“वैज्ञानिक आधार नसलेली, लोकभ्रमात अडकलेली जिंदगी”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्ययत्न स्पर्धेचे परीक्षण
“वैज्ञानिक आधार नसलेली, लोकभ्रमात अडकलेली जिंदगी”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्ययत्न स्पर्धेचे परीक्षण
खूप गोड आहे माझी आजी…! आजीसोबत बाहेर जाणं म्हणजे आजीच्या सर्व नियमांचा स्वीकार करूनच घरातून निघणं. खूप दिवसापासून आजी माझ्या मागे होती. ब्राह्मणाकडून माझी कुंडली काढून घेण्यासाठी..बरेच दिवस मी टाळलं, पण तिच्या पाठपुराव्यापुढे मी माघार घेतली आणि त्यादिवशी ऑफिस मधून रजा घेऊन मी आजी सोबत सकाळी सकाळी बाहेर जायला निघाली. आम्ही दोघी घरातून बाहेर पडलो…थोडे पुढे गेलो. अचानक एक काळी मांजर आमच्या पुढून जातांना आडवी झाली.
आजीच एकदम लक्ष गेलं आणि….गेलो त्याच पावली आजीने मला घरी परत फिरवले. माझ्यातल्या विज्ञानाने तिला पुष्कळ समजावलं पण तिने अजिबात ऐकलं नाही. ती म्हणाली…रमा, एवढ्या शुभ कामाला असा अडथळा. नाखूशीने घरात घुसतच होतो आम्ही…काल पावसात भिजल्यामुळे मला थोडी सर्दीही झाली होती, दरवाजातच अचानक मला शिंक आली. आजीला जणू बळच मिळाले, म्हणाली… बघ ! बघ पुन्हा अपशकुन मी निरुत्तर झाली.
थोड्या वेळाने आरसा हातात घेतला, माहित नाही काय झाले ? अचानक हातातून आरसा निसटला आणि फुटला.. विजयी मुद्रेने आजीने मला हा ही अपशकुन कसा हे समजावले. ग्रामीण भागात या आणि अशा अनेक घटनांना मोठे महत्व होते आणि आजही आहे. यालाच लोकभ्रम असे म्हणतात, लोकभ्रम अर्थात… लोकांमध्ये प्रचलित असलेले काही गैरसमज किंवा अंधश्रद्धा. ग्रामीण भागात याचं महत्त्व व स्थान अढळ आहे. शनिवारी केस व नखे न कापणे, पिंपळाच्या झाडाखाली न खेळणे, विशिष्ट तारीख व वार अशुभ मानने, नजर उतरवणे, विशिष्ट वस्तूंचे दान करणे, काही रंगाचे कपडे कधीच न परिधान करणे,भूतप्रेत यावर विश्वास ठेवणे ,कुत्र्याचं ओरडणं अशुभ मानने, मरणावर जोडपत्र पाठवणे, भगतच्या अंगात येणे, रिकामा झोका न हलवणे, दृष्ट काढणे, उंबरठ्यावर न बसणे एक ना अनेक….हे सर्व लोकभ्रम आहेत. ज्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही, परंतु आजही ते कटाक्षाने पाळले जातात.
या आणि अशा लोकभ्रमाची दुसरी बाजू म्हणजे लोकांमध्ये असलेली निष्क्रियता याला मी मुद्दामच भ्रम असे म्हणत आहे. अगदी साधी गोष्ट आहे साहित्यिक लिहितात,समूह तुमच्या साहित्याचं कौतुक ही करतो, तुमच्या रचनांची निवड होते परंतु फोटो न पाठवल्यामुळे सन्मान पत्राला आपण मुकतो. हा सुद्धा आधुनिक लोकभ्रमच आहे. अशा लोकभ्रमांना दूर करण्याच्या हेतूनं आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल पाटील सर यांनी ‘लोकभ्रम’ हा विषय दिला. सामाजिक जाणीव हे साहित्याचे सर्वात मोठेअंग आहे, त्या अनुषंगाने समूहात विविध अंगी रचना साकारल्या गेल्या. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा…!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



