल्यानंतर खूप माया दाटून यायची.
मग आई माझी त्याला ते झबले, टोपडे द्यायची… आणि मी त्याला नटवायची. त्या आईला अतिशय आनंद होत असे.. तिला स्वतःचे बाळ असे बघून ती मनात खुश व्हायची. आणि चार सुया आईला फुकटच द्यायची. तिच्या बाळाचा जो बदल मी करायची तो तिला खूप अप्रूप वाटायचा आणि तिचा जो आनंद चेहऱ्यावर दिसायचा तो आनंद मला मनापासून भावायचा. अजूनही अशा प्रकारची सेवा चालू आहे. एखाद्या गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य, निराधार वृद्धांच्या डोळ्यांतील समाधान, लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद किंवा एखाद्याच्या आयुष्यात निर्माण झालेला आशेचा किरण यातच वसुधाला खरा आनंद मिळतो.
मी पैसे देऊन वस्तू विकत घेत नाही; मी पैशातून माणसांच्या चेहऱ्यावरचे हसू विकत घेते, आनंद विकत घेते. समाधान विकत घेते. आनंद खर्च करत नाही; आनंदाची गुंतवणूक करते.आणि सरळ व्याजासहित परत वाटतं राहते. “अनाथ, वृद्ध, अपंग, गरजू आणि समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी करण्याची माझी तळमळ हीच खरी संपत्ती आहे”. मदतीसाठी पुढे सरसावलेल्या हातात देव दिसतो आणि गरजूच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य लाखमोलाचे असते. त्या आनंदाला मोलंच नाही. माझ्या आयुष्यात समाजसेवा हा केवळ एक उपक्रम नाही, तर जगण्याचा एक सुंदर भाग आहे. स्वतःवर खर्च केलेला पैसा क्षणिक आनंद देऊ शकतो; पण दुसऱ्याच्या उपयोगी पडलेला पैसा मनाला आयुष्यभराचे समाधान देऊन जातो. आनंद देऊन जातो.
वर्गातीलच पाच मुल दत्तक घ्यायची त्यांचा खर्च करायचा फुल न फुलाची पाकळी स्वरूपात त्यांना मदत करायची. मी काही खूप श्रीमंत नाही, परंतु माझ्या मनाची श्रीमंती खूप मोठी आहे असे मी कायम सांगत असते. उदा – पहिली ते दहावीपर्यंतची आमची जी बॅच होती ती 1982 ला बाहेर पडली.त्यानंतर 2013- 14 मध्ये आम्ही परत एकत्र या व्हाट्सअप च्या माध्यमातून जवळजवळ 50 ते 52 विद्यार्थी एकत्र आलो आणि मग गेट-टुगेदर करायचं ठरलं फलटण या शहरामध्ये. आमच्या गेट-टुगेदर वरून आल्यानंतर माझ्या एका मित्राचा कॉल मला आला की एक मैत्रीण आहे आमची तिच्या नावेने त्याने सांगितले की” तिची पर्स उघडली तर लाखो रुपये तिच्या पर्समध्ये निघतात. ” मी त्याला एकच सांगितलं “उज्वलाशी जर बोलायचं असेल तर तिच्या मनाची श्रीमंती पहा नाहीतर नाही बोलला तरी चालेल.” आज हा मित्र मला खूप मानतोच पण माझ्यावर कविताही मस्त करतो. हा मित्र फलटण मधील मोठा व्यवसायिक आहे कंत्राटदार आहे बिल्डर आहे. असे हे मित्र असतात.
स्वतःसाठी खर्च केलेला पैसा वस्तू देतो
पण दुसऱ्यासाठी खर्च केलेला पैसा
मनाला माणुसकीचा अमूल्य आनंद देतो…!!
वसुधा म्हणूनच समाजसेवेतून आनंद शोधते….
कधी एखाद्या मुलाच्या शिक्षणात मदत करून,
कधी वृद्धांच्या डोळ्यांत आपुलकी निर्माण करून,
कधी त्यांच्यासाठी गीते गाऊन..
तर कधी गरजूंच्या हातात मदतीचा हात देऊन…!!
माझ्या या प्रवासात पैसा कमी-अधिक असू शकतो, पण समाधानाची श्रीमंती मात्र अफाट आहे. कारण वसुधाला ठाऊक आहे की, खरा आनंद महागड्या वस्तूंमध्ये नसतो; तो दुसऱ्याच्या आयुष्यात निर्माण केलेल्या एका छोट्याशा आनंदात लपलेला असतो. ‘वसुधा’ समाजसेवेतून आनंद विकत घेते आणि त्या आनंदाची किंमत पैशात मोजता येत नाही. माझ्या ह्या समाजसेवेमध्ये शैक्षणिक कार्यामध्ये आणि साहित्याच्या या निरंतर सेवेमध्ये माझ्याबरोबर माझी पूर्ण टीम सहभागी असते. या टीमचे मनःपूर्वक मी आभार मानते. यामध्ये माझे मानसपुत्र योगेश, गौरव, सायली, मयुरी हे खूपच मला मदत करतात. श्रीराम घडे सर, तुषार, सौरभ हे सर्व माझ्याशी खंबीरपणे उभे आहेत. मा. हेंद्रे सर देखील खूप ‘सपोरटिव्ह’ आहेत. आपल्या वसुधा फाउंडेशन मधील सर्व साहित्यिक खूप छान लेख, कविता, चारोळी आणि दररोज मनातले काही ना काही लिहीत असतात त्यामुळे हा समूह खूप छान चालू आहे असाच निरंतर चालू राहू देत आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते.
वसुधा नाईक
धनकवडी, जि.पुणे
=======



